आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कलयुगातून सतयुगाकडे...(अग्रलेख)

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अशी गोष्ट, जी जगाला सांगितली नाही, तर आपला स्वतःचा स्फोट तर नक्की आहे, अशा कहाण्या प्रत्येक कलाकार सोबत घेऊन जगत असतो. जगभरातील कलाकार कलेच्या माध्यमातून ही घुसमट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. सध्या आपल्याकडे प्रसारित होणाऱ्या वेबसिरीजमधून घुसमटीतून निर्माण झालेला तुंबारा जगापुढे येताना िदसतोय. बॉलीवूडचा लेखक-दिग्दर्शक अनुराग कश्यप याला मुंबई आणि तेथील व्यक्ती-समूह, तत्कालीन घटनांचे माणसांवर होणारे परिणाम, लोकसमूहांचा इतिहास, संस्कृती परंपरा, पारंपरिक मिथके, धार्मिक वर्गीकरण, बदलती सामाजिक-राजकीय मूल्ये आणि त्याची चिकित्सा यात विशेष रस आहे.  दुर्दैवाने, धार्मिक आणि राजकीय चिकित्सा सिनेमांतून करता यावी, असे पोषक वातावरण भारतीय सिनेसृष्टीत नाही. म्हणूनच वेबसिरीजचे हे नवे माध्यम घेऊन ‘सेक्रेड गेम्स’च्या निमित्ताने अनुराग या वेळी वर्षानुवर्षे दाबून ठेवलेली खदखद बाहेर काढत आहे. ‘सेक्रेड गेम्स’ हा फक्त नैतिक ऱ्हासाची किंवा समाजाच्या अधःपतनाची कहाणी नाही, वेळीच सावध करणारा, तो सुस्पष्ट इशारा आहे. कठड्यावर बसून संभ्रमात असणाऱ्या प्रवृत्तींना मागे खेचणारा तो हात आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या पर्वात एक प्रसंग आहे. गणेश गायतोंडे गुरुजींच्या शिष्याला त्रिवेदीला विचारतो, क्या तुमको भारत देश से प्यार नही है? त्रिवेदी त्याला उत्तर देताना म्हणतो, “”””है ना, लेकिन इस भारत से नहीं. हमे हमारे पुराने भारत से प्यार है, यह कलयुग वाला भारत नहीं पुराना, याने सतयुग वाला भारत, वैदिक समय का भारत.’’  अनुरागच्या बहुतेक सिनेमांत नेहमीच सामाजिक-राजकीय अंडरकरंट्स असतात. सिनेमा ही फक्त काही घटका मनोरंजन करणारी पलायनवादी कला आहे, या भूमिकेला उभाआडवा छेद देणारे सिनेमे अनुरागचे असतात. बरं झालं अनुराग कश्यपने “ट्विटर’चा संन्यास घेतला. तसंही ते त्याचं माध्यमच नव्हतं. ज्या माध्यमावर त्याची हुकूमत आहे त्यात तो इतका निर्भीड, संवेदनशील आणि थेट आहे की यापुढेही अनुरागने व्यवस्थेशी लढा देण्यासाठी सिनेमा, वेबसिरीज हीच माध्यमे वापरावीत. पहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व आरोपींची  निर्दोष मुक्तता, उन्नाव बलात्कार प्रकरणाचा आरोपी आणि भाजपचा आमदार कुलदीप सेंगर याची स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच बाजूला असलेली छबी या अस्वस्थ करणाऱ्या लागोपाठच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनुराग कश्यपच्या बहुचर्चित सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन प्रदर्शित होतो हा निव्वळ योगायोग नाही. सेक्रेड गेम्स हे एक प्रभावी राजकीय भाष्य आहे. क्रिकेटवरून झालेल्या किरकोळ भांडणामुळे एका मुस्लिम तरुणाचा “”मॉब लिंचिंग’मध्ये बळी जाणे, “”यहाँ त्रिवेदी के लोगों ने बाबरी मस्जिद गिराया और वहाँ शाहिद खानने बंबई जलाया’, किंवा “”मुसलमान को उठाने के लिये कोई वजह चाहिये क्या’ हे अशा प्रकारचे संवाद आणि प्रसंग दाखवून अनुराग आणि त्याच्या टीमने “सेक्रेड गेम्स’ मधून समाजाला आरसा दाखवलाय. धर्म-पाखंडाने वेढलेलं सत्तांतर आणि त्यातून होणारे न्यूक्लियर बॉम्बपेक्षा भयंकर परिणाम आपल्यावर कुठला तरी ‘ययाती’ चाणाक्षपणे लादत नाही ना, हे ‘सेक्रेड गेम्स’च्या निमित्ताने आपल्याला तपासावे लागणार आहे.