आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमान्य लोकोत्सव? (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटीशांच्या सार्वभौम वसातहतवादाच्या विरोधात एत्तदेशीयांना एकत्र आणण्यासाठी शिवजयंती आणि गणेशाेत्सवाचा साेहळा साजरा करण्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातच रोवली गेली. या उत्सवांना सार्वजनिक स्वरुप देऊन त्यांना तत्कालीन हिंदुस्थानातल्या कराचीपासून कोलकात्यापर्यंतची राष्ट्रीय लोकप्रियता मिळवून देण्याचे कार्य निःसंशयपणे लोकमान्यांचेच. या गणेशोत्सवालाही गेल्यावर्षी सव्वाशे वर्ष पूर्ण झाली. सव्वाशे वर्षांच्या दीर्घ काळात आता केवळ महाराष्ट्र, देशच नव्हे तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस पोचला त्या-त्या ठिकाणी गणेशोत्सव पोहाेचला आहे. बुद्धी-शक्तीची गणेश देवता अफगाणिस्तानापासून कंबोडिया-इंडोनेशियापर्यंत सर्वत्र आढळते, पण सार्वजनिक गणेशोत्सव अजुनही खऱ्या अर्थाने मराठी मनाचा उत्सव होय. 


बिहारची छटपुजा, बंगालींची दुर्गापुजा, केरळचा ओणम, पंजाबची बैसाखी, गोव्याची ख्रिस्त जयंती, कर्नाटकचा दसरा तसा महाराष्ट्राचा लोकोत्सव कोणता तर सार्वजनिक गणेशोत्सव. हा उत्सव कशासाठी अवघ्या समाजाचा बनला पाहिजे, सर्व थरातले लोक या निमित्ताने दहा दिवस एकत्र का आणले पाहिजेत याबद्दलचा स्वच्छ आणि स्पष्ट विचार लोकमान्यांनी 'राष्ट्रीय नेते' म्हणून केलेला होता. गर्दी जमवणे एकवेळ सोपे पण त्या गर्दीला आकार देणे, वळण लावणे मोठे कठीण काम. आजच्या विविध पक्षीय नेतृत्वाकडे नेमकी याचीच वानवा अनेकदा दिसते. थोरामोठ्यांच्या जयंत्या, नवरात्र, दहिहंडी, गणेशोत्सव यासारखे अनेक सार्वजनिक उत्सव उन्मादाकडे झुकत असल्याची शंका यातूनच बळावते. कधीही सूर्य न मावळणाऱ्या ब्रिटीशांच्या राज्यातला एत्तदेशीय समाज न्युनगंडात बुडाला होता. पाश्चिमात्य आचार-विचार, आधुनिक प्रगतीपुढे दिपून गेलेल्या भारतीयांमध्ये हिनत्वाची भावना निर्माण होऊ लागली होती. या समाजाचे आत्मभान जागे करण्याचे साधन म्हणून लोकमान्य टिळकांनी धर्म (गणेश), श्रद्धा (शिवाजी) यांची पुनर्स्थापना केली. वास्तवात बुद्धीवादी, गणिततज्ज्ञ असणारे लोकमान्य स्वतः रुढार्थाने धर्मभोळे अजिबात नव्हते. उत्सवी गर्दीला विधायकतेकडे नेण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात होती. तरीही त्यावेळच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी लाेकमान्यांना अनेकदा अडचणीत अाणले हाेते. विशेषत: सुधारकांच्या विराेधातील व्यासपीठ म्हणूनही गणेशाेत्सवाचा उपयाेग हाेऊ लागला व लाेकमान्यही ते थांबवू शकले नाहीत, हाच प्रकार अाताही हाेत अाहे. आजचे नेतृत्व मंडपाचा आकार, कमानींची संख्या, डॉल्बीचा दणदणाट, भर रस्त्यातला मंडप वगैरे 'समाजहितैषी' मुद्यांवरुन भांडताना दिसते. त्यामुळेच १२६ वर्षे वयातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रयोजन काय, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 


'मानाचा गणपती', 'नवसाला पावणारा गणपती', 'जागृत गणपती' अशा बिरुदावल्या मिरवताना व्यापक अर्थाने गणेश देवतेचाच अवमान होतो. त्यामुळे श्रद्धेचा बाजार मांडण्याऐवजी या बद्दल सार्वजनिक गणेश मंडळांनीच जनप्रबोधन करावे. अशा निरर्थक उपमांच्या माध्यमातून भ्रम पसरवण्याऐवजी लोकांची गर्दी खेचण्याचे इतर विधायक मार्ग सार्वजनिक मंडळांनी शोधायला हवेत. अर्थात डॉल्बीच्या दणदणाटात ही अपेक्षा किती मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या कानापर्यंत पोहोचेल याची शंका आहे. तुर्तास गणेशभक्त नागरिकांनीच स्वतःची श्रद्धा स्वस्त करुन घेणे टाळावे. जगातला सर्वात जागृत, कडक गणपती ज्याच्या-त्याच्या मनी वसतो, हे आपल्या संतपरंपरेने 'जसा भाव तसा देव' या शब्दातून सांगून ठेवले आहे. सोशल मीडियाचा अतिरेक, मोबाईल-टीव्ही-इंटरनेट यामुळे दृष्य आणि आवाज यांची वाढलेली एकांगी अावड यामुळे माणसाची प्रतिभा आक्रसण्याची भीती वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी समजल्या जाणाऱ्या गणेशाेत्सवात याकडे जरुर लक्ष द्यायला हवे. कलाकार, चित्रकार, लेखक, बुद्धीवंतांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी उत्सवाचा वापर व्हायला हवा. पुढची पिढी आदर्श घेऊ शकेल अशा उद्योजक, शास्त्रज्ञ, व्यावसायिक, खेळाडू आदींच्या यशोगाथा उत्सवाच्या निमित्ताने समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आनंद हा तर उत्सवाचा स्थायीभाव असतो. त्याला मुरड घालण्याचे कारण नाहीच, मात्र आपल्या बेधुंद आनंदामुळे इतरांच्या समाधानाला ओहोटी लागू नये याचे भान दाखवले पाहिजे. गर्दीचे नियोजन ही महत्त्वाची बाब आहे. जलप्रदूषण टाळणाऱ्या मातीच्या मुर्ती, डॉल्बीविना मिरवणूक, व्यसने टाळणारी मंडळे, उत्सवाचा पैसा समाजकार्याला देणारी मंडळे यासारखी विधायकता वाढत असल्याचे समाधान जरूर आहे. मात्र गणेशाेत्सवातून शक्तीप्रदर्शन करण्याचे वा वाह्यात कृतींना झुंडीची धमकी देऊन समर्थन करण्याचे उद्याेगही वाढल्याने हा लाेकाेत्सव लोकमान्य राहणार का? 

बातम्या आणखी आहेत...