Home | Editorial | Agralekh | editorial about speeches in others country

परकीयांमध्ये बूज राखा (अग्रलेख)

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 28, 2018, 06:54 AM IST

राहुल गांधींच्या युरोप आणि इंग्लंड दौऱ्यामुळे सत्ताधारी भाजपचा चांगलाच जळफळाट झालेला दिसतो.

  • editorial about speeches in others country

    राहुल गांधींच्या युरोप आणि इंग्लंड दौऱ्यामुळे सत्ताधारी भाजपचा चांगलाच जळफळाट झालेला दिसतो. राहुल यांची वक्तव्ये इतकी झोंबली आहेत की काहींनी त्यांच्याविरोधात थेट खटलाच भरला आहे. 'पप्पू' म्हणून समाज माध्यमांमधून एरवी यथेच्छ टिंगल उडवणाऱ्यांना दखल घ्यावी लागते हे राहुल यांचे मोठे यशच म्हणायचे. राहुल यांच्या परदेशातल्या विधानांवर आगपाखड करण्याचा अधिकार नरेंद्र मोदींच्या समर्थकांना पोहोचतो का, याचाही विचार यानिमित्ताने व्हावा. वास्तविक राहुल गांधींवर कोणतीही संवैधानिक जबाबदारी नाही. सध्या ते स्वत: किंवा त्यांचा पक्ष सत्तेत नाहीत. भारतातल्या सर्वात जुन्या आणि सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा ही राहुल यांची जगासमोरची ओळख आहे. तीन माजी पंतप्रधानांचा वारसदार म्हणून राहुल यांच्याकडे पाहिले जाते. जगात त्यांना निमंत्रित केले जाते ते केवळ याच पात्रतेच्या आधारे. अपेक्षा एवढीच असते की, परकीयांपुढे भारताची प्रतिमा खालावणार नाही याचे भान जबाबदार नेत्यांनी दाखवावे. सरतेशेवटी मायदेशी कितीही मतभेद असले तरी परकीयांपुढे 'आम्ही एकशेपाच' हीच एकी ठामपणे व्यक्त व्हायला हवी. राहुल यांनी हे भान दाखवले नाही. नरेंद्र मोदींनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा पंतप्रधान म्हणून गेल्या चार वर्षांत जगात अनेक भाषणे केली. त्या भाषणांचे दाखले उगाळत बसले तर मग देशाच्या बदनामीचा मुद्दा मोदीभक्तही ताणू शकणार नाहीत. त्यामुळे परदेशात देशाची बदनामी करण्याच्या मुद्द्यावर मोदी आणि राहुल यांच्यात फरक नसल्याचे मान्य करावे लागेल. याचा अर्थ हे नेते अपरिपक्व आहेत, असा अजिबात नाही. देशातल्या बदलत्या राजकीय व्यवहाराचे प्रतीक म्हणून या दोघांकडे पाहावे लागेल. परदेशात गेल्यानंतरही नेते म्हणवणारी मंडळी मायदेशीच्या श्रोत्यांना-वाचकांना-प्रेक्षकांना 'लक्ष्य' करून बेजबाबदारपणा करतात. दुरून नेम धरण्याचा या नेत्यांचा उथळपणा देशाच्या दृष्टिकोनातून मुळीच शोभनीय नाही. एकाच बाबतीत राहुल हे मोदींपेक्षा उजवे आहेत. लोकांना सामोरे जाण्याचे धाडस राहुल दाखवतात. लोकांच्या थेट प्रश्नांवर अनेकदा भंबेरी उडते, हसे होते तरीही हा धोका राहुल पत्करतात. जनतेचा थेट सामना करण्याचे धारिष्ट्य मोदींनी आजवर ना देशात दाखवले ना परदेशात. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन राहुल यांच्या युरोप-इंग्लंड दौऱ्यातल्या ताज्या विधानांकडे पाहावे लागते.


    नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राहुल यांच्या मातोश्रींनी त्यांची संभावना 'मौत का सौदागर' अशी केली. २००२ च्या गुजरात दंगलींचा संदर्भ त्याला होता. याला प्रत्युत्तर म्हणून १९८४ च्या शीख हत्याकांडाचा संदर्भ देण्याची भाजपची रणनीती असते. मात्र, १९८४ च्या संदर्भात काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सन २००५ मध्ये संसदेच्या पटलावर केवळ शिखांचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची माफी मागितली होती. तशी माफी मोदी, लालकृष्ण अडवाणी किंवा भाजपच्या कोण्या राष्ट्रीय अध्यक्षांनी २००२ संदर्भात मागितल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे हे दोन्ही मुद्दे वारंवार राजकीय पटलावर येत राहतात. विशेषत: भारतीय नेते परदेशात गेल्यानंतर हे प्रश्न जाणीवपूर्वक विचारले जातात. यावर दोन्ही बाजूंच्या भारतीय नेत्यांचा प्रतिसाद निराशाजनक असतो. वास्तविक इंग्लंडसारख्या वसाहतवादी देशाने भारतातल्या दंगल-हत्याकांडाबद्दल प्रश्न करावेत, हाच मोठा ऐतिहासिक विनोद आहे. ज्या इंग्लंडने १९५० पूर्वी जगभरात लाखोंच्या कत्तली केल्या, देश बळकावले त्यांनी गेल्या पाच हजार वर्षांत एकाही देशावर आक्रमण न करणाऱ्या भारताला प्रश्न विचारावेत? तीच गोष्ट युरोप-अमेरिकेची. स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, रशिया, जर्मनी आणि अमेरिका यांनी लाखोंचा नरसंहार केला, वंशविच्छेद केला. तेच देश मानवी हक्क आणि लोकशाहीबद्दल भारताला प्रश्न विचारतात.


    अशा वेळी "आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. यात नाक खुपसण्याचा नैतिक अधिकार इंग्लंड-युरोप किंवा अमेरिकेला नाही', असे खडसावण्याचा बाणेदारपणा राहुल किंवा मोदी दाखवत नाहीत. उलट परदेशात जाऊन मायदेशातल्या पक्षीय राजकारणातली उणीदुणी ते काढत बसतात. तुम्ही पंतप्रधान असता तर डोकलाममधल्या घुसखोरीवर काय केले असते, या प्रश्नावर 'या समस्येचे तपशील माझ्याकडे नसल्याने मी उत्तर देऊ शकत नाही,' असे राहुल म्हणाले. हेच राहुल लोकसभेतल्या परराष्ट्र धोरणविषयक समितीचे सदस्य आहेत. हेच राहुल पंतप्रधानपदाच्या अनेक उमेदवारांपैकी एक आहेत. त्यामुळे परकीय व्यासपीठावर त्यांनी दाखवलेला ढिसाळपणा लाजिरवाणा आहे. पक्षापेक्षा राष्ट्र मोठे या विशाल वृत्तीचा अभाव हे आजच्या राष्ट्रीय राजकारणातले वैगुण्य आहे. राहुल यांनी किमान इंदिरा गांधींकडून आणि नरेंद्र मोदींनी किमान अटलबिहारी वाजपेयींकडून हा दुर्मिळ गुण आत्मसात करणे देशहिताचे ठरेल.

Trending