आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच, मरण स्वस्त झालंय!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१४ च्या पावसाळ्यात डोंगर खचून माळीण गाव गडप झालं. २०१६ मध्ये महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल कोसळून १२ वाहने, त्यातले प्रवासी दुथडी वाहणाऱ्या पात्रातून वाहून गेले. यंदा चिपळूण तालुक्यातली तिवरे धरणफुटी २५ गावकऱ्यांच्या जिवावर बेतली. अशा दुर्घटनेच्या अनुषंगाने सरकार मदतीची घोषणा करते. चौकशा लागतात. दोषी कुणाला ठरवतात, त्यांना काय शिक्षा होते, याचं तुम्हाला आम्हाला कधी काही समजत नाही.


तिवरे धरण म्हणे, २० वर्षांपूर्वी बांधलं होतं. महिन्यापूर्वी डागडुजी झाली होती. तरी ते फुटलं. पूर्वी धरण म्हटलं की गावकऱ्यांना आपल्या जमिनी धरणात जाण्याची भीती वाटायची. आताशी धरण फुटण्याची अधिक भीती वाटते. ब्रिटिशांनी वासाहतिक काळात महाराष्ट्रात बांधलेली वीर, भाटघर, दारणा, पळसदरी अशी धरणं आज शतक पूर्ण करून उभी आहेत आणि आमच्या अभियंत्यांनी आता-आता बांधलेली धरणं दोन दशकेसुद्धा टिकू शकत नाहीत. प्रगतिशील म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची ही आहे प्रगती. सांगायचा मुद्दा असा, धरण फुटलं, पण त्याचं कारण कोकणच्या मातीबरोबरच व्यवस्थेत आहे. तिवरे धरणाचं घ्या. हे धरण बांधणारी ठेकेदार कंपनी होती, तिचे मालक शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी धरणफुटीचं खापर बाबू मंडळींवर फोडलं आहे. महाराष्ट्रात ठेकेदार हल्ली आमदार होतात. कारण, सरकारी ठेकेदारीत जो नफा आहे, तो भल्याभल्या उद्योगात नाही. ही ठेकेदारी म्हणजे सगळा अंदाधुंदीचा कारभार असतो. म्हणजे एक धरण बांधायचं, त्याची दगड-माती काढून दुसऱ्या धरणाला न्यायची. खडीच्या जागी मुरूम वापरायचा अन्् मुरुमाच्या जागी काळी माती भरायची. बिलं काढताना बाबू मंडळींना टक्केवारी मिळते. सगळं चिडीचूप. असली ठेकेदारी आज नेत्यांची मक्तेदारी बनली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मजूर सोसायट्यांचं पीक आलं आहे. असल्या ठेकेदारीनं तिवरे गावच्या २५ रहिवाशांचा आज बळी गेला. 


सार्वजनिक कामांतल्या निकृष्टतेला चाप लावायला आपल्याकडे महालेखापाल (कॅग) वगैरे संस्था आहेत. पण, त्यांचे अहवाल पाच-पाच वर्षे विधिमंडळात सादर होत नाहीत. कॅगने कितीही ताशेरे मारले तरी त्यास कोणी जुमानत नाहीत. विरोधकांना कॅगमधल्या नोंदी दिसत नाहीत. कारण तेसुद्धा ठेकेदारीत असतात. अडचणीतल्या अहवालांची वासलात लावायचे मार्ग व्यवस्थेतच आहेत. त्यामुळे आपल्याकडे धरणं फुटतात, पूल कोसळतात, इमारती पडतात आणि शेकडोंनी बळी जातात. तरी दोषी मंडळी सहीसलामत सुटतात. खंत याची आहे, अनास्थेचे बळी सर्व गरीब, ग्रामीण, तळातले लोक असतात. ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहाेचू शकत नाही. ज्यांना न्याय मिळवायची पद्धत माहिती नाही. अन्यथा, तिवरे गावातल्या रहिवाशांच्या तक्रारीकडे जलसंपदा खात्यानं दुर्लक्ष केलं नसतं. म्हणून नेमेचि येताे पावसाळा या उक्तीप्रमाणे तिवरे, माळीण, सावित्री, अांबेगाव (बु.) अशा घटना घडत राहणार. कारण, बाबूराव बागुलांच्या कथेसारखं ‘खरोखर, मरण स्वस्त झालं आहे.’

बातम्या आणखी आहेत...