आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतराचा ‘घरंदाज’ वारसा (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हल्ली व्याख्याने देतात आणि संशोधन करतात. त्यांचे वय आहे अवघे ५७ वर्षे. त्यांच्या दोन्ही मुली, मलाया आणि साशा राजकारणात येतील, अशी शक्यता नाही. भारतातील एखाद्या नेत्याबद्दल असे घडले, तर आपल्याकडे मात्र हे त्याचे जणू अपयशच मानले जाईल. तहहयात राजकारण करावे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचीही व्यवस्था तोवर करुन ठेवावी, हे भारतीय राजकारणाचे व्यवच्छेदकत्व होत चालले आहे. एखाद्या नेत्याचा मुलगा वा मुलगी असणे ही राजकारणात येण्यासाठीची अपात्रता नक्कीच नव्हे. पण, ‘फॅमिली बिझनेस’च्या या उद्योगात लोकशाहीची जी थट्टा आपण अनुभवत आहोत, ती भयावह वळणावर आहे. 


निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की पक्षांतराचे पीक येते. १७ व्या लाेकसभेची रणधुमाळी सुरू हाेताच नेत्यांचे शुद्धीकरण करून त्यांना आपल्या गटात आेढण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून राज्यात ‘नंबर वन’चे बिरुद मिरवणारा भाजप त्यात यंदाही आघाडीवर आहे. नगर जिल्ह्यातील डाॅ. सुजय विखे यांनी सांसदीय कारकीर्दीचा श्रीगणेशा करण्यासाठी भाजपचा झेंडा हाती धरला. 


विखे कुटुंबीयांची बहुतांश कारकीर्द काँग्रेसी संस्कारात बहरली.  याच पक्षाच्या कृपेने सुजयचे आजाेबा, वडिलांनी सत्तेची फळे चाखली, आजही चाखत आहेत. असे असताना केवळ खासदारकीच्या इर्षेपाेटी सुजयने विराेधी विचारांच्या पक्षाच्या वळचणीला जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या इच्छेविरुद्ध हा निर्णय घेतल्याचे सुजय सांगत असले तरी सत्ताप्राप्तीसाठी पक्षबदलाची तीन पिढ्यांची ‘परंपरा’ असलेल्या विखे कुटुंबीयांची सुजयच्या निर्णयाला मूकसंमती असणे ही बाब लपून राहिलेली नाही.  दुसरीकडे निवडून येण्याची क्षमता असलेला एक ‘बडा मासा’ गळाला लागल्याच्या आनंदात मुख्यमंत्र्यांनीही त्याचे पालकत्व स्वीकारले. त्यापाठाेपाठ  शिवसेनेनेही सुजयच्या वडिलांना राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेत प्रवेशाचे जाहीर निमंत्रण दिले आहे. भाजपचे खासदार संजय काकडेंनी काँग्रेसला जवळ करण्याची तयारी केली, तर शिवसेनेत असलेल्या अमाेल काेल्हेंनीही नुकतेच हाती ‘घड्याळ’ बांधले. मनसेचे इंजिन साेडून आमदार शरद साेनवणेंनी शिवबंधन बांधले. याचाच अर्थ सर्वच राजकीय पक्षांत अशी रस्सीखेच सुरू झालीय. तिकडे नातवासाठी खुद्द शरद पवारांनी माघार घेतली. (त्यामुळे दुसरा नातू मात्र रुसला, हे आणखी वेगळेच. रुसण्याचीही संधी इतरांना नाही!)


मुळातच,  देशाच्या राजकारणात घराणेशाहीचे जे वर्चस्व आहे ते अबाधित ठेवण्यासाठी, सर्व सत्तापदे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, पुढच्या पिढीला ती विनासायास उपलब्ध करून देण्यासाठी दिग्गज नेत्यांची धडपड सुरू असते. त्यासाठी पूर्वी आपल्या पक्षाला ‘प्रायव्हेट लिमिटेड’ बनवून त्याचा स्वत:च्या कुटुंबीयांसाठीच वापर केला जायचा. मात्र, आता ‘सत्तेसाठी काय पण...’ करणाऱ्या नेत्यांनी राजकीय विचारसरणीचे संस्कार पायदळी तुडवून, विराेधी विचारसरणीच्या पक्षाला शरण जाण्यापर्यंतची लाचारी स्वीकारलेली दिसते.   मात्र मूग गिळून गप्प बसण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही, अशा भावनेतून मतदार लाेकशाहीचे हे वस्त्रहरण पाहतात. मतदारांनी इतकेही हतबल हाेण्याची गरज नाही. घराणेशाहीच्या या मनमानीला,  बेबंदशाहीला चाप बसवण्याची ताकद लाेकशाहीने आपल्याला दिलेली आहे,  हे निवडणुकीच्या काळात तरी मतदाराने विसरू नये.  आपल्याकडे असलेली घटनादत्त ताकद आेळखून त्याचा प्रभावी वापर येणाऱ्या मतदानाच्या वेळी करायला हवा. ज्या नगर जिल्ह्यातील पक्षांतराची आज चर्चा आहे,  त्याच जिल्ह्यातील श्रीगाेंद्याच्या मतदारांनी २०१४ च्या निवडणुकीत सत्तेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या बबनराव पाचपुतेंना घरचा रस्ता दाखवला हाेता, हे विसरता येणार नाही.


रामायणात एक कथा सांगितली जाते. हनुमानाला त्याच्या शक्तीचा विसर पडण्याचा शाप मिळाला हाेता. मात्र जेव्हा सीतेच्या शाेधासाठी समुद्रलंघन करण्याची वेळ आली तेव्हा चिंताग्रस्त हनुमानाला जांबुवंताने सुप्त शक्तीची जाणीव करुन दिली. ती आठवताच हनुमानाने एका उड्डाणात समुद्र पार करून केवळ लंका गाठलीच नाही, तर तिचे दहनही केले. तद्वतच आज मतदारालाही मतसामर्थ्याचे विस्मरण झालेले आहे. निवडणुकीच्या वेळी त्याची आठवण करुन द्यायला हवी. तरच ते लाेकशाहीची पायमल्ली करणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवू शकतील. काॅंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही आज अहमदाबादेतील भाषणात ‘मतदारांनी भूलथापांना बळी न पडता जागरुक राहून याेग्य पर्याय निवडावा, हीच खरी देशभक्ती आहे,’ असे आवाहन केलेले आहे. नागरिकत्वाच्या अधिकाराचा अर्थ समजणे आणि तो जपण्यासाठी सजग राहाणे म्हणजे राष्ट्रवाद, असे त्यांनी म्हटले आहे. प्रियांकांकडेही घराणेशाहीच्या अंगाने पाहिले जाऊ शकते. पण, त्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादाचा आशय समजण्यासाठी त्यांचे हे आवाहन आज तितकेच महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...