आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअटलबिहारी वाजपेयी यांचे वर्णन यापुढे भारताचे 'सर्वाधिक लाडके पंतप्रधान' म्हणून करावे अशी उत्स्फूर्त गर्दी त्यांच्या अंत्ययात्रेला उसळलेली दिसली. विशेषतः उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये वाजपेयींच्या निधनाने उदासीची पसरलेली लाट अभूतपूर्व अशीच ठरावी. जी व्यक्ती सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन दशक उलटले, जी व्यक्ती गेल्या दशकभरापासून विस्मरणाच्या गर्तेत आहे, जी व्यक्ती केवळ श्वास चालू असल्याने जिवंत आहे, एरवी आजच्या जगाशी कोणत्याही मार्गाने ज्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही अशा वाजपेयींनी भारतीयांच्या हृदयात काय स्थान प्राप्त केले आहे याचे दर्शन शुक्रवारी दिल्लीच्या तुडुंब रस्त्यांनी घडवले. खरे तर वाजपेयींचा कोणी वारसदार राजकारणात नाही. त्यामुळे कोणाला दाखवण्यासाठीची ही गर्दी नव्हती. अकस्मात मृत्यूमुळे फुटणारी ही शोक-सहानुभूतीची लाट नव्हती. लाखोंच्या संख्येने जमलेले सगळे भाजपचेही समर्थक नव्हते. या अलोट गर्दीमागचे रहस्य हेच वाजपेयींच्या शक्तिस्थळांवर प्रकाश टाकणारे आहे.
पंडित नेहरूंप्रमाणे राष्ट्रपित्याचा हात वाजपेयींच्या पाठीवर नव्हता. इंदिरा गांधींना लाभलेले पक्षाचे भरभक्कम पाठबळ नव्हते. राजीव गांधींसारखी विरासत वाजपेयींच्या नशिबी आली नाही. जात, पैसा, मनुष्यबळ अशी राजकारणातली कोणतीच प्रचलित ताकद त्यांच्याजवळ नव्हती. सर्वसामान्य शिक्षक कुटुंबातून येत सहा दशके वाजपेयी राष्ट्रीय राजकारणात पाय रोवून उभे ठाकले. केवळ संघर्ष, वक्तृत्व, नेतृत्व आणि अंतर्यामी लोभस मनाच्या जोरावर. 'जय श्रीराम'चा गजर करणाऱ्या मतदारांनी त्यांना जेवढे डोक्यावर घेतले तितकीच ताकद लखनऊच्या मुस्लिम मोहल्ल्यांमधून वाजपेयींना मिळत राहिली. व्यक्तिमत्त्वात खोट असती आणि नियत साफ नसती तर दोन ध्रुवावरचे प्रेम मरणानंतरही वाजपेयींना साथ करत राहिले नसते. सकारात्मक, विधायक, विद्वेषमुक्त, निष्कपट, चारित्र्यवान राजकारणाच्या पायावर काय उंचीची राजकीय कारकीर्द घडू शकते याचे स्मारक वाजपेयींनी भारतीय राजकारणात प्रस्थापित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपचे कित्येक नेतेगण वाजपेयींच्या अंत्ययात्रेसाठी आठ-नऊ किलोमीटर पायी चालून गेले. वाजपेयींच्या जादुई नेतृत्वाची ही कमाई होय. देशातले यच्चयावत विरोधक वाजपेयींच्या निर्व्याज, संवेदनशील आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाचे चाहते होते. 'राइट मॅन इन द राँग पार्टी' असे वाजपेयींचे वर्णन होत असे. अर्थात भाजपच्या संस्थापकांपैकी एक वाजपेयी स्वतःच असल्याने त्यात तथ्य नव्हते. नेहमी स्वतःचे मत झाकून ठेवणारा अजातशत्रू असू शकतो. वाजपेयींचे तसे नव्हते. स्वतःच्या भूमिकांवर ते ठाम राहिले. फार कशाला.. मातृसंस्था संघाचीही वैचारिक गुलामी त्यांनी पत्करली नाही. अनावश्यक आक्रमकतेचा गवगवा न करता कविमनाच्या वाजपेयींनी कणखर बाणा दाखवला. कापूस आयातदार भारत कापूस निर्यातदार बनला. कारण बीटी तंत्रज्ञानाला वाजपेयींनी हिरवा झेंडा दाखवला. पर्यावरणवादी किंवा संघप्रणीत भोंगळ स्वदेशीवादापुढे झुकून त्यांनी विज्ञाननिष्ठतेला मूठमाती दिली नाही. अस्सल भारतीय संशोधन असलेली बीटी मोहरी व इतर बीटी पिके गेली दहा वर्षे केंद्राच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, शक्तिशाली सोनियांचे, शेतीतज्ज्ञ पवारांचे सरकार येऊन गेले अन् आता नरेंद्र मोदींचे आहे. यातल्या कोणीच विज्ञानाला चाल देण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही. अमेरिकेला झुगारून पोखरणमध्ये अणुचाचणी करण्याचे धैर्य याच विज्ञाननिष्ठ वाजपेयींनी दाखवले होते. दूरसंचार सेवेला गती द्यायची असो, सर्व राज्यांना जोडणारी 'सुवर्ण चतुष्कोन' ही राष्ट्रीय महामार्गांची योजना असो, यातून आधुनिक वाजपेयींचे दर्शन घडले. विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी घोषित करून वाजपेयींनी राजकीय खमकेपणाही वेळप्रसंगी दाखवला. तोट्यातल्या सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय, दिल्ली-लाहोर बससेवा, भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणे किंवा कंदहारमधून भारतीय अाेलिसांची सुटका असो.. वाजपेयींनी टीकेची, निंदेची, विरोधाची पर्वा न करता राष्ट्रहिताचे निर्णय घेतले. याउपरही व्यक्तिगत रागलोभाचे, सुडाचे राजकारण त्यांनी केले नाही. अठरा तास काम न करताही वाजपेयींचे मंत्रालय गेल्या अनेक वर्षांतले सर्वाधिक तत्पर ठरले.
वाजपेयींचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता म्हणून तर निःशंकपणे त्यांनी सहकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्याकडून कामे करून घेतली. म्हणून तर वाजपेयींच्या मंत्रिमंडळात एकाच वेळी लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, जॉर्ज फर्नांडिस, जसवंत सिन्हा, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, राजनाथसिंह आदी वेगवेगळ्या क्षमतांचे आणि विभिन्न कुवतीचे नेते एकत्र नांदले. वाजपेयींच्या वक्तृत्वाला प्रतिभेची भरजरी झालर होती. त्याचे अनुकरण करता येत नाही. वाजपेयींच्या दिलखुलास नेतृत्वगुणांची विरासत कोणी लुटायची ठरवले तर मात्र कुठली आडकाठी येणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.