देशद्राेही काेण? (अग्रलेख) / देशद्राेही काेण? (अग्रलेख)

सर्जिकल स्ट्राइकचे आणि आता पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे देशद्रोही आहेत

दिव्य मराठी

Mar 05,2019 10:52:00 AM IST

सर्जिकल स्ट्राइकचे आणि आता पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे देशद्रोही आहेत, असा भाजपकडून होणारा प्रचार अपेक्षितच होता. अशा प्रचाराचा रोख थेट फक्त काँग्रेस पक्षाच्या दिशेने ठेवणे ही भाजपची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखलेली रणनीती आहे हे स्पष्ट आहे. पण असे राजकीय हल्ले करून देशातले भाजप सरकार पाकिस्तानविरोधातल्या भूमिकेवरून आपल्या देशातच दुही असल्याचे जगाला दाखवत असेल तर तो करंटेपणाच समजायला हवा. भाजपला आगामी लोकसभा निवडणुकांत नोटबंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा गंभीर प्रश्नांची उत्तरे द्यायला अडचणी येणार आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे विरोधकांची कोंडी करण्यासाठी पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईचीच फक्त चर्चा व्हावी व त्याने निवडणुका जिंकता येतील, अशी भाजपची रणनीती आहे. मात्र, हा भ्रम आहे. हा भ्रम काही काळ टिकवून ठेवण्यात ते यशस्वी ठरले तरी भारतीय हवाई दलाच्या एका हल्ल्याने जैश-ए-मोहंमद ही दहशतवादी संघटना ना मुळापासून उखडून गेली आहे ना त्यामुळे पाकिस्तानने दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे धोरण बंद केले आहे, हे विसरता कामा नये. उलट दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले करून स्वत:ची लष्करी ताकद एकमेकांना दाखवली आहे. याचा अर्थ फक्त मोदीच जिंकले असा होत नाही.


विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करून पाकिस्तानने शांततेचा हात पुढे करण्याची जी चाल खेळली आहे, त्यावर मोदींना मात करता आलेली नाही. इम्रानच्या या चालीतून सुटका करवून घेण्यासाठी मोदी आता काँग्रेसवर घसरत आहेत. तसे नसते तर मोदींनी गुजरातमधील एका भाषणात रफालमुळे भारतीय हवाई दलाची सज्जता अधिक वाढली असती व रफाल विमाने कारवाईत दिसली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असे विधान केले नसते! मोदींनी असे विधान करून बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाच्या पराक्रमाला नख लावण्याचा प्रयत्न केला आहे.


मोदींचे असे जर-तरचे प्रश्न गांभीर्याने घेतल्यास १९७२ मध्येच भारताने आपली पहिली अणुचाचणी पाकिस्तानविरोधात केली असती तर बालाकोट घडलेच नसते, असे म्हणता येईल; पण तसे होत नसते. आपल्या हवाई दलाने वापरलेली मिराज, मिग-२१ विमाने जुनी असली तरी ती अत्याधुनिक आहेत व त्यानेच दहशतवादी तळांचा अचूक वेध घेतला हे जगाने पाहिले आहे. खुद्ध हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी आमची कामगिरी फत्ते झाली आहे, मेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा मोजण्याचे काम आमचे नाही, असे स्पष्ट केले आहे. गेल्याच आठवड्यात लष्कराच्या तिन्ही दलांनी बालाकोट कारवाई यशस्वी झाल्याचे म्हटले होते, पण त्यांनी मृत दहशतवाद्यांचा आकडा दिला नव्हता. एवढी परिस्थिती स्पष्ट असतानाही भाजपचे अध्यक्ष अमित शहा बालाकोट हल्ल्यात २५० हून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा करतात, तो कशाच्या आधारावर? त्यांचा कुणाच्या माहितीवर भरवसा आहे? अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष आहेत ते सरकारमधले मंत्रीही नाहीत, तरीही ते धडधडीत िवधाने करत असतील तर या कारवाईच्या निमित्ताने आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारणच ते करत आहेत. मोदी सरकार सत्तेवर येईपर्यंत भारतात झालेल्या प्रत्येक दहशतवादी कारवाईचे उत्तर भारतीय लष्कराने वेळोवेळी दिले आहे. त्या वेळी गोपनीयता म्हणून अशा कारवाईचा राजकीय पातळीवर बभ्रा केला जात नव्हता.


२००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने व लष्कराने पाकिस्तानची अनेक पातळ्यांवर मुस्कटदाबी केली होती. कसाब हा पाकिस्तानी दहशतवादी आहे, असे सिद्ध करून त्याला फाशी देण्यात आले होते. यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय समुदायात ‘दहशतवादाला प्रोत्साहन देणारे राष्ट्र’ अशी प्रतिमा तयार झाली. ही प्रतिमा आजही आपल्या परराष्ट्र खात्याला कामी येते. हे यश आपल्या परराष्ट्र खात्याचे व लष्करी व्यवस्थेचे नव्हे का? हे यश केंद्रात फक्त काँग्रेस सरकार होते म्हणून मोदी सरकार नाकारत असेल तर त्यांचा दृष्टिकोन संकुचित म्हणावा लागेल. वाजपेयी सरकार सत्तेत असताना कारगिल युद्ध घडले होते. त्या वेळी वाजपेयींनी लष्करी कारवाई करण्याअगोदर सर्वपक्षीयांशी सल्लामसलत केली होती आणि त्यामुळे वाजपेयींनी कारगिल मुद्दा निवडणुका जिंकण्यासाठी प्रचारात आणला नव्हता. पण बालाकोटवर हल्ला करण्याअगोदर पंतप्रधान म्हणून मोदींनी सर्वपक्षीयांशी चर्चा करण्याची संसदीय परंपरा पाळली नाही. यावर सर्वच पक्षांनी हरकत नाेंदवली. त्यात देशद्रोह कुठून दिसला? असा प्रश्न विचारणे, रफाल कथित घोटाळ्याचे मुद्दे उपस्थित करणे देशद्रोह असेल तर बोफोर्सचा कथित घोटाळा चव्हाट्यावर आणणारे त्या वेळचे विरोधक, ज्यात भाजपही अग्रेसर होता, देशद्रोही समजावेत का?

X
COMMENT