Home | Editorial | Agralekh | Editorial about Asian Games Tournament

खेलो इंडिया खेलो.. (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Sep 03, 2018, 08:01 AM IST

इंडोनेशियातल्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याला कारणेही तशीच होती.

 • Editorial about Asian Games Tournament

  इंडोनेशियातल्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याला कारणेही तशीच होती. 'खेलो इंडिया खेलो' अशी घोषणा देत केंद्र सरकारने खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा भरभरून देऊ केल्या होत्या. स्वतः माजी ऑलिम्पिक पदकविजेते आणि आता केंद्रीय क्रीडामंत्री असणारे राज्यवर्धन राठोड खेळाडूंच्या पथकावर जातीने लक्ष ठेवून होते. यापूर्वी कधी नव्हे इतके ५२४ भारतीय खेळाडूंचे 'जंबो' पथक इंडोनेशियाला धाडण्यात आले. दोन वर्षांपूर्वीच्या 'रिओ ऑलिम्पिक'मध्येही भारताने आजवरचे सर्वात मोठे खेळाडू पथक पाठवले होते. ध्यानचंद, खाशाबा जाधव, मिल्खासिंग, पी. टी. उषा हे थोरच; पण याच दीपस्तंभांकडे किती वर्षे पाहत बसणार? आंतरराष्ट्रीय स्तरावर झगडल्यानंतरच आपली 'यत्ता कंची' आणि कुठे पोहोचायचे आहे याचा धडा मिळत असतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना पाठवण्यात अजिबात हयगय न करण्याचा सरकारचा दृष्टिकोन अत्यंत स्वागतार्ह आहे. क्रीडा व्यवस्थापनाच्या बाबतीतही हेच.


  वास्तविक खेळाला राजाश्रय देण्यापुरतीच राजकारण्यांची भूमिका मर्यादित असली पाहिजे. तसे घडत नसल्याने खेळांची मैदाने राजकारणाचा अड्डा बनली आणि खेळाडूंची गुणवत्ता त्यात भरडली जाऊ लागली. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या क्रिकेटपासून हॉकी, कबड्डी, कुस्ती, अॅथलेटिक्सपर्यंतच्या सर्व खेळांचे व्यवस्थापन राजकारण्यांनी आणि राजकारणाने पोखरले आहे. न्यायालयाच्या दणक्यामुळे आणि सध्याच्या सरकारच्या काटेकोरपणामुळे आता कुठे यात बदल होत आहेत. ज्यांनी प्रत्यक्षात मैदान गाजवले, ज्यांना खेळ समजतो अशा जाणकारांची संख्या निवड समित्या, प्रशिक्षण, व्यवस्थापनात वाढते आहे.


  या बदलांचे चमकदार परिणाम वाढलेल्या पदकांमधून दिसत आहेत. आशियाई स्पर्धेला रवाना होण्यापूर्वीच भारतीय मुष्टियोद्ध्यांनी जर्मनीतल्या केमिस्ट्री कपमध्ये चार पदके जिंकली होती. हिमा दासने फिनलंडमध्ये जिगरबाज धाव घेत जागतिक स्पर्धेतले सुवर्णपदक खेचून आणले होते. पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा धडाका लावला आहे. नीरज चोप्राने फ्रान्समधल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. उदाहरणे अनेक देता येतील. यामुळेच इंडोनेशियात यंदा भारताच्या उच्चांकी कामगिरीची खात्री होती. खेळाडूंनी हा विश्वास खरा ठरवला. हॉकी आणि कबड्डी यात 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' असा प्रकार झाला, तरीही भालाफेक, नेमबाजी, महिलांची कुस्ती यात भारत पहिल्यांदाच आशियात अव्वल ठरला. 'आशियाई'त पहिल्यांदाच खेळवलेल्या ब्रिजमध्येही भारताने सुवर्णपदक जिंकले. हिमा दास, स्वप्ना बर्मन, मनजित सिंग, द्युती चंद, मोहंमद अनस, जिन्सन जॉन्सन, नीरज चोप्रा, राही सरनोबत आदींच्या धडाक्याने भारतीय तरुणाईत ऊर्जा निर्माण केली आहे. आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो, नैसर्गिक गुणवत्तेला जिद्द आणि कष्टाची साथ मिळाली तर शिखरावर पोहोचण्यापासून कोणी रोखू शकत नाही हेच या खेळाडूंनी सिद्ध केले.


  क्रिकेटवेड्या भारतात 'अॅथलेटिक्स प्रेम' वाढवण्यात हे खेळाडू 'रोल मॉडेल' ठरलेत. '२०२० टोकियो ऑलिम्पिक'मध्येही हे खेळाडू भारताचे आशास्थान असतील. एवढेच नव्हे तर नव्या भारतीय पदकविजेत्यांचा उदय आताच्या आशियाई जेत्यांकडे पाहूनच होणार आहे. अर्थात, समाधानी वृत्ती म्हणजे प्रगतीला खीळ. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या चार वर्षांनी १९५१ च्या 'आशियाई'त भारताने १५ सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्याच स्पर्धेत या कामगिरीची बरोबरी करायला भारताला ६७ वर्षे थांबावे लागले. याचा अर्थ इतर आशियाई देश वेगाने पुढे जात असताना भारत मागे राहिला. चीन, जपान, कोरिया हे 'आशियाई'तले अव्वल देश वगळले तरी इराण, इंडोनेशिया, तैपेई, उझ्बेकिस्तान हे छोटे देशही आपल्या पुढे आहेत. त्यामुळेच 'आशियाई इतिहासातली सर्वोच्च कामगिरी' या कौतुकात फार रमणे योग्य नाही. विजयाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन असतात.


  ऑलिम्पिकमध्ये अव्वल होण्यासाठी पछाडलेल्या चीनने गेल्या दशकात खेळाडू तयार करण्याचे अक्षरशः कारखाने सुरू केले. कोवळ्या मुलामुलींना पकडून त्यांना या कारखान्यांमध्ये डांबले आणि यंत्रासारखे घडवले. त्यात चीनला लक्षणीय यशही मिळाले. दुसरा दृष्टिकोन असतो नेत्रदीपक फुटबॉलपटूंची खाण असणाऱ्या ब्राझीलसारखा किंवा कधीकाळी गुणवान क्रिकेटपटू जगाला देणाऱ्या कॅरेबियन बेटांसारखा. सतत जिंकण्यासाठी खेळ हा जीवनशैलीचाच नैसर्गिक भाग बनावा लागतो. खेळ रक्तात भिनावा लागतो. आशियाई स्पर्धेतल्या यशाने भारतीयांमधली क्रीडावृत्ती वाढीस लावली तर पदकांच्या संख्येपेक्षा ही कामगिरी मोठी ठरेल. मन आनंदी ठेवणाऱ्या खिलाडूपणाची आणि शरीर बळकट करणाऱ्या खेळांची देशाला आज खरी गरज आहे.

Trending