आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधनामागील अहंकार (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१३ मध्ये यूपीए-२ सरकारच्या काळात पेट्रोलचे दर पाच रुपयांनी वाढले होते त्या वेळी भारत बंद पुकारून भाजपसह विरोधी पक्षांनी सरकारविरोधात मोठा आक्रोश व्यक्त केला होता. ठिकठिकाणी रास्ता रोको, रेल रोको, निदर्शने, सरकारविरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती. त्या वेळी भाजपचे सर्वच नेते जे आज पंतप्रधानपद, संरक्षणमंत्रिपद, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्रिपद, पेट्रोलियम खाते सांभाळत आहेत ते पेट्रोल दरवाढीसाठी सरकारला जबाबदार धरत होते. मोदींपासून जेटलींपर्यत, सुषमा स्वराज यांच्यापासून जावडेकरांपर्यंत भाजपचे नेते पेट्रोल दरवाढीमागे मनमोहनसिंग सरकारची 'नाकामयाबी' असल्याचे सांगत होते. या देशाचा पंतप्रधान अर्थतज्ज्ञ आहे, पण देशाचा रुपया आयसीयूमध्ये आहे, असा आरोप हे नेते ठासून करत होते. त्या वेळी सत्तेत बसलेले काँग्रेस नेते पेट्रोल दरवाढीमागचे कारण आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे असल्याचे सांगत होते आणि विरोधक सरकारच्या भूमिकेची खिल्ली उडवत होते. 


बरोबर पाच वर्षांनी परिस्थिती उलट झाली आहे. सत्तेतले मंत्री रस्त्यावर उतरले आहेत व रस्त्यावरचे नेते सत्तेत मंत्री म्हणून आले आहेत. काँग्रेस मंत्री पेट्रोलवाढीमागची जी कारणे सांगत होती तीच कारणे भाजपचे मंत्री सांगत आहेत. मग नेमकं बदललं काय? बदललं हेच की जी मंडळी वास्तवाचे विपर्यस्तीकरण करत आपण सत्तेवर आल्यानंतर जनतेला 'अच्छे दिन' दाखवू शकतो, अशा गर्जना करत होते त्यांच्याकडे तशाच उद्धभवलेल्या परिस्थितीवर उत्तरे शोधताना नाकी नऊ येताना दिसत आहे. गेले दोन महिने इंधन दरवाढ व रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होताना दिसत आहे, पण या प्रश्नांबाबत जनतेशी संवाद साधताना सरकार दिसत नाही. मोदी सरकारमध्ये एक प्रकारची अहंमान्यता दिसत आहे. आता सत्तेत ना अर्थतज्ज्ञ आहेत ना केंद्रात 'नाकामयाब' सरकार आहे, मग रुपया रोज का घसरतो आहे, पेट्रोलचे दर मागच्या सरकारच्या काळापेक्षा आताच का वेगाने वाढत आहेत, याची उत्तरे सरकारकडे अजिबात नाहीत. 


जर मोदी सरकारकडे चांगल्या नामवंत अर्थतज्ज्ञांची फळी असेल तर त्यांनी पेट्रोल दरवाढीबाबत, घसरत्या रुपयाबाबत तत्काळ समिती बसवावी, त्यावर तोडगा काढावा. आता सर्वसामान्य जनतेला अर्थकारण समजत नाही, असेही म्हणता येत नाही. सर्वांना कळून चुकले आहे की, पेट्रोलच्या किमती कमी-जास्त करणे हे भारताच्या पंतप्रधानांच्याही हातात नसते; पण पेट्रोल-डिझेलवर लावलेले अव्वाच्या सव्वा कर कमी-जास्त करण्याचे अधिकार मात्र पंतप्रधानांकडे असतात. मुद्दा प्रशासकीय धोरणांचा आहे, सरकार म्हणून जनतेपुढे तुम्ही कसे सच्चेपणाने जाता याचा आहे. 


महागाई, इंधन दरवाढ, चलनाचे अवमूल्यन हे आर्थिक घटक जागतिकीकरणामुळे कोणा एका देशाच्या हातात राहिलेले नाहीत. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे, तेजी-मंदीमुळे, युद्धसदृश परिस्थितीमुळे, आर्थिक निर्बंधांमुळे प्रभावित होत असते. भारत त्याला अपवाद नाही. आपल्याला आज इंधन दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन होताना दिसते त्यामागे आंतरराष्ट्रीय परिस्थितीच कारणीभूत आहे. पण मोदी-शहा-जेटली-स्वराज मंडळींनी २०१३मध्ये जनतेमध्ये जे स्वस्ताईबाबत गैरसमज करून ठेवले होते त्या गैरसमजांचे बळी आता हीच मंडळी होताना दिसत आहेत. 


कालच्या भारत बंदला देशात जोरदार किंवा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसने असा दावा केला की, त्यांच्या बंदला २२ पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. मुळात या बंदमध्ये काँग्रेसमध्ये किती ताकद आहे हे दिसून यायला हवे होते. तशी ती दिसून आली नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी कडकडीत बंद व्हावा यासाठी जिल्हा, गावपातळीवर कसून तयारी केली नाही. आताचे कुठलेही बंद कडकडीत होत नाहीत, कारण जागतिकीकरणामुळे विविध सामाजिक स्तर निर्माण झाले आहेत. 


कामगार-शेतकरी संघटना यांच्या शक्ती क्षीण झाल्या आहेत. काँग्रेसकडे आजच्या घडीला शेतकरी-कामगार संघटनांचे जाळे नाही. डाव्यांनी व अन्य विरोधी पक्षांनीही बंद कडकडीत व्हावा म्हणून आपापली ताकद लावली नाही. याचा अर्थ असाही नाही की मोदी सरकारने विरोधी पक्षात एकी, सहमती नसल्याचे दिसत असल्याने हुरळून जावे. बंदला जनतेचा प्रतिसाद फारसा नाही. याचे कारण जनतेला अद्याप काँग्रेस व विरोधकांवर विश्वास नाही. पण याचा अर्थ जनता मोदींवर खुश आहे, असा अजिबात नाही. उलट संघ परिवारातील कार्यकर्तेही उलट बोलू लागले आहेत. मोदींची अहंमन्यता हाच त्यांचा मोठा शत्रू ठरणार याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. विरोधकांमागे सध्या जनता नाही, पण मोदींना सोडचिठ्ठी देण्याची संधी जनता शोधीत आहेत, हेही सत्य नाकारता येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...