Home | Editorial | Agralekh | Editorial

नाणार काेणत्या वाटेनं जाणार? (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Mar 06, 2019, 10:03 AM IST

‘नाणार होणार, येणार, जाणार’, अशा घोषणा रत्नागिरी जिल्ह्यात चार वर्षांपासून घुमत होत्या. कोकणात कोणत्याही प्रकल्पाची घोषण

 • Editorial

  ‘नाणार होणार, येणार, जाणार’, अशा घोषणा रत्नागिरी जिल्ह्यात चार वर्षांपासून घुमत होत्या. कोकणात कोणत्याही प्रकल्पाची घोषणा होताच तेथे आधी त्याचे जंगी स्वागत केले जाते. मग आस्तेआस्ते अंधश्रद्धा पसरवली जाते. नंतर विविध विकासविरोधी मंच, नागरी हक्क, पर्यावरण संवर्धन समित्या उगवतात. या मंडळींकडून प्रकल्पाविरोधात वातावरण तापवले जाते, मग तापलेली हवा पाहून अखेरचा घाव घालण्यासाठी शिवसेना किंवा भाजप हे पक्ष सज्जच असतात. प्रकल्प रद्द होताच सगळ्यांना होणारा आनंद अभूतपूर्व असा असतो. पण खरा खेळ पुढे असतो. रद्द केलेले प्रकल्प मागच्या दाराने आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले जातात. अखेरचा घाव घालणारी मंडळी एकमेकांच्यात कॉम्प्रमाइज करतात, विस्थापितांची बाजू घेणारे, विकासाचे कट्टर विरोधक विकासाची भाषा बोलायला लागतात, मवाळ विरोधक सत्तेत वाटा मिळाल्याच्या खुशीत राहतो. अशा तऱ्हेने प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम सुरू होते.


  महाराष्ट्राच्या इतिहासात एन्रॉन, रायगड एसईझेड, जैतापूर हे विकास प्रकल्प ही काही ठळक उदाहरणे आहेत. त्यात आता नाणारची भर घालावी लागेल. गेल्याच महिन्यात रद्द झालेला नाणार आता रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातल्या रोह्याच्या दिशेला वाटचाल करत असून असे बोलले जातेय की मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेकडील उद्योग खात्याला अंधारात (?) ठेवून हा प्रकल्प जसाच्या तसा उचलून रोहा, अलिबाग व मुरूड जिल्ह्यांतील सिडकोच्या ५० हजार एकर जमिनीवर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या तीन तालुक्यांतील ४० गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे व आता फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत सिडको महामंडळ असल्याने शिवसेनेकडे असलेले उद्योग खाते काहीही हस्तक्षेप करू शकणार नाही, असा डाव मुख्यमंत्र्यांनी खेळल्याचे बोलले जातेय. पण हा डाव शिवसेनेशी संगनमत करून खेळला गेल्याचेही म्हणता येईल, असा या प्रकल्पाच्या घोषणेनंतर रद्द करण्यापर्यंतचा प्रवास आहे.


  रत्नागिरीत नाणार प्रकल्प व्हावा म्हणून भाजप आग्रही होता. पण त्याविरोधात काही नागरी चळवळींनी दंड थोपटल्याने व त्यातून आपल्याला राजकीय नुकसान पोहोचत असल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली. हे वातावरण तापत असल्याने राजकीय विजनवासात पडलेल्या नारायण राणेंसाठी ही आयतीच संधी होती. त्यांनी भाजपपेक्षा शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली. ‘शिवसेनेचे दिल्लीतले नेते प्रकल्प मंजूर करतात व राज्यातले उद्योगमंत्री प्रकल्पाबाबत अधिसूचना काढतात,’ असा आरोप करत राणेंनी या दुटप्पीपणाविरोधात रान उठवले. राणेंचा विरोध व आपला विरोध एकाच मुद्द्यावर आहे हे लक्षात आल्याने शिवसेनेची पंचाईत झाली. त्यांनी राणेंचा काटा काढण्यासाठी युतीच पणाला लावली. गेल्या महिन्यात शिवसेना-भाजपमध्ये जे मनोमिलन झाले त्यामागील एक कारण रत्नागिरीतून हा प्रकल्प रद्द व्हावा हे होते. म्हणजे राणेंना त्याचे श्रेय नको या एकाच मुद्द्यावर हे राजकारण खेळले जात असताना केंद्रात भाजपकडून या प्रकल्पाच्या उभारणीबाबत वेगळाच डाव मांडला जात होता.


  शिवसेना-भाजपने युतीची घोषणा केली त्याच दरम्यान सौदी अरेबियाचे राजपुत्र सलमान भारतभेटीवर आले होते. सौदीकडून नाणार प्रकल्प उभा केला जात असल्याने या देशाची मदत नाकारणे भारताला परवडणारे नव्हते. राजे सलमान यांनी पाकिस्तानला २० अब्ज डॉलर मदत दिल्यानंतर तर नाणार रद्द करण्याच्या शक्यताच मिटल्या होत्या. त्यामुळे हा पेच सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी आपल्या चर्चेत नाणारचा उल्लेखही केला नाही. म्हणजे तेव्हाच स्पष्ट झाले होते की, प्रकल्पाची केवळ जागा बदलल्यास नाणारमधील आंदोलने मिटू शकतात, राज्यातील युती अबाधित राहू शकते आणि राणेही खुश होऊ शकतात. आता वेगळे काय दिसते?


  महाराष्ट्र हे देशातल्या औद्योगिक विकासात अग्रेसर राज्य म्हटले जात असले तरी कोकणात जेव्हा विकास प्रकल्प आणले जातात तेव्हा राजकीय साठमाऱ्या जोरकसपणे खेळल्या जातात. तेथील राजकारण तापवले जाते. विज्ञानाची भाषा लोकांपर्यंत पोहोचू दिली जात नाही. प्रकल्पामुळे पर्यावरणाची अतोनात हानी होईल हा बागुलबुवा दाखवत विरोधाचा मोठा लढा उभा केला जातो. एन्रॉन व जैतापूर अणुप्रकल्पाबाबत गैरसमज पसरवण्यात शिवसेना व भाजप पुढे होते. कारण या प्रकल्पांची घोषणा ते विरोधी पक्षात असताना झाली होती. आता सत्तेत आल्यानंतर एन्रॉन काय, जैतापूरचेही शुद्धीकरण या दोघांनी केले. आता नाणार प्रकल्पाची वाटचाल त्याच दिशेने आहे. उद्या या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी दोघेही नाचतील. मग प्रश्न उरतो, तुमचा विरोध कशासाठी होता?

Trending