Home | Editorial | Agralekh | Editorial

सुदृढ आरोग्याचा रोडमॅप (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Mar 02, 2019, 10:53 AM IST

जगाची लोकसंख्या व अन्नधान्याचे उत्पादन यांच्यात ३०-४० वर्षांपूर्वी जशी दरी  दिसून येत होती तशी ती राहिलेली नाही.

  • Editorial

    जगाची लोकसंख्या व अन्नधान्याचे उत्पादन यांच्यात ३०-४० वर्षांपूर्वी जशी दरी दिसून येत होती तशी ती राहिलेली नाही. पण आजच्या घडीला जगभरातील सुमारे ८० कोटी लोकसंख्येला पूरक आहार मिळत नसल्याने मृत्युदरही अधिक दिसतो हे वास्तव आहे. या लोकसंख्येच्या आहारात शरीराला आवश्यक असणारी पुरेशी पोषण द्रव्ये नाहीत, त्यांना मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे, त्यामुळे पोषणद्रव्याअभावी होणाऱ्या अनेक शारीरिक आजारांशी त्यांना सामना करावा लागतो. अशा लोकसंख्येला आरोग्यसेवाही चांगल्या स्वरूपाच्या मिळत नाहीत. दुसरीकडे विकसित व विकसनशील समजल्या जाणाऱ्या देशांमधील सुमारे २ अब्ज लोकांना अतिआहार व अतिरिक्त पोषणद्रव्यांमुळे लठ्ठपणा, हृदयरोगासारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे. हे चित्र २०५० पर्यंत भीषण होत जाणार आहे. कारण २०५० पर्यंत पृथ्वीवरची लोकसंख्या १० अब्जांच्या घरात जाणार असून एवढ्या प्रचंड लोकसंख्येला लागणारे अन्नधान्य, ते पिकवण्यासाठी लागणारी साधने व पर्यावरण यांच्यात समतोल न राहिल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. त्याचा सामना करण्यासाठी जगाने आतापासून आपल्या आहारसवयी बदलाव्यात. यामुळे परिस्थितीत केवळ सुधारणा होणार नाही तर सर्वच देशांमधील लोकांचे जीवनमान सुधारेल व आयुष्यमान वाढेल, असा अहवाल ‘ईट’ ही स्वयंसेवी संस्था अाणि विख्यात वैद्यकीय प्रकाशन ‘लॅन्सेट’ने नुकताच प्रसिद्ध केला.


    या दोघांनी भविष्यात १० अब्ज लोकसंख्येला कसे अन्न पुरवता येईल यासाठी १७ देशांतील ३७ आहारतज्ज्ञांची मते मागवली. या तज्ज्ञांनी जगाने आपल्या अन्नधान्य उत्पादनात वाढ तसेच अन्नाची नासाडी कमी करण्याबरोबरच भौगोलिक प्रदेशानुसार आहारसवयीच बदलाव्यात, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी सुचवलेल्या आहारसवयी जगाने स्वीकारल्यास सुमारे ११ कोटी अकाल मृत्यू टळतील व प्रौढ मृत्युदरात १९ ते २३ टक्क्यांनी घट होईल, असे वाटते. ‘ईट’ व ‘लॅन्सेट’ने सुचवलेल्या आहारात तृणधान्ये, कंद, लाल मांस, भाज्या व फळे यांचा समावेश आहे. या आहारातील ३५ टक्के उष्मांक (कॅलरी) तृणधान्ये व कंदातून, १४ टक्के उष्मांक मांसातून अपेक्षित आहेत. रोजच्या आहारात किमान ५०० ग्रॅम भाज्या व फळे आवश्यक असल्याचे हा अहवाल सुचवतो. ‘ईट’ व ‘लॅन्सेट’च्या मते विकसित देशांतील लोकसंख्येने त्यांच्या भौगोलिक प्रदेशानुसार आहारातील ५० टक्के मांसाचे सेवन कमी करण्याची व त्या जागी डाळी, शेंगा, फळे, भाज्या यांच्यावर भर देण्याची गरज आहे. उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये गवत खाणाऱ्या नव्हे, तर फक्त धान्य खाणाऱ्या जनावरांचे मांस खाल्ले जाते. येथील सुमारे २ अब्ज लोकांच्या आहारसवयीच चुकीच्या असल्याने त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत.


    भारतात परिस्थिती जरा उलटी आहे. भारतामध्ये शाकाहारापाठोपाठ मिश् रअाहार घेतला जातो. मिश्र अाहारी मंडळी गवत खाणाऱ्या जनावरांचे मांस अधिक खातात, शिवाय मत्स्य आहारही येथे लोकप्रिय असल्याने विकसित देशात होणारे आजार सामान्यपणे आढळत नाहीत. पण भारतीय मत्स्य आहाराकडे वळले तर अाणखी आरोग्य सुधारेल, असे अहवालात म्हटले अाहे. ‘ईट’ व ‘लॅन्सेट’ने आहार, अन्नधान्याचे उत्पादन याबाबत पाच महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार लोकांच्या आहारसवयी बदलण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात यावे, अन्नाची नासाडी टाळण्यासाठी योग्य प्रकारची वाहतूक सेवा, गोदामे व शीतगृहांची उभारणी करावी, एकरी अधिक उत्पादन करणाऱ्या पिकांपेक्षा उच्चपोषण मूल्य असलेल्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावे, स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नवी कृषी उत्पादने घ्यावीत, नवी जमीन व समुद्र यांचा कृषी उत्पादनासाठी वापर करावा व अन्नधान्याची नासाडी टाळावी, या सूचना आहेत.


    या अहवालात भारतीयांच्या आहारसवयींविषयी फारसे बदल सुचवलेले नाहीत. पण निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा दर्जा वाढवण्याची सूचना केली आहे. भारतात वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी, गोदामांची कमतरता व निकृष्ट जातीची फळे तसेच भाज्यांच्या सेवनाने आहारात पोषण द्रव्यांचे प्रमाण कमी होते. भारतीयांच्या अन्नात गहू, भात व अन्य पिष्टमय पदार्थ अधिक असल्याने प्रोटीनची कमतरताही अधिक दिसते. यावर उपाय म्हणून भाज्या व फळे यांचे सेवन रोजच्या आहारात वाढवणे, गहू-भातापेक्षा अन्य धान्याचा वापर केल्याने भारतीयांचे आयुष्यमान बदलेल, असा अंदाज वर्तवला अाहे. आजपर्यंत विकसित देश व अन्य देशांनी काय खावे व काय खाणे टाळावे याबाबत असे सखोल शास्त्रीय, संशोधनात्मक अहवाल मांडले गेले नव्हते. ‘ईट व लॅन्सेट’ने जगाच्या तब्येतीची काळजी घेत सुदृढ आरोग्याचा रोडमॅप या माध्यमातून जगासमाेर ठेवला आहे.

Trending