Home | Editorial | Agralekh | Editorial about ISRO scientist Tapan Mishra's transfer

शास्त्रज्ञांचे त्रांगडे (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Aug 06, 2018, 10:04 AM IST

अहमदाबादेतील इस्राेच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांची बदली हे त्याच दबावाचे द्याेतक ठरते.

 • Editorial about ISRO scientist Tapan Mishra's transfer

  विकसनशीलतेचा टप्पा अाेलांडून प्रगत राष्ट्रांच्या बैठकीतील मांड पक्की करण्यासाठी भारताला नवनवे लाेकाेपयाेगी शाेधकार्य करण्याची, तशीच त्यावरील दबावाचे राजकारण टाळण्याचीदेखील गरज अाहे. मात्र प्रत्यक्षात तसे हाेत नाही. अहमदाबादेतील इस्राेच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांची बदली हे त्याच दबावाचे द्याेतक ठरते. एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याच्या बदलीइतकेच सहजतेने संशाेधकाच्या बदलीकडे पाहिले जात असेल अाणि हा प्रशासकीय भाग गृहीत धरण्यात येत असेल तरी उपयाेगितेचे मूल्य तपासून पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरत नाही का? नेमके हेतुत: हे दुर्लक्षिले गेले असेच दिसते. त्यामुळे राजकीय दबावाखाली काम करायचे की गुणात्मक संशाेधन कार्यासाठी झटायचे, असे संशाेधकांचे त्रांगडे झाले अाहे. यावर राष्ट्रपती काेविंद काही सकारात्मक मार्ग काढतील का, याकडे देशभरातील विशेषत: अवकाश संशाेधकांचे लक्ष लागले अाहे.


  या पार्श्वभूमीवर देशभरातील ख्यातनाम प्रमुख २८ संशाेधकांनी राष्ट्रपतींकडे उपस्थित केलेले मुद्दे अाणि त्यांना घातलेले साकडे या दाेन्ही बाबी म्हणूनच अतिशय महत्त्वाच्या ठरतात. इस्राे, अणुऊर्जा अायाेग, वैज्ञानिक अाणि अाैद्याेगिक शाेध परिषद (सीएसअायअार), डीअारडीअाे, भारतीय कृषी संशाेधन संस्था यांसारख्या संस्थांमध्ये माेठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप वाढला अाहे. ताे तत्काळ थांबवणे अतिशय महत्त्वाचे अाहे. तसेच या संस्थांचे नेतृत्व राजकीय विचारधारेएेवजी कार्यातील प्रामाणिकता अाणि गुणवत्तेच्या अाधारावर निश्चित केले जायला हवे. तरच संशाेधन क्षेत्रातील वैज्ञानिक संस्थांची स्वायत्तता कायम राहील अाणि संशाेधक मनाेवृत्ती नष्ट न हाेता तिची जपणूक हाेत राहील.


  अन्य क्षेत्रांप्रमाणेच अाता संशाेधन क्षेत्रातही राजकारणाची लुडबुड सुरू झाली अाणि संस्थात्मक अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण हाेण्याची वेळ येऊन ठेपली. वस्तुत: संशाेधन अाणि राजकारण ही दाेन्ही भिन्न क्षेत्रे अाहेत, त्यांनी अापापल्या गुणवैशिष्ट्यांसह अस्तित्व जपायला हवे. मात्र तसे हाेऊ शकत नाही हे तपन मिश्रांच्या उचलबांगडीने दाखवून दिले. अहमदाबादेतील संचालकपदावरून हटवून त्यांना बंगळुरूमध्ये सल्लागार बनवण्यात अाले. सल्लागार हे बिगर प्रशासकीय पद असल्याने यापुढे ते कधीही इस्राेचे अध्यक्ष हाेऊ शकणार नाहीत, अशीच बेगमी राजकीय हस्तकांनी करून ठेवली असे म्हटले तर असंयुक्तिक ठरणार नाही. अर्थातच तपन मिश्रांचा वैचारिक दृष्टिकाेन हा विद्यमान राजकीय विचारप्रवाहाचा पाईक नव्हता. संस्थेच्या खासगीकरणासाठी येत असलेला दबाव अाणि जीसॅट-११ प्रकल्पाच्या मंजुरीस झालेला विलंब यास तपन मिश्रांचा विराेध हाेता. इस्राेसारख्या संस्थेच्या घटकांच्या खासगीकरणाकडे काॅर्पाेरेट चष्म्यातून पाहणे हे चुकीचेच.


  'स्पेस एक्स' अाणि 'ब्ल्यू अाेरिजिन्स' यासारख्या खासगी संस्था २०२५ पर्यंत मंगळावर पाऊल ठेवण्यासाठी सरसावल्या असल्या तरी ती मजल गाठण्यासाठी ज्या मूलभूत बाबींची गरज अाहे, त्याकडे भारतात नेमके दुर्लक्ष केले जाते ही वस्तुस्थिती अाहे. एकाच माेहिमेत १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण करून भारताने साऱ्या जगाचे लक्ष वेधले त्यापाठाेपाठ अवकाश संशाेधन क्षेत्रात नव्या दरयुद्धाला ताेंड फुटले. या घटनेमुळे देश-विदेशातील बड्या उद्याेगपतींचे डाेळे विस्फारले नसते तरच नवल. त्यांचे हित जपण्यासाठी इस्राेतील घटकांचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे लक्षात अाल्याने मिश्रांनी विराेध सुरू केला, ताे स्वाभाविकच हाेता. प्रत्येक माेहिमेत खासगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागावरून मतभेद हाेत असल्याने मिश्रांना बाजूला सारले गेले; अाणि त्यापाठाेपाठ दाेन खासगी कंपन्या अाणि एका सार्वजनिक उपक्रमासाेबत २७ उपग्रह बनवण्याचा इस्राेने केलेला करार बरेच काही सांगून जाताे.


  एकंदरीत राजकीय अाणि खासगीकरणाच्या दबावाखाली संशाेधकांना काम करावे लागणार असेल तर देशभरातील अन्य संशाेधकांमध्ये चुकीचा संदेश जाणे अाणि संशाेधनाच्या मूळ उद्देशापासून त्यांचे लक्ष भरकटणे या बाबी साहजिकच. पं. जवाहरलाल नेहरूंनी देशात वैज्ञानिक चैतन्य जागवण्यासाठी अनेक संस्थांची उभारणी केली. चांगले संशाेधक अाणून त्यांना प्राेत्साहन दिले. नंतरच्या काळात संशाेधनवृत्तीला अाणि संशाेधकांना प्राेत्साहन मिळेनासे झाले त्यामुळे 'ब्रेन ड्रेन'ला सुरुवात झाली. म्हणूनच अमेरिका अाणि युराेपातील बहुतेक साऱ्या प्रयाेगशाळांमध्ये भारतीय संशाेधक पाहायला मिळतात. डाॅ. हरगाेविंद खुराणा हेदेखील अशाच उपेक्षेचे बळी ठरले, त्यामुळेच तर नाेबेल पुरस्कार मिळाल्यानंतरही भारताविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांना इच्छा झाली नाही. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या सेंटर फाॅर सेल्युलर अँड माॅलिक्युलर बायाेलाॅजीचे संचालक पी.एम. भार्गव यांनी देशात संशाेधनवृत्तीच्या विकासासाठी घटनेत अनुच्छेद ५१ ए-एच अंतर्भूत केला; जेणेकरून संशाेधकांना काेणत्याही दबावाचे त्रांगडे सहन करावे लागणार नाही, अशी अपेक्षा अाहे.

Trending