Home | Editorial | Agralekh | Editorial about Ambani Brothers

भाऊबंदकी ते बंधुप्रेम

संपादकीय | Update - Mar 20, 2019, 09:43 AM IST

अनिल अंबानी आहे ती संपत्ती राखण्यासाठी त्यांची धडपड होती, त्यात ते अपयशी ठरले.

  • Editorial about Ambani Brothers

    हजारो कोटी रुपयांच्या कर्जात अडकलेल्या आपल्या भावाला तुरुंगवास नको, घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून रिलायन्स उद्योगसमूहाचे संचालक मुकेश अंबानी यांनी ५५० कोटी रुपयांची मदत अनिल अंबानी यांना केली आहे. आपल्या मोठ्या भावाने मोक्याच्या वेळी पैसे दिल्याने अनिल अंबानी यांनी मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे आभारही मानले आहेत. अंबानी घराण्यातील भाऊबंदकी ते बंधुप्रेम असा हा नातेसंबंधांचा एकूण प्रवास आहे तसेच तो भांडवलशाहीत अनुस्युत असलेल्या हितसंबंधांचाही आहे. बडा भांडवलदार छोट्याला गिळतो, पण बडे भांडवलदार बाजारपेठेत अनावश्यक स्पर्धा निर्माण करत प्रतिस्पर्ध्याला पायाशी यायला लावतात हे या मदतीवरून समजून येण्यास हरकत नाही. अनिल अंबानी यांचा गेल्या १५ वर्षांतला एक भांडवलदार म्हणून प्रवास फार रोचक नाही. तो नेहमी अडथळ्यांचा प्रवास होता. आहे ती संपत्ती राखण्यासाठी त्यांची धडपड होती, त्यात ते अपयशी ठरले.

    २००५मध्ये जेव्हा अंबानी बंधूंमध्ये वाटण्या झाल्या तेव्हा मोठ्या भावाकडे मुकेश अंबानी यांच्याकडे तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स, तर लहान भावाकडे अनिल अंबानी यांच्याकडे ऊर्जा निर्मिती, वित्तीय सेवा व टेलिकॉम क्षेत्र वाटणीत आले होते. २००७च्या फोर्ब्जच्या श्रीमंत उद्योजकांच्या यादीत मुकेश अंबानी ४९ अब्ज डॉलर, तर अनिल अंबानी ४५ अब्ज डॉलर मालमत्तेचे उद्योजक होते. तो काळ दोघांच्या आर्थिक प्रगतीला साहाय्य देणारा होता. देशाचा आर्थिक विकास दर वाढत होता. या दरम्यान दोघांनी २०१० पर्यंत एकमेकांच्या उद्योगक्षेत्रात हस्तक्षेप किंवा स्पर्धा टाळावी, असा एक करारही केला. त्यात मोबाइल सेवा क्षेत्रही होते. २०००-२०१० हे दशक टेलिकॉम उद्योगासाठी सुगीचा काळ होता. अनेक देशी-विदेशी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार या काळात देशभर केला होता. स्पेक्ट्रमचे 'नियमबाह्य' वाटप याच काळात घडले. अनिल अंबानी यांना एक अब्ज लोकसंख्येची बाजारपेठ खुणावत होती. पण २००८च्या जागतिक आर्थिक मंदीत त्यांना सुमारे ३१ अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले आणि येथून त्यांच्या घसरणीला सुरुवात झाली. पण त्यांच्या रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या वित्तीय कंपन्यांचा कारभार तेजीत होता. वित्त बाजाराचे अचूक ज्ञान असल्याने त्यांचा भर बाजार व्यवस्थापनावर अधिक होता, त्यात टेलिकॉम उद्योगाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले. याच काळात देशात टेलिकॉम कंपन्यांनी आपले कॉल रेट, डेटा पॅक स्वस्त केल्याने त्यांची आरकॉम कंपनी अडचणीत आली. व्होडाफोन, एअरटेल, आयडिया या तीन दिग्गज कंपन्यांनी किंमतयुद्धात आरकॉमला स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकले होते. याचा मोठा आर्थिक फटका बसून आरकॉमवर ४६ हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी २०१४मध्ये आरकॉमने दूरसंचार जाळे सांभाळण्यासाठी स्वीडिश कंपनी एरिक्सनशी सात वर्षांचा करार केला. हा करारही अनिल अंबानी यांना पाळता आला नाही. एरिक्सनची १५०० कोटी रुपयांची थकबाकी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन बसल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने ५५० कोटी रुपयांची भरपाई एरिक्सनला द्यावी, असा तोडगा काढला, पण ही भरपाईसुद्धा अनिल अंबानी यांनी न चुकवल्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयाने २० मार्चची मुदत दिली होती. मंगळवारी मुकेश अंबानी यांनी ५५० कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले आणि तूर्त तुरुंगवास टाळला.

    अनिल अंबानी यांनी एरिक्सनची साडेचारशे कोटी रुपयांची थकबाकी फेडली असली तरी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे सुमारे ७०० कोटी रुपये त्यांना फेडायचे आहेत. हे पैसेही मुकेश अंबानी यांनी दिल्यास अनिल अंबानी यांची आरकॉम कंपनी, तिची मालमत्ता, स्पेक्ट्रम, टॉवर मुकेश अंबानी यांच्या जिओ कंपनीकडे जमा होईल. वास्तविक २०१६मध्ये मुकेश अंबानी यांनी दणक्यात जिओ कंपनी बाजारात आणल्याने आरकॉमवर अखेरचा घाव बसला होता, त्यातून ते सहीसलामत निघू शकले नाही. म्हणून आरकॉम कंपनी दिवाळखोरीत जाण्यामागे जिओचे आगमन हेही एक महत्त्वाचे कारण आहे. आता अनिल अंबानी यांच्यापुढे पुढील संकट आहे ते राफेल लढाऊ विमान कंत्राटाचे. या प्रकरणात त्यांना मोदी सरकारने झुकते माप दिल्याचा आरोप होत आहे आणि कदाचित नव्या लोकसभेत भाजपेतर किंवा भाजपचे स्वबळावर नाही, पण एनडीएचे सरकार आल्यास राफेल विमानांचा विषय पुन्हा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. एखाद्या 'बड्या' भांडवलदाराकडे तुरुंगवास चुकवण्याएवढेही पैसे नसतील तर तो देशाच्या संरक्षण व्यवहारात कसा सामील असू शकतो, हा विरोधकांचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जाईल. त्या वेळी मात्र मुकेश अंबानी त्यांच्या मदतीस येण्याची शक्यता नाही.


Trending