आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात गावागावात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम नेणारे ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट उलगडण्याच्या दिशेने तपास यंत्रणांना यश येत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांतील अटकसत्रावरून दिसत आहे. काल डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन पाच वर्षे पुरी झाली. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने पानसरे-दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय व एसआयटी यंत्रणेच्या नाकर्तेपणावरून तिखट शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर नालासोपारा येथून हिंदू जनजागृती समितीचा एक सदस्य वैभव राऊत याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर दारूगोळा व गावठी पिस्तुले एसआयटीला सापडली. त्यानंतर राऊत याच्यासोबत काम करणारे शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर या साथीदारांना एटीएसने पकडले व त्यानंतर सीबीआयने औरंगाबादमध्ये सचिन अणदुरे याला अटक करून अंदुरेनेच डॉ. दाभोलकर यांची हत्या केली असल्याचा दावा करणे ही या प्रकरणाला निर्णायक व कलाटणी देणारी घटना आहे. कलाटणी अशासाठी की डॉ. दाभोलकर यांचा खून कोणी केला यावर सीबीआय, महाराष्ट्र पोलिसांचे विशेष तपास पथक व एटीएस यांच्यात गोंधळ होता. या तपास यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत होते. २० जानेवारी २०१४ला तत्कालीन एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी इचलकरंजी येथून मनीष नागोरी व विकास खंडेलवाल या तरुणांना अटक करून या दोघांनी हल्लेखोराला पिस्तूल पुरवल्याचा दावा केला होता. पण असा गुन्हा कबूल करण्यासाठी मारिया यांनी २५ लाख रु.ची ऑफर दिल्याचा आरोप नागोरीने न्यायालयात केल्याने पोलिसांची नाचक्की झाली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास मे २०१४मध्ये सीबीआयकडे सोपवला व सीबीआयने जून २०१६मध्ये पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमातून डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केली व तावडे हाच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, असे जाहीर केले. या वेळी सीबीआयने सारंग अकोलकर व विनय पवार या दोन संशयितांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, असाही दावा केला. मात्र, हे दोघे संशयित आजतागायत एकाही तपास यंत्रणेच्या हाती लागलेले नाहीत. डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी दुचाकी अकोलकर व पवार यांना तावडेनेच दिल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले होते. मात्र, या आरोपपत्रात सचिन अणदुरेचा उल्लेख नव्हता. आता सुमारे अडीच वर्षांनंतर सचिन अणदुरे व अन्य एकाने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. यामुळे या प्रकरणात गुंतागुंत अधिक वाढत जाणार आहे. या हत्या प्रकरणाचा सूत्रधार वीरेंद्र तावडे असेल व सीबीआय आपल्या दाव्यावर जर ठाम असेल तर त्या दिशेने अन्य तपास यंत्रणांना वळावे लागेल. तावडेच्या नावावर सर्व तपास यंत्रणांचे एकमत झाल्यास सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा दबाव सरकारवर वाढत जाईल. ती सरकारपुढची कसोटी असेल.
डॉ. दाभोलकर यांच्यानंतर कॉ. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्या या एकाच विचारसरणीच्या बुरसटलेल्या लोकांकडून झालेल्या आहेत, हे स्पष्ट आहे. या हत्यांमध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा हात नाही. त्यांना याच देशातून रसद पुरवली जात आहे. येथेच अशा संघटनांना छुपा राजकीय आश्रय दिला जात आहे. या हत्यांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आहे. तसेच चौघा विचारवंतांच्या झालेल्या हत्या एकाच हत्याराने केल्या गेल्या, असेही न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल सांगत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या करणाऱ्यांना पकडल्याचे म्हटले आहे. या सगळ्या घडलेल्या घटना पाहता आपला समाज दहशतवादाची धग अनुभवत आहे यात शंका नाही. याचे प्रत्यक्ष उदाहरण गेल्या आठवड्यात नालासोपाऱ्यात दिसून आले. तेथे आरोपींच्या सुटकेसाठी हजारो स्थानिकांना हाताशी घेऊन काही कट्टर धार्मिक संघटनांनी 'जन आक्रोश' नावाखाली मोर्चा काढून आपली संघटनशक्ती दाखवली. असे मोर्चे, समाज व तपास यंत्रणांवरचा एक प्रकारचा मानसिक दबाव आहे. हिंदू वा मुस्लिम खतरे में है, अशा घोषणा देऊन निवडणुका जिंकता येतात, पण निवडणुका नसतानाही धर्माच्या नावाखाली झुंडशाही रस्त्यावर येऊन ती आक्रमक होते तेव्हा सिरिया-इराक-पाकिस्तानसारखी परिस्थिती आपल्याकडे आली आहे हे कबूल करावे लागते. डॉ. दाभोलकर हे धर्माच्या विरोधात लढले नाहीत किंवा धर्मसंस्था मोडीत काढावी हा विचार त्यांनी मांडला नाही. ते धर्मातल्या अंधश्रद्धांच्या विरोधात लढले, विज्ञानवादी दृष्टिकोन व विवेकाला जागृत करण्यासाठी ते सतत काम करत राहिले. त्यांचे काम आपल्या समाजात मुळाशी जात नसेल तर ती आपलीच हार असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.