आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असले ‘स्पिरीट’ काय कामाचे?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२६ जुलैच्या दुर्घटनेनंतर मिठी नदीचा शोध लागला होता, परंतु त्यानंतरही मुंबईभोवती विनाशाच्या अनेक मगरमिठ्या पडल्या. जुन्या दुखण्यांवर उपाय दूरच राहिले, नवी अनेक दुखणी तयार झाली आहेत आणि त्यामध्ये सरकार, महापालिकेसह मुंबईकरांचाही तेवढाच वाटा आहे. नवे तंत्रज्ञान आले आहे, त्याद्वारे उपाययोजना करणे तुलनेने सोपे झाले आहे, परंतु आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण बालवाडीतून पुढे सरकण्यास तयार नाही. थायलंडच्या गुहेत अडकलेल्या खेळाडू मुलांना वाचवण्यासाठी भारतातील, अगदी महाराष्ट्रातील तंत्रज्ञानच कामी आले म्हणून आपण पाठ थोपटून घेत असताना, मुंबईत तुंबणारे पाणी हटवण्यासाठी पालिका प्रशासन वा सरकार काहीच करत नाही. 


मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे, अतिवृष्टी व भरती एकाच वेळी आल्यास समुद्रसपाटीपासूनही खोल असलेल्या भागातील पाण्याचा निचरा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे, पण वर्षानुवर्षे या समस्येची माहिती असूनही त्यावर तोडगा काढणारे तंत्रज्ञान प्रशासनास उपलब्ध होऊ नये हे संतापजनकच आहे. मुंबईची त्रेधा उडण्यास जबाबदार बहुतांश कारणे मानवनिर्मित आहेत. मुंबईच्या भूरचनेत मोठे बदल झाले असून पूर्वीच्या पाणी साचण्याच्या जागांवर भर घातली आहे. पाणी वाहून जाण्यासाठीचे प्रवाहही ठेवले नाहीत. खारफुटीची कत्तल आणि दलदलीच्या जागी अतिक्रमणे केल्यामुळे पाणी वाढले की ते थेट रस्त्यावर आणि राहत्या घरांमध्ये शिरते. पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक प्रवाहांचे रस्त्यांमध्ये रूपांतर झाले, झाडे नष्ट केली आणि जमिनीचे काँक्रिटीकरण करून स्वतःच्याच विनाशाची वाट प्रशस्त करण्यात आली. पावसाळ्याच्या आधी दरवर्षी नालेसफाईची कामे केली जातात. जाहिरातबाजी, फोटोसेशन होते. ही नाटके एवढ्यासाठीच की, गाळ काढणे ही यातील अनेक घटकांसाठी पर्वणी असते. गाळ किती काढायचा, किती खायचा आणि किती दाखवायचा याची गणिते ठरलेली असतात. पावसाळ्या आधीच आपल्या बाजूने पुरावे तयार केले जातात. यंदाही तसेच झाले. एका दखलपात्र पावसाने मुंबईच्या कारभाऱ्यांना तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. 


आता मुंबईचा २०३४ पर्यंतचा विकास आराखडा तयार आहे. मात्र, मागील विकास आराखड्याची फक्त ७ टक्के अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुंबईच्या नागरी जीवनावर कोणतेही संकट आले की सर्वप्रथम शिवसेनेला धारेवर धरले जाते. परंतु मुंबईचे सगळेच घोंगडे शिवसेनेच्या गळ्यात अडकवून राज्य सरकारला नामानिराळे राहता येणार नाही. आधीच्या आणि आताच्या सरकारलाही या पापामध्ये वाटेकरी करून एकत्रित पंचनामा करून ज्याचे त्याचे पाप संबंधितांच्या पदरात टाकावे लागेल. अशी वेळ निवडणुकीत येते, परंतु त्या वेळी मुंबईकर भलत्याच स्पिरीटवर स्वार झालेले असतात, हे दुर्दैव! मुंबईकरांचे स्पिरीट म्हणून याचे नेहमी कौतुक आणि उदात्तीकरण केले जाते. परंतु रोजच्या जगण्यासाठी करावी लागणारी ही लढाई असते आणि त्यातून त्याची असहायता आणि अगतिकताच दिसून येत असते. आता असल्या स्पिरीटच्या पलीकडे जाऊन कोडग्या व्यवस्थेला थेटपणे जाब विचारायला पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...