आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ या प्राचीन मंदिराला हिंदू भाविकांना भेट देता यावी, यासाठी भारताने पाठवलेल्या प्रस्तावाला पाकिस्तानने संमती दिली आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील शीख भाविकांसाठी कर्तारपूर मार्गिका सुरू केल्यानंतर पाकिस्तानचे हे अन्य धर्मीयांविषयी सद्भावना व्यक्त करणारे पाऊल ठरावे. ही घटना घडली असतानाच होळीच्या दिवशी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण अाणि नंतर त्यांचे धर्मांतर करून विवाह लावणाऱ्या एका मौलवीलाही भारताच्या दबावामुळे पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली. या दोन घटना भारत-पाकिस्तान संबंधात पुलवामा हल्ला प्रकरणानंतर जो कडवटपणा निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठराव्यात. उभय देशांमधला तणाव निवळावा म्हणून जी ‘ट्रॅक –टू डिप्लोमसी’ सातत्याने सुरू असते त्याची ही फलनिष्पत्ती आहे. सतत युद्धजन्य वातावरण निर्माण होणे कोणाच्याही हिताचे नाही, असे या घटनेतून प्रतीत होते. 


मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ नये यासाठीचेही हे प्रयत्न आहेत. आजपर्यंतच्या भारत-पाकिस्तान राजकारणात शांतता व सद्भावना प्रस्थापित करताना राजनयिक पातळीवर दबावाचे पेच टाकले जात होते आणि तसे खेळ सध्या भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू आहेत. शारदा पीठाचा प्रस्ताव पाकिस्तानने मान्य करण्यामागे त्यांच्या हिताची बरीच राजकीय समीकरणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपला देश भारताशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मूलभूत पातळीवर म्हणजे दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये संवाद वाढवण्याचे प्रयत्न करत असून भारतातील बहुसंख्य हिंदूंच्या भावना आम्ही समजून घेतो, असे जगापुढे पाकिस्तान सांगण्यास उत्सुक आहे. ती त्यांच्या दृष्टीने गरजही आहे. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की, पाकिस्तानातील मुस्लिम भाविकांना भारतातील अजमेर शरीफसारख्या दर्ग्याचे दर्शन घेता यावे म्हणून भारताने पूर्वीच परवानगी दिली आहे आणि तेथील भाविक दरवर्षी अजमेरला येत असतात. 


दोन्ही देशांतील हिंदू व मुस्लिम धर्मीयांच्या भावनांचा आदर राखत असताना राजकीय मतभेदांना थारा न देण्याच्या हेतूने घेतलेली ही दक्षता म्हणावी. त्यात गैर काहीच नाही. शेवटी दोन्ही देशांतील राजकीय व्यवस्थांना प्रत्यक्ष राजकारण व समाजकारण यात भेद करावे लागतात, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. अंतिमत: दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध जोपर्यंत दृढ होत नाहीत, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही हे वास्तव आहे.   


दुसरीकडे शारदा पीठ मंदिर मार्गिका प्रस्ताव मंजूर करताना पाकिस्तानला सिंध प्रांतातील हिंदू अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा मुद्दा अडचणीचा ठरला. कारण तेथील हिंदू अल्पसंख्याक समाज या अपहरणामुळे संतप्त होऊन सरकारविरोधात रस्त्यावर उतरला; त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले. भारताने या घटनेची माहिती पाकिस्तानमधील भारतीय दूतावासाकडून मागवली व इम्रान खान यांच्या सरकारवर संबंधितांवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढवला. आजपर्यंत भारतातील मुस्लिम समुदायावर हल्ले झाल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात रान उठवत होता. भारतातील मुस्लिम सुरक्षित नाहीत, असा त्यांचा अजेंडा असे. त्याला प्रत्युत्तर देण्याची संधी भारताला हिंदू मुलींच्या अपहरण प्रकरणातून मिळाली. पाकिस्तानामध्ये हिंदू व शीख समुदायातल्या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना अनेकदा घडत असतात. 


स्थानिक पोलिस यंत्रणा अशा घटना रोखण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. अशा अपहरणातून तेथील राजकीय पक्ष व दहशतवादी संघटना राजकीय फायदे घेत असतात हे लपून राहिलेले नाही. अशा वेळी भारताने हिंदू मुलींच्या अपहरणाचा मुद्दा मानवाधिकाराचे उल्लंघन या दृष्टिकोनातून जगापुढे आणल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली व त्यांंना पावले उचलावी लागली. पाकिस्तानात अल्पसंख्याक समाजातील अल्पवयीन मुलींचा जबरदस्तीने लावण्यात येणारा विवाह, त्यांचे अपहरण याबाबत ठोस असा राष्ट्रीय स्तरावरचा कायदा नाही. जे कायदे आहेत ते प्रांतानुसार आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत. सात महिन्यांपूर्वी इम्रान खान यांनी सत्तेवर येताच ‘नया पाकिस्तान’चे स्वप्न दाखवत आपले सरकार देशातील अल्पसंख्याक समाजाचे संरक्षण करेल, असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्याच कारकीर्दीत हिंदू अल्पसंख्याक समाजावर हल्ले करण्यापासून या समाजाविषयी आक्षेपार्ह टीका करण्यापर्यंत अनेकांची मजल गेलेली दिसून येते. इम्रान खान यांच्या सरकारमधील एका मंत्र्यालाच हिंदूंवर टीका केल्याप्रकरणी मंत्रिपद सोडावे लागले. पाकिस्तानात ‘ईश निंदा’ कायदा कठोरपणे राबवला जात असल्याने या कायद्याच्या आडून झुंडशाही अल्पसंख्याक समाजावर हल्ले करत असते, हे अनेक वेळा दिसून आले. ही झुंडशाही पाकिस्तानातील उदारमतवादी व लोकशाहीवादी मंडळींचा आवाज दडपून टाकत असते. एकूणात इम्रान खान सरकारसमोर पाकिस्तानची प्रतिमा दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान आहे, त्यासाठी त्यांना भारताशी सलोखा साधूनच काम करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...