आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिले पाढे पंचावन्न... (अग्रलेख) 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचारावरून विरोधकांवर होत असलेली राजकीय कुरघोडी व त्यानिमित्ताने केले जात असलेले राजकारण ही बाब नवी नाही. यूपीए-२ सरकारवर प्रशासकीय अनियमितता, भ्रष्टाचार या प्रमुख मुद्द्यांवरून भाजपने जोरदार हल्ले चढवले आणि त्या बळावर केंद्रात बहुमत मिळवले. आज सुमारे पाच वर्षांनी फासे उलटले आहेत, भाजपवर आता काँग्रेसकडून नोटबंदी, रफाल विमान खरेदीतील भ्रष्टाचार या मुद्द्यावरून शरसंधान साधले जात आहे आणि मोदी सरकारला याची उत्तरे देताना नाकी नऊ येत आहेत. काल ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने रफाल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान कार्यालय कसे हस्तक्षेप करत होते आणि संरक्षण खात्याला विमानाच्या किंमत निश्चितीत व खरेदीत या कार्यालयाकडून कसे पद्धतशीरपणे डावलले जात होते, याची माहिती देणारी बातमी प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. या बातमीमुळे काँग्रेसच्या आरोपांना धार आली. त्यांनी व अन्य विरोधी पक्षांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करून संरक्षणमंत्र्यांची गोची केली. संरक्षणमंत्र्यांनी यावर योग्य युक्तिवाद करण्यापेक्षा, ‘विरोधी पक्ष गाडले गेलेले मुडदे उकरून काढत आहेत. पंतप्रधान कार्यालयाने माहिती मागवण्यात काहीच गैर नाही. यूपीए-२ काळात राष्ट्रीय सल्लागार परिषद पंतप्रधान कार्यालयासारखी काम करत होती,’ असाही आरोप केला. वास्तविक यूपीए-२ सरकारवर सतत टीका करणे, त्यांच्या कारभारातील त्रुटी दाखवणे पण आपल्या कारभारातील प्रामाणिकता(?), पारदर्शकता(?) लपवून ठेवणे यातून भाजपच दिवसेंदिवस अडचणीत येऊ लागला आहे. आजपर्यंत रफाल प्रकरणात सरकारमधील विविध मंत्र्यांनी अनेक विधाने करून स्वत:भोवती इतका संशय निर्माण केला आहे की, विरोधकांना ही विधाने म्हणजे आयते कोलीतच मिळाले आहे. 


लोकसभेतील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी रफाल करार होऊ नये अशी काँग्रेसची इच्छा होती व या पक्षाला आपल्या देशाचे हवाई दल कमजोर करायचे होते, असा सनसनाटी आरोप केला. मोदींच्या आजपर्यंतच्या अनेक आरोपांपैकी हा एक नवा आरोप होता. आता सर्वांना कळून चुकले आहे की, मोदी अशा आरोपाच्या माध्यमातून काँग्रेस हा देशद्रोही पक्ष आहे, तो देशाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नसल्याचा समज जनतेवर बिंबवत असतात. असे आरोप २०१४ मध्येही मोदी करत होते, त्याला भुलून जनतेने त्यांच्या पदरात भरभरून मते टाकली होती. आता असल्याच प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून मतदारांची सहानुभूती मिळेल, असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. कारण त्यांच्या कारकीर्दीत स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा प्रकरणात काहीच हालचाली झालेल्या नाहीत की एकाही बड्या नेत्याला अटक झालेली नाही. मोदींनी मागेही एकदा माजी पंतप्रधान, माजी हवाई दल प्रमुख व काही ज्येष्ठ सनदी अधिकारी हे देशद्रोह करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्या वेळी सरकार तुमचेच आहे, तुमच्याकडचे सीबीआय, रॉ, संरक्षण खाते आहे तेव्हा चौकशी करून संबंधितांना शिक्षा करा, अशी मागणी काँग्रेसने केली तेव्हा मोदींनी मौन बाळगले. गेल्या पाच वर्षांत मोदी आपल्यावर झालेला कोणत्याही प्रकारचा हल्ला देशप्रेमाशी जोडून घेतात व स्वत:ची सुटका करून घेतात. सध्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी, निवडणुका जवळ आल्यानंतर सुरू करण्यात आली आहे, हे स्पष्ट आहे. पण अशा चौकशांमागचा हेतू किती प्रामाणिक आहे?   


आपण करतो तो सेवाभाव, दुसरा करतो तो भ्रष्टाचार ही भारतीय राजकारणात आरोप करणाऱ्यांनी एक प्रथाच पाडलेली आहे. या प्रथेत केवळ आरोप-प्रत्यारोप आहेत. त्याच्या मुळाशी जाऊन सत्य खोदण्याची एकाही राजकीय पक्षाची तयारी दिसत नाही. सगळेच सत्ताधारी सत्ता मिळाल्यास आपल्या अधिकारांची ताकद दाखवतात, प्रतिपक्षाचे राजकीयदृष्ट्या चारित्र्यहनन करतात, नेत्यांची राजकीय कारकीर्द संपवतात, हे सुडाचे राजकारण आहे. त्यातून देशहित संभवत नाही की भ्रष्टाचाराविरोधातील लढाई जिंकली, असाही दावा करता येत नाही. यूपीए-२ सरकारच्या काळात अनेक मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामे द्यावे लागले होते. पण या सरकारवर अनेक आरोप असूनही एकाही मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आलेला नाही हे कोणीही विसरू शकत नाही. तरीही भाजपचे नेते आमच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत असे रेटून बोलतात. हा जनतेने दिलेल्या बहुमताचा अवमान आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मोहिमेत तुम्ही काय केले, असा प्रश्न मतदारच भाजपला विचारणार आहेत. त्याची उत्तरे या पक्षाकडे अजिबात नाहीत. मात्र, सुडाचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात पहिले पाढे पंचावन्न सुरू आहेत, हे तितकेच खरे.

बातम्या आणखी आहेत...