आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऱ्हासपर्वाकडे जाताना... (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे । पक्षिणी सुस्वरे आळविती... संत तुकाराम महाराजांनी हे सांगून बराच काळ लोटला. हे सर्व विसरून आपण या सोयऱ्यांचा गळा घोटत आहोत. काँक्रीटच्या बेटांची आपल्याला भूरळ पडली आहे, वातानुकूलित (एसी) यंत्रणेशिवाय आपण क्षणभर राहू शकत नाहीत, सारी भौतिक सुखे आपल्या भोवती नांदताहेत. आपण खुश आहोत. असे सारे काही आलबेल असताना, ६ मे रोजी संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालाने जगाची झोप उडवली आहे. पर्यावरणासंबंधी या अहवालात नेमके आहे तरी काय? जगातील ५० देशांतील विविध विषयांतील १४५ तज्ज्ञांच्या अभ्यासातून तयार झालेला हा १५०० पानांचा अहवाल आपण पर्यावरणाची कशी लूट केली यावर मार्मिक भाष्य करतो. जगातील १० लाख प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर असून भूतलावरील २० % अधिवास (हॅबिटॅट) नष्ट झाले आहेत, ४० % उभयचरांचे, ३० % प्रवाळांचे आणि एकतृतीयांश सस्तन प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मागील ३०० वर्षांत ६०० पृष्ठवंशीय प्राण्यांच्या प्रजाती लुप्त झाल्यात. एवढेच सांगून हा अहवाल थांबत नाही तर पर्यावरणास सर्वात घातक अशा हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण ३० वर्षांत दुप्पट झाले आहे. गेल्या दोन दशकांपासून समुद्रपातळी ३ मिमीने वाढते आहे, तापमान वाढते आहे, असे मानवासाठी धोक्याचे ठरणारे निष्कर्ष या अहवालाने जगासमोर आणलेत. भारतातही महापूर, दुष्काळ, गारपीट, अवकाळी, धुळीची वादळे, उष्णतेची व थंडीची लाट, वणवे, दाट धुके या घटना नित्याच्या झाल्यात. एकट्या उष्णतेच्या लाटेने गेल्या २७ वर्षांत देशात २२ हजार बळी गेलेेत. आर्थिक नुकसान वेगळेच. पर्यावरणाविषयी कमालीची अनास्था ही आधुनिक भारताची खासियत. 


आपल्या देशांतील जैवविविधता हा खरे तर अभिमानाचा विषय. मात्र, आपणच त्याचा ऱ्हास करतो आहोत. गेल्या वर्षी केरळात आलेला महापूर हे त्याचे ताजे उदाहरण. पश्चिम घाट हा जैविक संवेदनशील भाग असताना तेथे लाखो दुर्मिळ वृक्षांची तोड करून, तेथील परिसंस्थेत अवैध, अविचारी मानवी ढवळाढवळ झाली, त्याचे परिणाम केरळवासीयांना भोगावे लागले. पर्यावरण रक्षणासाठी स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या १५ वर्षांच्या विद्यार्थिनीने मोठे आंदोलन उभे केले आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ पार्लमेंटमध्ये सर्व खासदारांना संबोधित करण्यासाठी तिला बोलावण्यात आले. त्या वेळी तिने आम्ही मोठे झाल्यावर पृथ्वीचा संहार पाहत बसणार का? असे ठणकावले. संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारतातील घटना आणि ग्रेटाच्या प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष केले तर ऱ्हासपर्व अटळ आहे. हे ऱ्हासपर्व टाळणे आपल्या हाती आहे. ‘दिव्य मराठी’ने जल सत्याग्रहाच्या माध्यमातून त्या दिशेने पाऊल टाकले आहे. या कामात आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांचे स्वागत. आपण सर्व जण मिळून हे ऱ्हासपर्व टाळू शकतो.

बातम्या आणखी आहेत...