Home | Editorial | Agralekh | Editorial about China's ambitious 'One Belt One Road'

चीनच्या महत्त्वाकांक्षेत अडथळे (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Sep 04, 2018, 08:02 AM IST

संपूर्ण आशिया खंड व युरोप यांना व्यापारमार्गाने जोडणारा चीनचा महत्त्वाकांक्षी 'वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) पूर्ण केव्हा होई

  • Editorial about China's ambitious 'One Belt One Road'

    संपूर्ण आशिया खंड व युरोप यांना व्यापारमार्गाने जोडणारा चीनचा महत्त्वाकांक्षी 'वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) पूर्ण केव्हा होईल हे सांगता येणार नाही. पण सुरुवातीस या प्रकल्पात येणारे आर्थिक अडथळे, कर्जाचे डोंगर पाहता चीनची महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आल्यास तो चीनच्या दृष्टीने सुदिन असेल. बरोबर एक वर्षापूर्वी या प्रकल्पाची घोषणा जिनपिंग यांनी एका भव्यदिव्य कार्यक्रमात केली होती. हा प्रकल्प 'मुक्त व सर्वसमावेशक' असेल असे चीनने त्या वेळी स्पष्ट केले होते. संपूर्ण जगाने हा सोहळा पाहिला. चीनचे शेजारील देश, भारतीय उपखंडातील देश, आफ्रिका-युरेशियन खंडातील देशांना रेल्वे, रस्ते, बंदरे व हवाई मार्गाने जोडणारा एक भव्य 'इकॉनॉमिक कॉरिडोर' तयार करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. चीनच्या विस्तारत असलेल्या बाजारपेठेला नव्या बाजारपेठांची गरज आहे त्याचबरोबर या प्रकल्पात सामील होणारे जे छोटे-मोठे-विकसित-विकसनशील देश आहेत त्यांच्या मालाला अमेरिका-युरोपऐवजी हा नवा इकॉनॉमिक कॉरिडोर उपलब्ध होईल, अशी चीनची व्यूहनीती आहे. जगाचे आर्थिक केंद्र जे अमेरिका-युरोपकडे आहे ते चीनकडे अपरिहार्यपणे सरकत असल्याचे चित्र या प्रकल्पाच्या मांडणीतून जिनपिंग यांनी दाखवले होते. पण असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणायचा झाल्यास या प्रकल्पात सहभागी झालेल्या देशांची आर्थिक स्थिती किमान बरी असणे गरजेचे आहे. या देशांपुढे कर्ज उभे करण्याची व गुंतवणुकीचे वातावरण तयार करण्याचे मोठे आव्हान आहे. ओबीओआर ही एक भव्य आर्थिक साखळी आहे. या साखळीतील काही कड्या कमजोर तर काही बऱ्या किंवा काही सशक्त अाहे. ज्या एकदमच कमजोर असतील त्या बळकट करण्याची जबाबदारी चीनने स्वत: उचलली आहे. पण पाकिस्तान, श्रीलंका, मलेशियासारखे देशांच्या अर्थव्यवस्थांची प्रकृती अगदीच चिंताजनक आहे. त्यांना चीनचे कर्जही आता डोईजड वाटू लागले आहे. काही दिवसांपूर्वी मलेशियाच्या पंतप्रधानांनी चीनच्या मदतीने उभे राहत असलेले तीन बडे प्रकल्प ज्यामध्ये सुमारे २० अब्ज डॉलर रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे, कर्जाच्या भीतीपायी सोडून रद्द करण्याचा निर्णय घेतला. मलेशियामध्ये 'ओबीओआर' अंतर्गत ईस्ट कोस्ट रेल लिंक व ट्रान्स-सबाह गॅस पाइपलाइन हे दोन मोठे प्रकल्प आकारास येत होते. पण डोक्यावरचे कर्ज कमी व्हावे म्हणून आम्ही यातून बाहेर पडत असल्याचे मलेशियाने चीनला सांगितले. म्यानमारने चीनच्या मदतीने बांधले जात असलेल्या एका मोठ्या धरणाचे काम तूर्त थांबवले आहे. चीनचा जवळचा मित्र असलेला पाकिस्तान त्याच्या अर्थव्यवस्थेची झालेली दयनीय अवस्था पाहता चीन देऊ करत असल्याच्या कर्जाची परतफेड कशी करता येईल या विवंचनेत आहे. मालदीवचे विरोधी पक्षनेते मोहंमद नशीद यांनी चीनचा 'ओबीओआर' प्रकल्प हिंदी महासागराचा प्रदेश बळकावायचा, तेथे नवा आर्थिक वसाहतवाद वसवायचा कट असल्याची टीका केली आहे. मालदीववर असलेले सुमारे ८० टक्के कर्ज चीनने स्वत:च्या डोक्यावर घेतले आहे व त्या बदल्यात चीन तेथे अनेक विकासकामे करत आहे. चीनचा मित्र श्रीलंका, चीनच्या मेहेरबानीने दबला आहे. सुमारे दीड अब्ज डॉलरचे कर्ज फेडता येत नाही म्हणून श्रीलंकेने आपले एक मोठे बंदर ९९ वर्षांच्या करारावर चीनला देऊ केले आहे. पूर्व आफ्रिकेच्या प्रवेशद्वारावरचा छोटासा पण व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या जिबोतीवर सार्वजनिक कर्जाचा इतका मोठा डोंगर उभा राहिला आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा देश कर्जबाजारी होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. चीन-लाओस हा रेल्वेमार्ग सुमारे सहा अब्ज डॉलर रकमेचा आहे. हा खर्च आग्नेय आशियाच्या एकूण जीडीपीच्या अर्धा आहे. तेथेही आर्थिक संकटे आ वासून उभी राहिली आहेत. बहुतेक आशिया खंडातील देशांमध्ये 'ओबीओआर' हा कर्जाचा एक सापळा आहे, अशी भावना निर्माण होताना दिसत आहे.


    चीनच्या 'ओबीओआर' प्रकल्पात पाकिस्तान, जिबोती, मालदीव, मंगोलिया, लाओस, माँटेनिग्रो, तजाकिस्तान, किर्गिझस्तान हे अत्यंत महत्त्वाचे देश आहे. येथून व्यापार मार्ग (सिल्क रूट) जातो, या देशांना अब्जावधी डॉलरची कर्जे पुरवून ओबीओआरचा पाया बांधण्याचे चीनचे धोरण आहे. चीन या देशांना डॉलर किंवा अन्य चलनात कर्जे देत नाही तर तो ट्रॅक्टर-क्रेन-ट्रकसारखी अवजड वाहने, बांधकाम साहित्य, कोळसा, अभियांत्रिकी साधने, तज्ज्ञ मंडळींचे सल्ले या स्वरूपात मदत करत अाहे. पण या कर्जाची परतफेड त्याला रोख रकमेत अपेक्षित आहे. हा आर्थिक व्यवहार अनेक देशांसाठी फलदायी होईल याची शाश्वती नाही. 'ओबीओआर' हे महत्त्वाकांक्षी असलेल्या जिनपिंग यांच्या दृष्टीने स्वप्न असले तरी या स्वप्नांना वास्तवाचे चटके बसू लागले आहेत, हे खरे.

Trending