आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकांचा राष्ट्रवाद (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रफाल, नोटाबंदी, बड्या भांडवलदारांना मोदी सरकारने करून दिलेले मोकळे रान याबाबत एकही शब्द न बोलता गुजरातमधल्या एका सभेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मतदारांना जागरूकता ठेवण्याचे आवाहन केले आहे. जागरूक असणे हीच देशभक्ती असून ‘मत’ नावाचे मोठे शस्त्र तुमच्या हाती आहे. कोणालाही न दुखावता, शारीरिक नुकसान न करता मोदी सरकारला या शस्त्राने त्यांची जागा दाखवून द्या असे त्या म्हणाल्या. प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचे त्यांचे हे पहिले राजकीय भाषण होते. गेल्या महिन्यात लखनऊमधील रोड शोच्या माध्यमातून प्रियंका यांनी राजकारणात पदार्पण केले होते, पण त्या रोड शोमध्ये त्यांनी भाषण केले नव्हते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यादरम्यान प्रियंका यांनी आपली पत्रकार परिषद शहिदांना श्रद्धांजली वाहून रद्द केली होती. त्यामुळे गांधीनगर येथील सभेत त्या काय मुद्दे मांडताहेत आणि काँग्रेसला त्या कोणती िदशा देताहेत याकडे सर्वांचेच लक्ष होते. १२ मार्च रोजी गुजरातमधून काँग्रेसने लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणे याला म. गांधींच्या दांडी पदयात्रेचा ऐतिहासिक संदर्भ आहे. मूठभर मीठ उचलून ब्रिटिश सत्तेचा पाया खचवणारी म. गांधींची ती पदयात्रा होती. प्रियंका यांनी या इतिहासाची आठवण करून देत २०१९ची लोकसभा निवडणूक स्वातंत्र्य चळवळीपेक्षा कमी  नाही, असे मतदारांपुढे म्हणणे याला देशातील बदललेल्या राजकीय असंतोषाची पार्श्वभूमी आहे. काँग्रेसमधील एक नवी तरुण पिढी स्वातंत्र्य चळवळीतील व्यापक राष्ट्रवाद हाती घेऊन राजकारणात येतेय याचे हे चिन्ह म्हणावयास पाहिजे. काँग्रेसने मोदी व संघ परिवार केवळ आपलेच नव्हे, तर देशाच्या सेक्युलर व सहिष्णू राजकीय संस्कृतीचे खरे विरोधक आहेत हे मनात पक्के धरून आक्रमक आघाडी उघडल्याचा तो स्पष्ट संदेश आहे. या संदेशाच्या वाहक भविष्यात प्रियंकाच असतील हे दिसून आले.     


दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या, स्वत:ला कट्टर सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसपुढे भाजपने कडवा राष्ट्रवाद उभा केला आणि त्याला उत्तर देताना काँग्रेसने बराच वेळ घेतला. भाजपच्या राष्ट्रवादाला स्वातंत्र्य चळवळीचा संदर्भ नाही. मुस्लिमविरोध, पाकिस्तानविरोध म्हणजे राष्ट्रवाद अशी सरसकट व्याख्या त्यांची आहे. पण ही व्याख्या गेल्या पाच वर्षांत भाजपने देशाच्या अनेकांगात एखाद्या व्हायरससारखी पसरवली आहे. हा व्हायरस कधी जेएनयूच्या विरोधातून िदसला, तर कधी डाव्या विचारवंतांना अर्बन नक्षलवादी ठरवून, कधी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या सामान्य माणसाला देशद्रोही ठरवून. त्यात मोदी व संघ परिवाराच्या आक्रमक राष्ट्रवादाला विरोध करणारी उदारमतवादी, लोकशाहीवादी, परिवर्तनवादी मंडळी देशद्रोही ठरवली गेली. देशातील अन्य प्रादेशिक पक्षांनीही भाजपच्या कथित राष्ट्रभक्ती-राष्ट्रवादापुढे साक्षात लोटांगण घातले. इतके गढूळ वातावरण असताना प्रियंका यांनी मतदारांनी सतत जागरूक राहणे हे देशभक्तीचे लक्षण आहे असे म्हणणे हे भाजपच्या कथित राष्ट्रवादाला अडचणीत टाकणारे आहे. प्रियंकांनी मतदारांच्या जागरूकतेचा देशभक्तीशी जोडलेला संबंध भाजप-संघ परिवारापुढे एक पेच आहे. कारण पाकिस्तानविरोधात केलेले सर्जिकल स्ट्राइक वा आता केलेला पुलवामा हल्ला यावरून मोदी सरकारला बरेच अडचणीचे प्रश्न विचारले जात आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे न देता प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न भाजप-संघ परिवाराकडून सातत्याने होत आहे. अशा वेळी भाजपच्या जाळ्यात शिरून त्यांच्या कथित राष्ट्रवादाला प्रश्न विचारणारा स्वातंत्र्य चळवळीचा पाया असलेला आक्रमक नव्हे, तर संयत पण खंबीर राष्ट्रवाद जर प्रियंका नव्याने उभा करत असतील तर देशाच्या राजकारणाला ते विलक्षण वळण देणारे आहे. मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून आज काँग्रेस भाजपच्या राष्ट्रवादाला प्रश्न विचारत असेल तर भाजपविरोधात एकाच वेळी राजकीय आघाडी व वैचारिक आघाडी उभी करणारी ही रणनीती आहे हे समजून घेतले पाहिजे.    


२०१४ नंतर भाजपने हिंदुत्व व राष्ट्रवाद या मुद्द्यांवर काँग्रेसची अनेकदा कोंडी केली आहे. मुस्लिमांचा अनुनय करणारा पक्ष येथपासून डॉ. मनमोहनसिंग देशद्रोही आहेत इथपर्यंत भाजपने मजल मारली आहे. भाजपच्या अशा प्रचारतंत्राला खुबीने उत्तर देणे गरजेचे होते. म्हणून गुजरात विधानसभा निवडणुकांत भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमक केला तेव्हा त्याला प्रत्युत्तर देत राहुल गांधी यांनी हिंदू मंदिरांना दर्शन देण्यास सुरुवात केली. आज भाजपच्या कथित राष्ट्रवादावर मतदारांनीच प्रश्न विचारावेत असे आवाहन प्रियंका करत असतील तर भाजपला आपल्या राष्ट्रवादाची पुन्हा तपासणी करावी लागेल. निवडणुका आल्या की सत्ताधाऱ्यांना उत्तरे द्यावी लागतात, सत्ताधाऱ्यांची ही अडचण पाहून प्रियंका यांनी राष्ट्रवादाचा मुद्दा उचलला आहे.

बातम्या आणखी आहेत...