आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभी तो ‘पार्टी’ शुरू हुई है! 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पार्टी विथ डिफरन्स’ असा भाजपचा कायमचा रंगमंचीय आविष्कार असतो. त्याचा आणखी एक प्रयोग विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपात पाहण्यास मिळत आहे. उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली तरी त्यात विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या बहुचर्चितांची नावेच नाहीत. खरं तर कोणत्याही नाट्यप्रयोगात जे काम करतात, त्या सर्वांना काहीतरी मानधन मिळते. किमान चहापाण्याची तरी सोय होते. पुढल्या प्रयोगात तुम्ही आहात हां, तिथं वेळेवर पोहोचा, असं म्हणत गाडीची व्यवस्था केली जाते. पण इथं तसं काहीच झालं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मर्जीबरहुकूम न चालणाऱ्यांना पाच वर्षांच्या सेवेनंतर ग्रीन रूममध्येच ठेवण्यात आलं आहे. नुसतं ठेवलं नाही तर डांबून टाकलं. तिथं साधी पंख्याची सोय नाही. मेकअपमन नाही, ड्रेपरीवाला नाही. त्यामुळे रंगमंचावर किंवा कॅमेऱ्यासमोर जायचे तरी कसे, अशी त्यांची कोंडी झाली. मुख्यमंत्र्यांनी थेट भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या घरातच फटाके फोडले. नाथाभाऊंच्या वाट्याची भूमिका त्यांच्या कन्येला देऊन टाकली. तिला पाठिंबा देणे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या डावपेचांपुढे शरणागती पत्करणे; आणि विरोध करणे म्हणजे आत्मघात, अशा पेचात खडसे सापडले. कन्याप्रेमाचे दावे करत त्यांनी माघारही घेतली. तावडेंचे तिकीट कापण्यावरून सोशल मीडियात जे विनोदी आणि गंभीर ट्रोलिंग सुरू आहे, त्यावरून त्यांची कारकीर्द गेल्या पाच वर्षांत कशी राहिली असावी, याचा अंदाज येतो.  हजारो भावी, अतिरिक्त शिक्षक म्हणतात, ‘आता त्यांना कळलं असेल की पवित्र पोर्टलच्या यादीत नाव नसेल तर काय वाटतं ते?’ तिकडं बावनकुळेंचेही असेच झाले.  ऊर्जामंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना ऊर्जा देण्याऐवजी ते गडकरींच्या वाड्यात लाइट फिटिंग करत राहिले. मेन सप्लाय मुख्यमंत्र्यांच्या ‘तेहतीस केव्ही’ स्टेशनवरून घ्यायचा आणि फोकस भलतीकडेच, असा मामला होता का, हा प्रश्न आहे. प्रमुख कलावंतांच्या भूमिकांची कापाकापी होणार, याचा साधा सुगावाही देवेंद्र-गिरीश महाजन-चंद्रकांत पाटील या त्रिकुटाने कुणाला लागू दिला नाही. अर्थात हे सारे काही केवळ या त्रिकुटानेच केले, असे म्हणता येणार नाही. भाजपचा पूर्णपणे ताबा घेतलेले, या नाट्याचे निर्माते अमित शहा यांच्या फर्मानानेच आदेश निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना पाच वर्षे आव्हान देणारे, त्यांना काही ना काही कारणाने अडचणीत आणणारे लोक आता उमेदवार म्हणूनही नकोत, अशी शहांचीही इच्छा दिसते. पण राजकारणाचे वारे कायम फिरत राहते. ‘आपल्या विरोधातील आवाज ऐकायचाच नाही. त्याच्यावर काहीतरी शिक्का मारून तो बंद करून टाकायचा,’ या ‘गुजराती’ सुविचाराचे मराठी भाषांतर एवढे तंतोतंत आणि एवढ्या लवकर पाहण्यास मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. केवळ सत्ता येणार एवढ्या एका भावनेतून मुख्यमंत्री जुन्या सहकाऱ्यांना बाहेरची वाट दाखवत आहेत. हे निर्णय त्यांनी पक्षशिस्तीच्या नावाखाली घेतले असले आणि त्यात काही तथ्यही असले, तरी एकूण हा प्रयोग काही जमलेला नाही. आताशी तर सुरुवात आहे. पुढचे अंक आणखी कठीण असणार आहेत!