आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेहमननंतरचे मन्वंतर (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या शतकाच्या पहिल्या दशकात जगाला हादरवून टाकणाऱ्या दोन घटना अमेरिकेत घडल्या. या घटनांनी जगाची राजकीय, आर्थिक रचना हादरली. पहिली घटना ११ सप्टेंबर २००१रोजी न्यूयॉर्कमध्ये घडली. अमेरिकेच्या भांडवलशाहीचे प्रतीक असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवादी हल्ल्यात जमीनदोस्त झाले. या घटनेनंतर जग सावरत असताना १५ सप्टेंबर २००८ रोजी लेहमन ब्रदर्स या बलाढ्य बँकेला दिवाळखोरी जाहीर करावी लागली. लेहमनने दिवाळखोरी जाहीर केली तेव्हा त्यांचे भागभांडवल ६०० अब्ज डॉलर्सहून अधिक होते. अमेरिकेत स्वस्त गृहकर्ज वाटपाची लाट आली होती. जवळपास सर्वच अमेरिकी बँका, वित्तीय संस्था ग्राहकांना स्वस्त व्याजदरात, काही वेळा विनातारण गृहकर्ज देत होत्या. यातून गृहकर्जवाटपाचा प्रचंड अतिरेक झाला व ग्राहकांनी कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शवताच सर्व बँका व लेहमन ब्रदर्स गटांगळ्या खाऊ लागले. त्यात छोट्या बँकांनी स्वत:ची दिवाळखोरी जाहीर केली व लेहमनला त्याचा मोठा फटका बसला. 


लेहमन गृहकर्ज घोटाळ्यामुळे दिवाळखोरीत गेली असली तरी याचे परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या सदस्य देशांच्या व्यापारावर उमटले. आंतरराष्ट्रीय कर्जे उचललेल्या देशांमध्ये याने गोंधळ उडाला. कर्जप्रमाण कमी केल्याने एकट्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला दोन ट्रिलियन डॉलर नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम असा झाला की, ओबामा सरकारला अमेरिकेची बँकिंग व्यवस्था सावरण्यासाठी या क्षेत्राला ७०० अब्ज डॉलरचे पॅकेज द्यावे लागले. अमेरिकेची केंद्रीय बँक 'फेडरल रिझर्व्ह'ने व्याजदर शून्य टक्क्यावर आणला. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पैसा अर्थव्यवस्थेत ओतला गेला. लेहमनच्या दिवाळखोरीचे धक्के युरोपला तेवढेच बसले. ब्रिटनमध्ये लॉइड्स बँकेने एचबीओएसला वाचवले तर पुढे ब्रिटन सरकारने लॉइड्स व रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडला वाचवले. आइसलँड, ग्रीस, इटली, पोर्तुगाल अशा देशांच्या अर्थव्यवस्था गोत्यात आल्या. लेहमन ब्रदर्सची दिवाळखोरी जागतिक महामंदी आल्याचे सूचन होते आणि तसेच झाले. अमेरिकेत लाखो लोक बेरोजगार झाले. औद्योगिक उत्पादन घटले. आर्थिक विकास दर एक टक्क्याच्याही खाली आला. भांडवलशाही मृत्युपंथाला लागली असे कट्टर डावे म्हणू लागले. सरकारने बुडणाऱ्या व नफेखोर खासगी क्षेत्राला आर्थिक मदत देण्यावरून अमेरिकेत उभे दोन तट पडले. २००८ मध्ये ओबामा सरकार अमेरिकेत आले ते 'आशा' या घोषणेवर. अमेरिकेतल्या तळागाळातल्या जनतेने ओबामांना विक्रमी मतांनी निवडून दिले. ओबामा यांच्या काळात अमेरिकी अर्थव्यवस्था वेगाने स्थिरावू लागली, रोजगारवृद्धी वाढली, बँकांवर नियंत्रणाचे कायदे आणण्यात आले. महामंदीच्या विळख्यातून अमेरिकेसह जग बाहेर पडू लागले. 


१९२९ मध्ये अमेरिकेत मंदी आल्यानंतर त्याचे परिणाम दुसरे महायुद्ध भडकण्यात झाले. साम्राज्यवाद, बाजारपेठ वसाहतवादाच्या संघर्षातून दुसरे महायुद्ध झाले, पण या युद्ध परिस्थितीत फॅसिस्ट शक्तींचा उदय झाला. आर्थिक मंदीत भांडवलशाही अधिक आक्रमक होते आणि ती स्वत:च्या स्वार्थासाठी उजव्या विचारसरणीला गुप्त पाठिंबा देते. या इतिहासाची पुनरावृत्ती गेल्या दहा वर्षांच्या अर्थकारणावर व राजकारणावर नजर टाकल्यास लक्षात येते. महामंदीत गेल्यानंतर अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्ष सलग दोन वेळा निवडून आला, पण याच काळात ट्रम्प यांच्या कट्टर भांडवलवादी, राष्ट्रवादी, वंशद्वेषी, स्थलांतरविरोधी भूमिकेने जनमताचा कौल बदलून तेथे डेमोक्रॅटिक पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. उजव्या विचारसरणीची, बाजाराधिष्ठित नफेखोरीची लाट युरोप, भारतापर्यंत धडकली. 


ब्रिटनने स्थलांतराच्या मुद्द्यावरून युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर फ्रान्स, पोलंड, जर्मनी, इटली, हंगेरी, स्वीडनमध्ये डाव्या, समाजवादी, मध्यम उदारवादी विचारसरणीला आव्हान देणाऱ्या कट्टर उजव्या विचारसरणींनी डोके वर काढले. दुसरीकडे सिलिकॉन व्हॅलीमधल्या केवळ पाच तंत्रज्ञाननिर्मित कंपन्यांनी जगाच्या अर्थकारणावर अंकुश ठेवण्यास सुरुवात केली. आज अमेरिका-चीनमध्ये तुंबळ व्यापारयुद्ध सुरू आहे, अमेरिकेने व्याजदर वाढवले आहेत. जगभर पेट्रोलचे दर गगनाला भिडत चालले आहेत. संरक्षणवादी धोरणांमुळे अमेरिकेचा डॉलर वधारत चालला आहे, तर विकसनशील देशांच्या चलनांची वेगाने घसरण होत आहे. महामंदीचा धसका घेतल्याने जगातल्या सर्वच देशांच्या बड्या बँकांनी आपापले नियंत्रण कायदे कठोर केले आहेत. आता महामंदीची शक्यता कमी आहे, पण लोकानुनयी आर्थिक-राजकीय धोरणांना मात्र जोर आला आहे. लेहमनच्या दिवाळीखोरीनंतरचे हे मन्वंतर बरेच काही सांगून जाते. 

बातम्या आणखी आहेत...