आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांची करमणूक (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मविश्वास ही बहुतांश वेळा दाखवण्याचीच बाब असते. राजकारण्यांमध्ये तर ती तेवढ्यासाठीच असते असा पक्का समज आहे. निवडणुका जसजशा जवळ यायला लागतात तसतसे आत्मविश्वासाचे प्रदर्शन वाढत जाते. दाखवला जात असलेला आणि प्रत्यक्षात असलेला आत्मविश्वास यातला फरक इतरांना कळत असतो. पण त्याचे भान राजकारणात ठेवायचे नसते. या कलेत जो जास्त मातब्बर तो पक्का राजकारणी असे म्हणतात. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही मातब्बरी सिद्ध करण्याची स्पर्धा करताहेत, असे सध्याचे चित्र आहे. राज्यातल्या लोकसभेच्या निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघांत आमचेच उमेदवार स्वतंत्रपणे निवडून येणार आहेत, हा त्या दोघांचा दावा त्यामुळेच अजून तरी कोणी फारशा गांभीर्याने घेतलेला नाही. 


अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या प्रमुख खासदारांना मुंबईत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्या बातम्याही माध्यमांमधून प्रसारित झाल्या आहेत. भाजपशी युती नाहीच हे ठामपणे सांगून राज्यात प्रचार सुरू करण्याचा नेहमीचाच संपादकीय सल्ला संजय राऊत यांनी उद्धव यांना दिल्याचे सांगण्यात येते आहे. राऊत यांचा नेमका उद्देश काय आहे, याबाबतीत त्यांच्याच पक्षात प्रश्न असतात. या सल्ल्याबाबतही ते असतीलच. कारण याच बैठकीत काही ज्येष्ठ खासदारांनी उद्धव यांना सबुरीचा सल्लाही दिला असे म्हणतात. आतापर्यंत जे झाले ते झाले. पण यापुढे अधिक गंभीरपणे शिवसेनेने निर्णय घेतले पाहिजेत, असे या खासदारांचे म्हणणे असावे. भाजपबरोबर युती करायची की नाही, या बाबतीतला निर्णय दसऱ्यानंतर घ्यावा, असेही अनेक खासदारांनी सुचवले आहे. उद्धव यांना हा सल्ला कितपत पटला, हे अजून मातोश्रीच्या बाहेर आलेले नाही. दसरा मेळाव्यात ते स्पष्ट होईलच. पण शिवसेनेतल्या ज्येष्ठ खासदारांनी दिलेला सल्ला शिवसेनेच्या 'मातब्बरी'बाबत मात्र प्रश्न उपस्थित करणारा नक्कीच आहे. शिवसेनेच्या त्या सल्लागार खासदारांना भाजपबरोबर युती करण्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज भासते आहे, हे शिवसेनेतल्या नेत्यांचा आत्मविश्वास ढासळत चालल्याचे लक्षण आहे. अर्थात, त्याला अलीकडेच काही इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी दाखवलेले सर्वेक्षणाचे निष्कर्षही कारणीभूत असू शकतात. शिवसेनेने स्वबळाचा हट्ट कायम ठेवला आणि तशीच निवडणूक झाली तर राज्यात शिवसेनेची 'काँग्रेस' होईल, असे हे निष्कर्ष सांगतात. म्हणजे शिवसेनेचे संख्याबळ दाेनपर्यंत मर्यादित होऊ शकते. तसे झाले तर खापर अर्थातच उद्धव यांच्या नेतृत्वावरच फुटणार आहे. जे शिवसेनेचे तेच भारतीय जनता पक्षाचेही आहे. युती न करता लढणे त्यांनाही महागात पडणार आहे. म्हणूनच शिवसेनेकडे त्यांचा युतीचा आग्रह सुरू आहे. शिवसेना मात्र भाजपच्या नेत्यांवर आता विश्वास ठेवायला तयार नाही. ऐनवेळी भाजप स्वबळाची घोषणा करू शकते, हे शिवसेनेने अनुभवले आहे. त्यामुळेच ऐनवेळी युती झाली नाही तरी आपल्याकडे उमेदवार तयार आणि तयारीचे असावेत, असा उद्धव यांचा प्रयत्न आहे. त्या तयारीसाठी उमेदवारांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून स्वबळाची भाषा शिवसेना गेली काही वर्षे करीत आली आहे. त्यातले बळ आणि त्या माध्यमातून युतीबाबतचे चित्रही लवकरच स्पष्ट होईल, असे दिसू लागले आहे. 


खरे तर हे दोन्ही पक्ष एकमेकांशी खेळताहेत आणि मतदारांशीही. युती न करता लढणे किती महागात पडणार आहे, याचे भान दोघांनाही असायला हवे. राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी करणारे पक्ष ऐनवेळी काय करतील ती बाब वेगळी. पण आतापासून ज्यांचे डावपेच सुरू आहेत, त्यांची दखल सत्तेतले हे दोन्ही पक्ष घेणार नाहीत का? भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर आघाडी करीत वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला आंबेडकरी मतदारांचा किती पाठिंबा मिळेल, हा संशोधनाचा विषय आहे. पण भाजपने दुखावून ठेवलेेले धनगर, माळी आणि अन्य बहुजन वर्गातले मतदार या आघाडीकडे आकर्षित करण्यात आंबेडकर यांना बऱ्यापैकी यश येताना दिसते आहे. हाच बहुजन वर्ग शिवसेनेचाही खरा मतदार आहे. त्यामुळे जिथे प्रकाश आंबेडकरांचा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचा प्रभाव आहे, तिथे तरी ही आघाडी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचीही मते मोठ्या प्रमाणात खाणार आहे. धनगर मतदारांना खरोखरच या वंचित आघाडीत भविष्य दिसायला लागले तर शिवसेनेपेक्षाही नुकसान भाजपचेच होणार आहे. राज्याचे नेतृत्व करीत असलेल्या फडणवीसांना हे कळत नसेल असे नाही. पण आता बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हाताबाहेर गेल्या आहेत हेच खरे. मतदार मात्र स्वत:ची करमणूक म्हणूनच सध्या तरी या सर्व घडामोडींकडे पाहत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...