Home | Editorial | Agralekh | Editorial about eknath khadse

भाजप जिंकला, खडसे हरले (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Aug 04, 2018, 07:19 AM IST

विविध राजकीय पक्षांचे, विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते जे काही चित्र राज्यातल्या जनभाव

  • Editorial about eknath khadse

    विविध राजकीय पक्षांचे, विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते जे काही चित्र राज्यातल्या जनभावनेचे प्रतिबिंब म्हणून दाखवताहेत तसे ते नाही हे जळगाव आणि सांगली महानगरपालिकांच्या मतदारांनी दाखवून दिले आहे. ज्या सांगली महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता तिथे स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल इतके नगरसेवक तिथल्या मतदारांनी भाजपला निवडून दिले. बहुमत मिळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला तर खातेही उघडता आले नाही. हे कशामुळे झाले, याचा विचार शिवसेनेबरोबरच सत्ता गमावलेल्या काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही गांभीर्याने करणे आवश्यक आहे.


    प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचे केवळ १५ नगरसेवक निवडून येऊ शकले. राष्ट्रवादीवर आता मतदारांचा विश्वास राहिलेला नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्याची कारणे काय आहेत, याचा शोध जयंत पाटलांनी घेतला पाहिजे. आर.आर. पाटील आणि पतंगराव कदम यांच्या जाण्याची ही किंमत या दोन्ही मित्रपक्षांना मोजावी लागत असेल तर तशी माणसे उभी करण्यासाठी या दोन्ही पक्षांना भविष्यात मेहनत घ्यावी लागेल, असा संदेशच या निकालांनी दिला आहे. सध्या राज्यात ज्या पद्धतीने हे पक्ष वाटचाल करीत आहेत आणि व्यूहरचना करीत आहेत ती फसते आहे हे त्यांच्या लक्षात आले असेल. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीत यायलाही विरोध करण्यात आला होता. त्या विरोधाचा परिणाम झाला का, हेही विरोध करणाऱ्या मराठा संघटना आणि राजकीय पक्षांनीही तपासून पाहायला हवे. मराठा आंदोलनाने सामाजिक ध्रुवीकरण होण्याची आणि त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता व्यक्त केली जातेच आहे. त्याचेच उदाहरण म्हणून सांगलीतल्या या निकालाचा अभ्यास करायला हवा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेनेसाठीही ही धोक्याची घंटा आहे, हे या पक्षांच्या कधी लक्षात येईल हे त्यांनाच ठाऊक.


    जे सांगलीत तेच जळगावमध्येही घडले. तिथेही मतदारांनी भाजपला प्रचंड बहुमत मिळवून दिले. हे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे जसे यश आहे तसेच ते राज्यकर्त्या फडणवीस सरकारचेही आहे हे मान्य करावे लागेल. शेवटी स्थानिक नेते कोणाच्या बळावर आश्वासन देत आहेत याचा सारासार विचार मतदार करतोच. दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जनतेने केेलेला हा पराभव स्वीकारताना आत्मपरीक्षण करण्याची तयारी दाखवली आहे. मतदारांना भाजपचा विकासाचा अजेंडा अावडला असेल तर तो स्वीकारण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले पाहिजे, असे सांगत त्यांनी आपण मुरलेले आणि प्रगल्भ राजकारणी आहोत हेच दाखवून दिले आहे. शिवसेनेच्या उठवळ नेत्यांनी हा संयम आणि समज त्यांच्याकडून घ्यायला हवी. जळगाव महानगरपालिकेत झालेल्या भाजपच्या विजयाचे श्रेय जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांना दिले जाते आहे. त्यांनी या विजयासाठी घेतलेली मेहनत आणि केलेले नियोजन निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. पण याच महाजनांची प्राथमिक तयारी सुरेशदादा जैन यांच्या आघाडीशी युती करण्याची होती हेही विसरता येणार नाही. अशी युती होऊ नये, अशी भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. तोच सूर नंतर आमदार भोळे यांनीही लावला आणि युती करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खरे तर याचे श्रेय त्या अर्थाने एकनाथ खडसे यांनाही द्यायला हवे. पण खडसे यांनी आपणहून श्रेय घालवून दिले आहे.


    पक्षावरचा आपला राग काढायची संधी त्यांनी इथेही शोधली आणि नको ती विधाने केली. त्यातून आपण या निवडणुकीत पक्षाबरोबर नाही, असाच संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पक्षानेही त्यांचे नाव, फोटो प्रचारात वापरण्याचे आवर्जून टाळले. त्यामुळे जळगाव शहर भाजपवर आणि मतदारांवरही खडसे यांची पकड राहिलेली नाही हेच समोर आले आहे. हे घडले नसते तर खडसे यांची मूठ झाकलेली राहिली असती. आता खडसे यांचा आत्मविश्वास कमी आणि फडणवीस, महाजन यांचा वाढणार आहे हे नक्की. खडसे यांची एक ताकद म्हणजे त्यांच्या पाठीशी कणखरपणे उभा असलेला लेवा समाज. पण या निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे आणि माजी महापौर ललित कोल्हे हे महाजनांच्या नेतृत्वाखाली काम करीत असल्यामुळे लेवा समाजही भाजपबरोबर राहिला असाही अर्थ काढता येतो. हे खडसे यांचे एक प्रकारे हात दाखवून अवलक्षण करणे ठरले, असे म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे सांगली आणि जळगावात भाजपचा मोठा विजय झाला असला तरी घरच्याच मैदानावर खडसे मात्र पराभूत झाले आहेत, असाच याचा अन्वयार्थ आहे.

Trending