आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बहादुरी’ला अखेरचा सॅल्यूट!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी भारतीय हवाई दलाची शान असलेल्या ‘मिग-२७’ या लढाऊ विमानांच्या तुकडीचे जोधपूर येथील हवाई तळावरून शुक्रवारी सकाळी अखेरचे उड्डाण झाले, तेव्हा अनेक वैभवशाली गौरवगाथांना उजाळा मिळाला. मिग-२७ चा ‘विंड डाऊन’ सोहळा त्याच्या कामगिरीला साजेशा थाटात पार पडला आणि ही अखेरची सात विमाने ‘फेज आऊट’ झाली. बहुचर्चित कारगिल युद्धासह भारतीय हवाई दलाच्या अनेक चढायांमध्ये कळीची भूमिका बजावणारी आणि ‘बहादूर’ ही ओळख निर्माण करणारी मिग-२७ विमाने आता जमिनीवरच विसावणार असली, तरी त्यांची कामगिरी सुवर्ण अक्षरांकित करावी अशीच आहे.  प्रारंभी अगदी मर्यादित व्याप असणाऱ्या आणि अत्यंत तुटपुंज्या सामग्रीनिशी उभ्या राहिलेल्या आपल्या हवाई दलाची गणना आज जगभरातील आघाडीच्या हवाई दलांमध्ये केली जाते. स्वातंत्र्यानंतर सुरूवातीचा काही काळ गेल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व पुढे इंदिरा गांधी यांनी काळाची पावले ओळखत आपापल्या कारकिर्दीत हवाई दलाच्या सक्षमीकरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवले. विशेषत: १९७१ च्या युद्धात नामुष्की ओढवल्याने पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि लष्करशहा भारताविरोधात अधिकाधिक आक्रमक होत होते. त्यावेळी आपल्या हवाई दलाला हंटर, इंपिरिअल आणि मिग-२१ एवढ्याच लढाऊ विमानांचा सहारा होता. अशा स्थितीत पाकचा वाढता धोका लक्षात घेता १९८० मध्ये त्यावेळचे एअर चीफ मार्शल इद्रिस यांनी आपल्याकडील लढाऊ विमानांची कमतरता इंदिरा गांधींच्या लक्षात आणून देताच त्यांनी ताबडतोब तत्कालीन संरक्षण सचिवांसह संबंधित अधिकाऱ्यांची टीम आपला त्यावेळचा घनिष्ठ मित्र असलेल्या रशियाला रवाना केली. त्यानंतर आवश्यक ते करार वगैरे सोपस्कार झपाट्याने पार पाडले गेले आणि त्याकाळी ‘मॉडर्न’ असलेल्या मिग-२७ ची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात दाखल झाली.  पहिल्या टप्प्यात मिळालेल्या या ३६ विमानांमध्ये कालांतराने भर पडत गेली व त्या बळावर आपले हवाई दल एकापाठोपाठ विजय भराऱ्या घेऊ लागले. ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन पराक्रमसह दोन दशकांपूर्वीच्या कारगिल युद्धात या विमानांनी अतुलनीय कामगिरी बजावल्याने भारताचा तिरंगा नेहमीच डौलाने फडकत राहिला. सुरूवातीला, १९८५ च्या सुमारास सुपर सॉनिक व स्विंग विंग असा डामडौल असलेल्या या विमानांचा मोठा दरारा होता. यापैकी दोन विमाने लाल रंगात रंगवली गेली असता त्यांचे सौंदर्य पाहून त्यावेळी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या हेमामालिनीची उपमा सामान्यजनांनी या विमानांना दिली होती. तर दुसरीकडे, सर्वच कामगिऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या मिग-२७ च्या करामतींमुळे हवाई दलाच्या गोटात त्यांची ‘बहादूर’ अशी सार्थ ओळख होती. अर्थात, दिवसागणिक प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे कालौघात या विमानांना विश्रांती देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शुक्रवारी हवाई दलाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिग-२७ च्या तुकडीने भलेही आपले अखेरचे उड्डाण भरले असो, तमाम भारतीयांच्या मनावर मात्र त्यांची ‘बहादुरी’ कायमचीच कोरलेली असेल.