आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळातून महाआपत्तीकडे... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून हा जुगार असल्याचे म्हटले जाते. यंदा याचे प्रत्यंतर आले. या वर्षी जूनमध्ये मान्सूनचे आगमन लांबले. त्यातच अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’ वादळाने सारे बाष्प खेचून घेतल्याने मान्सून पंधरा दिवस उशिराने राज्यात दाखल झाला. जून ते सप्टेंबर या काळात कोठे अतिवृष्टी तर कोठे कोरडी आभाळमाया, तर कोठे महापूर अशी वेगवेगळी रूपे मान्सूनने दाखवली. या चार महिन्यांत मान्सूनने काही जणांच्या तोंडचे पाणी पळवले, तर काही जणांच्या डोळ्यात पाणी आणले. हवामान विभागाचे, खासगी संस्थांचे सर्व अंदाज चुकवत मान्सूनने सर्वांनाच चकवा दिला. देशभरात सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाला. मान्सूनचा परतीचा प्रवास संपल्याचे हवामान खात्याने १६ ऑक्टोबरला जाहीर केले. मात्र, त्यानंतरचा पावसाचा खरा खेळ सुरू झाला. विशेषत: मध्य आणि दक्षिण भारतात मान्सूनोत्तर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घालत खरीप उद्ध्वस्त केला. राज्यात ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला.  राज्यातील एकूण खरिपाचे क्षेत्र १३९ लाख हेक्टर आहे. मान्सूनोत्तर पावसाने यापैकी ५४.२२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. याचाच अर्थ जवळपास ४० टक्के क्षेत्राला मान्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, संकरित ज्वारी ही खरिपाची हाती आलेली पिके, पावसाच्या तडाख्यात सापडली. काही ठिकाणी काढणी केलेले पीक शेतकऱ्याच्या घरात जाण्याए‌ेवजी या पावसात वाहून गेले. काही जागी कापणी झालेल्या, तर कापणीस आलेल्या पिकांना कोंब फुटले. द्राक्ष, डाळिंब, आंबा, मोसंबी, संत्रा, केळीच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या. मराठवाड्यातील ७२, पुणे विभागातील ५१, नाशकातील ५२, अमरावतीचे ५६, नागपुरातील ४८ तर कोकणातील ४६ तालुक्यांना या पावसाचा फटका बसला. सर्वात जास्त नुकसान मराठवाड्यात झाले. पावसाळ्यात पावसाची तूट आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा असा विरोधाभास मराठवाड्याच्या वाट्याला आला. त्यातच नोव्हेंबरमध्ये अरबी समुद्रात ‘क्यार’ पाठोपाठ ‘महा’चक्रीवादळ घोंगावते आहे. परिणामी राज्य दुष्काळातून ओल्या दुष्काळाकडे जात आहे. गेल्या दशकभरात या ना त्या कारणाने खरीप शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना उभारी देणारी ठोस मदत हवी आहे.  जिवापाड कष्ट करून जपलेल्या फळबागा, तीन महिने डोळ्यात तेल घालून वाढवलेली खरिपाची पिके यांचे नुकसान पैशात मोजता येणार नाही. हे लक्षात घेऊन पंचनामे वगैरे सरकारी सोपस्कारात जास्त काळ न अडकता सरकारने तातडीने रोख मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. हवामान बदल हा अलीकडच्या काळातील शेतीचे नुकसान करणारा नवा घटक म्हणून समोर येत आहे. हवामान बदलानुसार पीक पद्धती व पिकांचे नियोजन, त्यानुसार पिकांचे नवे वाण असे धोरण आखण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रावर आलेले हे संकट लक्षात घेऊन योग्य पावले टाकली नाहीत तर दुष्काळातून महाआपत्तीकडे राज्याची वाटचाल अटळ आहे.

बातम्या आणखी आहेत...