Home | Editorial | Agralekh | Editorial about Journalist Kuldeep Nair

ध्येयवादी पत्रकार (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Aug 24, 2018, 08:38 AM IST

भारतीय पत्रकारितेच्या राजकीय इतिहासातला कुलदीप नायर हा एक संदर्भ होते. जीना ते गांधी-नेहरु-जयप्रकाश नारायण यांचे राजकारण

  • Editorial about Journalist Kuldeep Nair

    भारतीय पत्रकारितेच्या राजकीय इतिहासातला कुलदीप नायर हा एक संदर्भ होते. जीना ते गांधी-नेहरु-जयप्रकाश नारायण यांचे राजकारण जवळून पाहणारा, नेहरु ते मोदी या पंतप्रधानपदांच्या कारकीर्दीची परखड चिकित्सा करणारा आणि १९४७ ते २०१८ या सात दशकांत भारतीय व्दीपखंडात धुमसत असलेल्या राजकारणाविषयी चिंता वाहणारा हा मानवतावादी सच्चे पत्रकार होते. राजकीय पत्रकारिता हा भारतीय पत्रकारितेचा मूळ पिंड. या स्वभावाशी प्रामाणिक राहत कुलदीप नायर यांनी सात दशके पत्रकारिता केली. १९२३ मध्ये पाकिस्तानमधील सियालकोट येथे जन्म झालेल्या नायर यांनी आपल्या पत्रकारितेची सुरवात उर्दू दैनिक 'अंजाम'मधून केली. लाहोरमध्ये त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा केला, पण तो अर्धवट राहिला. पुढे छोट्या वर्तमानपत्रापासून डेक्कन हेराल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यूज, एक्स्प्रेस ट्रिब्यून, यूएनआय, स्टेट्समन, इंडियन एक्सप्रेस असा त्यांचा पत्रकारितेतला प्रवास झळाळता होता. राजकारण व समाज यांचा अन्योन्य संबंध असतो, हे समजून पत्रकारिता करणारे जे काही मोजकेच 'तत्त्वचिंतक पत्रकार' होते त्यांच्यासाठी नायर हे आदर्श होते. सरळ-सोप्या भाषाशैलीत देशात घडत असलेल्या राजकीय उलथापालथींची मीमांसा ते वाचकांपुढे ठेवत. त्यामुळे ते सर्वभाषिक वर्तमानपत्रात चमकू लागले. नायर दिल्लीतल्या राजकीय घडामोडींवर काय भाष्य करत अाहेत, हे जाणून घेणे वाचकांची भूक होती. ती भूक नायर पुरी करत. पण वाचकांची राजकीय समज विकसित करण्याची व त्याला राजकारणाशी जोडून घेण्याची त्यांची लेखनशैली वादातीत होती. नायर यांनी भारत-पाकिस्तान या दोन देशांच्या निर्मितीचा काळ अनुभवला होता. दोन्हीकडच्या तप्त राजकारणाचे चटके सोसले होते. प्रेम, शांतता, बंधुभाव यांना कायमची तिलांजली मिळून द्वेष, मत्सर, संशय, विखार यांचा आगडोंब कसा उसळला गेला याचे ते प्रत्यक्षदर्शी होते.


    शेकडो वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे हिंदू-मुस्लिम एकमेकांचे अस्तित्व संपवण्याच्या सैतानी मानसिकतेच्या आहारी कसे गेले व ती मानसिकता स्वातंत्र्याला ७२ वर्षे पुरी होऊनही आजही राजकारणात कशी चेतवली जाते यावर नायर चिंता व्यक्त करत असत. त्यांच्या चिंतेमागे फाळणीवेळी झालेल्या राजकीय मन्वंतराचे संदर्भ असत. म्हणून गुजरात दंगलीतील मानवसंहार पाहून त्यांनी मला फाळणीची आठवण होते असे मत व्यक्त केले होते. मानवता त्यांच्या पत्रकारितेच्या केंद्रस्थानी होती म्हणून त्यांची पत्रकारिता द्वेषाच्या, सुडाच्या जवळ गेली नाही. उलट हिंदू-मुस्लिम झगडे पाहून उद्विग्न होत. धर्माच्या अतिरेकामुळे भारतीय उपखंडाचे तीन तुकडे झाले याचे त्यांना मनस्वी दु:ख होत असे. आज फाळणी न अनुभवलेले काही पत्रकार भारत-पाकिस्तान संबंधांवर वेडेवाकडे भाष्य करत असतात. मैत्रीच्या विरोधात लेखन करत असतात. अशा पत्रकारांमध्ये नायर हे वेगळे ठरतात. आयुष्याच्या अखेरपर्यंत भारत-पाकिस्तान मैत्रीसाठी ते आग्रही हाेते. या मैत्रीबद्दलची त्यांची अास्था सच्ची असली तरी वास्तव परिस्थितीशी जुळणारी नव्हती. अर्थात अशा सच्चा विचारांचेही महत्त्व असते म्हणूनच ते शांततेचे दूत बनू शकले. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीने नायर यांच्या पत्रकारितेला कलाटणी दिली. आणीबाणीत प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादल्यानंतर नायर यांनी थेट इंदिरा गांधी यांनाच एक खरमरीत पत्र लिहून सरकारच्या दडपशाहीवर टीका केली. त्या वेळी दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये त्यांनी सरकारला जाब विचारणारा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात, देशातील वर्तमानपत्रे जर सरकारचे भाट राहणार असतील तर सरकारच्या कामातील दोष-उणिवा जनतेपुढे कोण ठेवणार असा खडा सवाल उपस्थित केला होता. या बैठकीत उपस्थित असलेल्या १०३ पत्रकारांपैकी केवळ २७ पत्रकारांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. नायर यांना नंतर तुरुंगात धाडण्यात आले.


    भारतीय पत्रकारिता ही मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य व प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अशा चतु:सूत्रीचा आग्रह धरणारी आहे. नायर या चतु:सूत्रीचे एक महत्त्वाचे वाहक होते. दिल्लीत कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठी ते नेहमीच आग्रही होते. भारतीय पत्रकारितेने आणीबाणी अनुभवली, त्यातून ती अधिक बेडर झाली. मात्र, आज माेदी सरकारच्या काळात तशी पत्रकारिता राहिली नाही, याबाबत निराश होते. त्यांचे हे निरीक्षण प्रत्येक सरकारच्या काळातही खरे ठरणारे हाेते. नव्या पिढीतील पत्रकारांना 'बिटविन द लाइन्स' वाचायला शिकवणाऱ्या कुलदीप नायर यांनी 'बियाँड द लाइन्स' या आत्मचरित्रात पुरेसा पुरावा हाती नसताना काही निष्कर्ष नाेंदवले, अखेर स्वत: नायर यांना ताे भाग मागे घ्यावा लागला हाेता, हेही नमूद केले पाहिजे.

Trending