आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीने जप्त केला वाधवान याचा अलिबागचा २२ खोल्यांचा बंगला; अनेक नेत्यांची नावे अजूनही गुलदस्त्यातच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लाखो मध्यमवर्गीयांनी गुंतवणूक केलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्या एचडीआयएलचे सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांच्या संपत्तीवर ईडीने सोमवारी टाकलेल्या धाडीत घबाड सापडले. यात अलिबाग येथे असलेला २२ खोल्यांचा आलिशान बंगला, एक विमान, एक जहाज आणि अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. या दोघांकडून ईडीने आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

सारंग वाधवान आणि राकेश वाधवान हे एचडीआयएलचे संचालक असून त्यांनी व्यवसायासाठी पीएमसी बँकेकडून कर्ज घेतले, परंतु ते फेडलेच नाही. त्यातच बँकेच्या संचालकांनी हे कर्ज एनपीएमध्ये टाकून सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम केले. एकूण ४४ मोठ्या खात्यांपैकी १० खाती ही एचडीआयएल आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. संबंधित १० खात्यांपैकी एक खाते सारंग वाधवान यांचे, तर दुसरे राकेश वाधवान यांचे खासगी खाते आहे. त्यामुळे ईडीने कारवाईची मोहीम उघडली आहे. आरबीआयनेही पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध टाकले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात कारवाई करून बँकेच्या संचालकांसह एचडीआयलच्या संचालकांनाही अटक केली आहे. त्यानंतर ईडीने संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली. सोमवारी अलिबागमधील वाधवान यांच्या मालकीच्या असलेल्या आलिशान बंगल्याची ईडीने झडती घेतली आणि तो जप्त केला. 

अनेक नेत्यांची नावे अजूनही गुलदस्त्यातच
वाधवान यांच्या अलिबाग येथील बंगल्यात ईडीच्या पथकाला काही संशयास्पद कागदपत्रे सापडली अाहेत. त्यानुसार, वाधवान याने अनेक नेत्यांना उच्चभ्रू वसाहतीत फ्लॅट, बंगल्याचे वाटप केल्याचे स्पष्ट हाेते. मात्र या नेत्यांची नावे ईडीने जाहीर केली नाहीत. ही नावे बाहेर अाल्यास या प्रकरणात राजकीय नेत्यांचा सहभागही स्पष्ट हाेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 

मालदीवच्या यॉटमध्ये आढळले विमान
या बंगल्याच्या आवारात आलिशान कार आणि अन्य महागड्या गाड्याही आढळून आल्या. एक कार कर्नाटक आणि दोन कार रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केलेल्या आहेत. या कार सारंग आणि राकेशकुमार वाधवान यांच्या नावावर आहेत, तर कर्नाटक पासिंगची कार ही हाउसिंग डेव्हलपरच्या नावावर आहे. या छाप्यात वाधवान यांच्या मालकीची मालदीवमध्ये एक यॉट असल्याचे आणि एक विमान असल्याचेही आढळून आले आहे.  ईडीचे अधिकारी मालदीव सरकारच्या संपर्कात असून यॉट जप्त करण्याची कारवाई सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

बातम्या आणखी आहेत...