आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयमधील साठमारी (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही वर्षांपूर्वी सीबीआयमधील पराकोटीचा सत्तासंघर्ष व या संस्थेवरील सरकारचा अंकुश पाहून ही संस्था सरकारी पोपट आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. वास्तविक सीबीआय स्वायत्त गुन्हे तपास यंत्रणा आहे. परंतु, सीबीआयची एकूणच कामगिरी पाहता या संस्थेची स्वायत्तता व विश्वासार्हता हे मुद्दे चर्चेतून केव्हाच गायब झाले. सीबीआयचे काही अधिकारी भ्रष्ट आहेत. सत्ता कोणाचीही असो, सत्ताधारी या संस्थेचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना नामोहरम करण्यासाठी करत असतात, यातही आता नावीन्य राहिलेले नाही. सीबीआय अंतर्गत सत्तासंघर्षाने पोखरली असल्याची बाबही आता नव्याने समोर आली आहे. सीबीआयचे संचालक अालाेक वर्मा अाणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील साठमारीचे त्यासाठी निमित्त झाले आहे. यापूर्वी यूपीए-२ सरकारच्या काळात असा अंतर्गत वाद समोर आला होता. 


गेल्या आठवड्यात राकेश अस्थाना यांच्याविरोधात सीबीआयनेच गुजरातमधील मांस व्यावसायिक मोईन कुरेशी याच्या मांस घोटाळ्यातील एका आरोपीकडून दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी फिर्याद नोंदवली होती. त्यामुळे संतापलेल्या राकेश अस्थाना यांनी आपलेच बॉस असलेले सीबीआयचे महासंचालक अालाेक वर्मा यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या १० गंभीर प्रकरणांची माहिती कॅबिनेट सचिवांकडे दिली आणि त्याच्या चौकशीची मागणी केली. अस्थाना यांनी केंद्रीय दक्षता आयोगाकडेही वर्मा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या जवळपास डझनभर तक्रारी केल्या. तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या मुख्य संचालकांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. महत्त्वाचे म्हणजे गुजरातमधील या कथित मांस घोटाळ्याचा तपास राकेश अस्थानांकडे आहे. त्यांच्याकडून चौकशी होऊ नये म्हणून अालाेक वर्मा यांना दोन कोटी रुपये दिल्याची तक्रार हैदराबाद येथील व्यावसायिकाने सीबीआयकडे केली होती. मात्र, वर्मा व अस्थानांमध्ये बिनसल्यानंतर सीबीआयने अस्थाना यांनीच दोन कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला. त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. पाच हजार कोटी रुपयांच्या स्टर्लिंग बायोटेक घोटाळ्याचा तपासही अस्थाना यांच्याकडे आहे. त्या घोटाळ्याची वेगळी चौकशी करण्यासाठी सीबीआयने आपले पथक बडोद्यात पाठवले. या पथकाने अस्थाना यांच्या टीममधील एका डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. सीबीअाय अस्थाना यांच्यासाेबतच अन्य अधिकाऱ्यांचीही चाैकशी करत अाहे. अस्थाना हे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांना गजाआड करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका हाेती. २००२ मध्ये गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसला लावलेली आग, ऑगस्ता वेस्टलँड, किंगफिशर घोटाळा, मोईन कुरेशी-हसन अली यांचा मांस घोटाळा अशा हायप्रोफाइल व्यावसायिकांची प्रकरणे ते हाताळत आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अत्यंत निकटचे अधिकारी म्हणून ते अोळखले जातात. म्हणूनच सीबीअायच्या प्रमुखपदी गुजरात केडरमधील अधिकाऱ्याची वर्णी लावण्याची हालचाल सुरू झाली. २०१६ मध्ये केंद्र सरकारने अस्थाना यांना हंगामी सीबीआय महासंचालक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला.पण या निर्णयाला स्थगिती द्यावी म्हणून वकील प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयात गेले. तरीही अस्थाना यांना क्रमांक दोनचे पद देण्यात यावे, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर अस्थाना यांची ताकद वाढली. वर्मा यांची नेमणूक मोदी सरकारनेच केली होती. येत्या जानेवारी महिन्यात ते निवृत्त होत आहेत. वर्मा व अस्थाना यांच्यातील सुंदाेपसुंदीमुळे सरकारची प्रतिमा निश्चितच डागाळते आहे. मोदी व भाजपचे नेते २०१२-१३ च्या काळात सीबीआयवर 'काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' अशा शब्दांत आरोप करत होते. आता काँग्रेस भाजपवर तुटून पडली आहे. अस्थाना यांना मोदी सरकार वाचवत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्यावर भाजप नेहमीप्रमाणे मौन बाळगून आहे. 


अस्थाना यांना जानेवारीमध्ये सीबीआयचे महासंचालक करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजप विरोधक समूह आधीपासूनच सक्रिय आहे. प्रशांत भूषण यांनी ते अस्थानांच्या नियुक्तीच्या वेळीच दाखवून दिले होते. ते प्रयत्न सफल झाले नाहीत म्हणून या पद्धतीने अस्थानांची दावेदारी मोडीत काढायचा हा प्रयोग आहे का, या दृष्टीनेही या प्रकरणाकडे पाहावे लागेल. तसे असेल तर यंत्रणेलाच राजकारणाच्या गाळात ओढण्याचे आणि त्यासाठी आतमध्ये सुरुंग पेरण्याचे काम सुरू असल्याचे हे द्योतक आहे. ती गंभीर बाब आहेच; पण त्याहीपेक्षा एकानुवर्ती कारभार करून सर्वांवरच नियंत्रण ठेवू इच्छिणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाचे मात्र हे मोठे अपयश आहे. या बाबतीत पीएमओ अतिसावध आहे की बेसावध? की याचाही राजकीय लाभ उठवण्याचेच मोदी, शहांचे नियोजन आहे? काहीही असले तरी ते गंभीर आहे, यात वाद नाही. 

बातम्या आणखी आहेत...