Home | Editorial | Agralekh | Editorial

दहशतवादाविरोधात एकी? (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Apr 23, 2019, 09:00 AM IST

एक छोटा देश, जो काेणाच्या अध्यात-मध्यात नसतो, अशा श्रीलंकेत ‘ईस्टर संडे’दिनी झालेली बॉम्बस्फोटांची मालिका

  • Editorial

    एक छोटा देश, जो काेणाच्या अध्यात-मध्यात नसतो, अशा श्रीलंकेत ‘ईस्टर संडे’दिनी झालेली बॉम्बस्फोटांची मालिका, त्यातील निष्पाप २९० बळी, ५०० हून अधिक जखमी या भयानक घटनेने जग हादरले. अगदी श्रीलंकेसहित सगळ्याच देशांना हा प्रश्न पडला आहे की, असे काय कारण झाले, ज्यामुळे दहशतवाद्यांनी एवढा मोठा नरसंहार घडवून आणला. एक महिन्यापूर्वीच न्यूझीलंडमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला झाला. त्याची ही प्रतिक्रिया तर नाही ना, अशी चर्चा श्रीलंकेत सध्या होते आहे. ‘ईस्टर संडे’ हा ख्रिश्चन धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाचा सोहळा आहे. साऱ्या जगातील ख्रिश्चन समुदाय प्रार्थनेमध्ये व्यग्र असतानाच लंकेतील बॉम्बस्फोटांच्या मालिकेत मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आल्याने सणाचे रूपांतर शोक व्यक्त करण्यात झाले. या दहशतवादी कारवाईमागे दुसरी एक शक्यता व्यक्त होते आहे, ती म्हणजे काही महिन्यांनंतर श्रीलंका सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यातील सत्तास्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजवटीला अस्थिर करण्यासाठी हे स्फोट घडवले का? आश्चर्य याचे की, अशा हल्ल्यानंतर कोणता तरी दहशतवादी गट याची जबाबदारी घेतो. अद्याप कोणीही तसे समोर आलेले नाही. राष्ट्रीय तौहिद जमात या स्थानिक दहशतवादी संघटनेने हे कृत्य घडवल्याची शक्यता व्यक्त होते आहे.


    श्रीलंकेच्या सुरक्षा विभागाला पोलिसांनी ११ दिवसांपूर्वी बॉम्बस्फोटाच्या धोक्याचा इशारा दिला होता. त्यामध्ये तौहिद जमात ही संघटना ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य बनवण्याची शक्यता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी याबाबतचा लेखी इशारा दिल्यानंतरही सुरक्षा विभागाने काही हालचाल केली नाही. कोणती खबरदारीची पावले उचलली, ना कोणत्या ख्रिश्चन समुदायांच्या प्रार्थनास्थळांशी संबंधित लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला गेला. यावर कडी म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या या गंभीर इशाऱ्याची कल्पना श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही दिली गेली नाही. त्यांनीही ते खुलेपणाने बोलून दाखवले. यामुळेच सरकार आणि प्रशासन यांच्यात काही खदखद चालू आहे का, अशी शंका बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर व्यक्त केली जात आहे. तामिळ नेता प्रभाकरन याचा नायनाट केल्यानंतर श्रीलंकेत शांतता होती. सिंहली समुदायावर ‘एलटीटीई’ने खूप हल्ले केले. त्याव्यतिरिक्त दहशतवादी कारवाया लंकेने अनुभवल्या नव्हत्या.


    कालच्या स्फोटांच्या मालिकेतून तेही अजून सावरलेले नाहीत. भारताने मुंबईतील बॉम्बस्फोटातील मालिका अनुभवली आहे. हे खरे की, दहशतवादाला जात, धर्म, रंग, वर्ण असे काहीच नसते. दहशतवाद, मग तो कोणत्या का रंगाचा असेना, एकदा का त्याचे टोक सापडले की तो किडा-मुंगीसारखा चिरडूनच टाकला पाहिजे. श्रीलंकेत २९० निष्पांपाचे बळी गेल्यानंतर जगात सर्वत्र निषेधाची मालिका सुरू आहे. दहशतवादाच्या विरोधात साथ देण्याची भाषा केली जाते. पण जगातल्या सगळ्या शक्ती एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढा देत अाहेत, असे चित्र अजूनपर्यंत तरी उभे राहिलेले नाही. हे प्रत्यक्षात यायला हवे.

Trending