आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझमभाई, सच्चेपणा कृतीतही हवा (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेत गुरुवारी मुस्लिम महिला वैवाहिक अधिकार संरक्षण विधेयकावर चर्चा सुरू होती. यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे. हंगामी सभापतिपदाच्या खुर्चीवर आसनस्थ असलेल्या भाजपच्या खासदार रमादेवी यांना उद्देशून जे काही बोलले, ते वाईट हेतूने नाहीत, असा खुलासा आझम खान आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. सभापती ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या बैठकीत सर्वपक्षीय खासदारांनी आझम खान यांचे वक्तव्य आक्षेपार्ह ठरवत कडक कारवाईची मागणी केली. अर्थात समाजवादी पक्ष सोडून. आझम खान आणि त्यांचा पक्ष दावा करत आहे की, हेतू वाईट नव्हता. तरीही रमादेवी यांना हे वक्तव्य खटकले असेल तर आझम खान यांनी लगेच माफी मागायला हवी होती. तसे त्यांनी केले नाही. रमादेवी या भगिनी आहेत. त्यांच्याविषयी वाईट भावना नसल्याचा खुलासा त्यांनी केला. तो पुरेसा नक्कीच नाही. 


आझम खान शेर सांगत होते, ‘तू इधर उधर की ना बात कर, ये बता के काफिला क्यूं लुटा?’ त्या वेळी ते सत्ताधारी भाजप सदस्यांकडे पाहून बोलत होते. त्यावर रमादेवी यांनी त्यांना टोकत, ‘आप भी उधर मत देखिए इधर देखिए’, असे सांगितले. त्यावर कोटी करण्याच्या प्रयत्नात आझम खान म्हणाले की, आप इतनी अच्छी, प्यारी लगती हैं कि आप की आँखो में आँखे डालकर देखता रहूं. इतनी अच्छी जगह बैठीं हैं आप. यावर आक्षेप घेतल्यानंतर ‘आप मेरी बहन हैं’, असे स्पष्टीकरण त्यांनी लगेच दिले. रमादेवी यांनी हरकत घेत हे वक्तव्य नोंदीतून हटवण्यास सांगितले.


खासदार आझम खान आणि अखिलेश यादव यांचा वाईट हेतू नसल्याचा दावा जरी गृहीत धरला तरी हा संवाद बहिणीशी करण्यासारखा नक्कीच नाही. अनवधानाने काही होईना जीभ घसरली हे स्पष्ट आहे. आझम खान आणि त्यांच्या पक्षाने कितीही खुलासा केला तरी हे समर्थनीय होऊ शकत नाही. यापूर्वीही संसदेबाहेर आझम खान यांची वक्तव्ये विवादास्पद ठरली आहेत. पण, संसदेत बोलताना संसदेचा आब आणि परंपरांचा मान राखला जाईल, याची पूर्ण काळजी घेणे अपेक्षित आहेच. संसदेत ज्ञान समृद्ध करणाऱ्या चर्चेऐवजी गोंधळ होणे हे नेहमीचेच झाले आहे. चुकूनही चुकीचे बोलले जाणार नाही, याची कमालीची दक्षता घेणे सभ्य समाजाचे लक्षण आहे. बोलण्यात – वागण्यात चूक झालीच आहे, तर ती स्वीकारणे आणि माफी मागणे हे मोठ्या आणि प्रामाणिक मनाचे लक्षण असते. या वक्तव्यावर आपण प्रामाणिक आहोत, असा दावा आझम खान करत असले तरी माफी मागण्याच्या कृतीतून तो भक्कम झाला असता. पण, हेकेखोर स्वभाव नडला. या स्वभावामुळे माघार घ्यायची नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आझम खान यांनी माफी मागितलीच पाहिजे. मुद्दा एकट्या आझम खानांचा नाही, ही वृत्ती अनेक निमित्तांनी अधोरेखित झाली आहे. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. आपली यत्ता कंची, असा हा सवाल आहे.

बातम्या आणखी आहेत...