Home | Editorial | Agralekh | editorial

इस्रायलचा ‘चौकीदार’! (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Apr 11, 2019, 09:31 AM IST

शेतीचे प्रयोग आणि तेल अवीवसारख्या स्मार्ट सिटीसाठी इस्रायल भलेही प्रख्यात असो, तिथले अंतःप्रवाह वेगळे आहेत.

  • editorial

    शेतीचे प्रयोग आणि तेल अवीवसारख्या स्मार्ट सिटीसाठी इस्रायल भलेही प्रख्यात असो, तिथले अंतःप्रवाह वेगळे आहेत. ८० लाख लोकसंख्येच्या इस्रायलच्या दुप्पट आपली एकटी मुंबई आहे. इस्रायलच्या प्रयोगांचे गोडवे गायला हरकत नाही. पण, तिथल्या राजकीय संस्कृतीशी नाते सांगायला लागू, तर ते कमालीचे विसंगत ठरणार आहे. इस्रायलमध्ये जे घडते आहे, ते काळजी वाढवणारे आहे. अर्थात, जन्मापासूनचा प्रवास पाहिला, तर इथे आणखी काही वेगळे घडणे अपेक्षितही नव्हते.


    इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा कट्टरपंथी पक्ष सलग पाचव्या निवडणुकीत सत्तास्थानी पाेहोचत अाहे. निकाल अद्याप स्पष्ट नसले तरी कल स्पष्ट आहे. भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांच्या अाघाडीला ६५ जागा, तर विरोधी ब्ल्यू अँड व्हाइट पक्षाला ३५ जागा मिळतील, असा कल दिसतो आहे. इस्रायल राष्ट्र म्हणून घोषित करणारा वादग्रस्त कायदा आल्यापासून देशामध्ये अल्पसंख्याक अरब समाजात तीव्र नाराजी पसरली होती. शेजारील अरब राष्ट्रांमध्ये अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर इस्रायल निवडणुकीकडे अरब राष्ट्रांचे लक्ष होते. यंदाच्या निवडणुकीला अरबी अल्पसंख्याक व बहुसंख्य ज्यू यांच्यातील सांस्कृतिक अस्मितावादाची किनार होती. शिक्षण, आरोग्य मूलभूत सुविधांपासून आम्हाला दुजाभावाची वागणूक दिली जाते, असा अरब अल्पसंख्याक समाजाचा नेहमीच आराेप राहिला आहे. इस्रायलला ज्यू राष्ट्र म्हणून घोषित केल्यानंतरची ही निवडणूक. इस्रायलच्या अधिकृत भाषा यादीत हिब्रूला अरेबिक भाषेच्या वरचे स्थान मिळाले. बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक असा सांस्कृतिक संघर्ष इस्रायलमधील निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला असावा. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या संयुक्त राष्ट्र संघात आलेल्या प्रस्तावास विरोध करणाऱ्या देशांमध्ये भारताचा सहभाग होता. मात्र, ‘भारत आणि इस्रायलची मैत्री जणू स्वर्गात बनवलेली जोडी आहे’, अशा शब्दांत नेतान्याहू यांनी भावनिक साद घातली होती. अमेरिका ज्या पद्धतीने इस्रायलमधील अरब व ज्यू यांच्यातील संघर्षास हातभार लावते आहे, त्यामुळे अमेरिकेविरुद्ध खदखद निर्माण झालेली आहे.


    भारत व इस्रायलच्या निवडणूक मुद्द्यांमध्ये साम्य दिसते आहे. एवढे की, नेतान्याहू यांनीही स्वतःला ‘चौकीदार’ म्हणून घोषित केले. राष्ट्रीय सुरक्षा हा इस्रायल निवडणुकीतील जसा कळीचा मुद्दा होता, तोच भारतात दिसतो आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविरुद्ध आक्रोश असला तरी कट्टरतावादामध्ये साम्य जाणवते. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून जनतेला आश्वासने दिली,‘शत्रू’चा नायनाट करण्याचे आश्वासन दिले, त्याच पद्धतीचे राजकारण सर्वत्र अप्रत्यक्षपणे दिसत आहे. इस्रायल निकालांचा अर्थ हाच आहे की सर्वसमावशेकतेला मागच्या बाकांवर बसवून, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कट्टरता वाढत आहे. नेतान्याहूंच्या विजयामुळे डोनाल्ड ट्रम्प जास्तच आनंदी झालेले दिसत असताना, मध्य पूर्वेची आणि एकूणच जगाची चिंता मात्र वाढली आहे!

Trending