Home | Editorial | Agralekh | Editorial

पाकिस्तानी ठेंगा (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Mar 04, 2019, 09:39 AM IST

 राजाैरी येथील ब्रिगेड आणि बटालियन मुख्यालयांना लक्ष्य करून पाकिस्तानने ज्या एफ-१६ लढाऊ विमानांतून अॅमरॅम क्षेपणास्त्रां

  • Editorial

    राजाैरी येथील ब्रिगेड आणि बटालियन मुख्यालयांना लक्ष्य करून पाकिस्तानने ज्या एफ-१६ लढाऊ विमानांतून अॅमरॅम क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि भारतावर युद्ध लादण्याचा प्रयत्न केला, त्या एफ-१६ विमानांचा वापर पाकिस्तानला चांगलाच भाेवणार, अशी चिन्हे स्पष्ट हाेत आहेत. अमेरिकेने याप्रकरणी पाकिस्तानला जाब तर विचारलाच, शिवाय चाैकशीही सुरू केली आहे. दहशतवादविराेधी लढाईत पाकिस्तानी सैन्य दलाची क्षमता वाढावी या हेतूने एफ-१६ विमाने १२ शर्तींसह पुरवण्यात आली असली तरी अमेरिकेच्या साऱ्या शर्तींना ठेंगा दाखवण्यास त्याने मागेपुढे पाहिलेले नाही. जगात सर्वाधिक शस्त्रास्त्र विक्री करणाऱ्या अमेरिकेकडून ग्राहक देशांशी ‘एंड युजर’ करार केला जाताे. पाकिस्तानशीदेखील करण्यात आला. ज्याद्वारे शस्त्रास्त्रांच्या दुरुपयाेगाच्या आराेपांची दखल गंभीरपणे घेतली जाते. तथापि, ‘ती’ विमाने एफ-१६ नव्हतीच असा दावा पाकिस्तानने सुरू केला हाेता. मात्र भारताने त्या विमानांचे अवशेष, डिजिटल सिग्नेचर आणि राजाैरीवरील हल्ल्यात आढळलेल्या एआयएम १२० सी क्षेपणास्त्राचा मुद्दा हे पुरावे म्हणून जगासमाेर मांडले.


    ही क्षेपणास्त्रे केवळ एफ-१६ विमानांतूनच डागता येऊ शकतात, अशी व्यवस्था असल्याने अमेरिकेलाही पाकच्या चुकीवर पांघरूण घालता आले नाही. एकंदरीत या सज्जड पुराव्यांमुळे पाकचा खाेटारडेपणा पुन्हा एकदा जगासमाेर आला. अखेर याची दखल घेत ‘एंड युजर’ करारातील शर्तींच्या आधारावर आता अमेरिकेने पाकिस्तानला जाब विचारला आहे. दरम्यान, ही विमाने देण्यापूर्वीच कदाचित याचा वापर भारताच्या विराेधात पाकिस्तान करेल, अशी भीती अमेरिकी खासदारांना वाटत हाेती. त्यामुळे २०१६ मध्ये आेबामा प्रशासनाने विमानांच्या विक्रीस बंदी घातली. आता ती भीती निरर्थक नव्हती, हे सिद्ध झाले आहे. तूर्तास भारत-पाकमधील वायुसेनेच्या संघर्षाला विराम मिळाला आहे. मात्र भारताविरुद्ध यापुढे पाकिस्तान आक्रमक कुरापत काढणारच नाही, असे गृहीत धरून कसे चालेल? एक मात्र खरे की, आता जाे पहिले पाऊल उचलेल त्याच्यावरच सद्य:स्थिती आटाेक्याबाहेर नेल्याची जबाबदारी येऊन पडेल. जाेपर्यंत पाकिस्तान जाहीरपणे दहशतवादाचे खंडन करून त्याविरुद्ध कारवाई करीत नाही, ताेपर्यंत त्याच्या हेतूबद्दल संशय राहणारच. म्हणूनच युद्धाची शक्यता असली तरी शांततेला संधी देण्याची ही याेग्य वेळ ठरते.


    पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत राहिलेला असला तरी भारताने नापाक इरादे माेडून काढण्याची, प्रसंगी दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची संधी कधी गमावली नाही. पुलवामा प्रकरणानंतरही संयम राखून भारताने त्याच भूमिकेचा प्रत्यय घडवला. परंतु, युद्धज्वराने पछाडलेला पाकिस्तान हाेश गमावून बसलेला पाहायला मिळाला. पाकिस्तानी लढाऊ विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसल्यानंतर भारतीय वायुसेनेने मिग-२१ विमानांच्या बळावर त्यांना पिटाळून लावले. या विमानांनी १९७१ च्या युद्धात देदीप्यमान कामगिरी केली असली तरी आता निवृत्तीच्या बेतात आहेत. एकीकडे जगभरात चाैथ्या जनरेशनमधील विमाने वापरली जात असताना ढिसाळ धाेरण, हितसंबंधांमुळे भारतात काेणताही संरक्षण करार जलद गतीने हाेऊ शकला नाही. उलटपक्षी पाकिस्तानकडे एफ-१६ विमानांचा ताफा आहे, हा फरक धाेरणकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. मिग-२१ चे वायुसामर्थ्य आणि अभिनंदन वर्तमानच्या काैशल्यामुळे एफ-१६ विमानांना सळाे की पळाे करणे शक्य झाले. भारतीय मिग-२१ चे सारथ्य करणे ही या कुटुंबाची परंपरा राहिली आहे. अभिनंदनचे वडील निवृत्त एअरमार्शल स्मिहाकुट्टी वर्तमान हेसुद्धा मिग-२१ चे वैमानिक होते. एअरमार्शल पदावरून ते पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले. अभिनंदनचे आजोबा वायुसेनेत होते, हे इथे उल्लेखनीय ठरावे. खरे तर प्रत्येक लढाईत शस्त्रांपेक्षा काैशल्यही महत्त्वाचे ठरते, याची प्रचिती अभिनंदनने घडवली. मात्र, आता जागतिक युद्धकाैशल्य आणि तंत्रज्ञान पाचव्या जनरेशनमध्ये पाेहाेचले असताना भारतानेही अत्याधुनिक शस्त्रास्त्रबळ वाढवण्याची गरज अधाेरेखित हाेते.


    जगभरातील देश दहशतवादाच्या मुद्द्यावर या क्षणी भारताच्या बाजूने असले तरी सीमेवरील युद्ध भारतीय सैनिकांनाच लढायचे आहे. या युद्धात विजय मिळवण्यासाठी हवे ते शस्त्रबळ आणि राजकीय इच्छाशक्ती, त्यास पर्याय नाही. उल्लेखनीय म्हणजे भारतीय वायुसेनेकडे ३३ स्क्वॉड्रन शिल्लक आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये १६ ते १८ लढाऊ विमाने असतात. यापैकी ११ स्क्वॉड्रनमध्ये मिग-२१ आणि मिग-२७ आहेत. फक्त ६० टक्के कार्यान्वयनासाठी तयार आहेत. शेजारी राष्ट्रांकडून संभाव्य धोका लक्षात घेता भारताला ४५ स्क्वॉड्रनची गरज आहे. तेजस ३४ वा, आणि फ्रान्सकडून रफाल मिळाल्यास तो ३५ वा स्क्वॉड्रन ठरेल. टाटा आणि लाॅकहिड मार्टिनच्या सहयाेगातून भारतात एफ-१६ विमानांची निर्मिती सुरू झाल्यास ते ३६ वे स्क्वॉड्रन बनू शकेल. एकूणच ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेता पाकिस्तानी ठेंगेबाजीला चाेख प्रत्युत्तर देण्यासाठी शस्त्रास्त्रसिद्धता भारतासाठी किती गरजेची आहे, हे लक्षात यावे.

Trending