आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रविडी अस्मितेचा नेता (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूचे राजकारण हे तसे लोकरंजनवादी स्वरूपाचे, त्यात व्यक्तिगत हितसंबंधांना, व्यक्तिकरिष्म्याला महत्त्व आहे. तामिळ भाषिक समाज हा तीव्र जातिसंघर्षाबरोबर जातींच्या स्वतंत्र अस्मितांचाही एक मोठा समूह आहे. त्यामुळे या राज्यात ब्राह्मणेतर चळवळ वेगाने वाढीस आली. राजकारणात तिचे स्थान अनन्यसाधारण राहिले. १९४९ मध्ये अण्णादुराई यांनी द्रमुक पक्षाची स्थापना केली त्याला द्रविड चळवळीची पार्श्वभूमी होती. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राष्ट्रवादाला थेट विरोध न करता आपले प्रादेशिक वेगळेपण समाजावर ठसवण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रादेशिक अस्मिता हा आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठेवला. प्रत्येक जातीच्या, भाषेच्या अस्मितांना चुचकारण्यापेक्षा त्या सर्व अस्मितांना- त्यात ब्राह्मणांनाही- एकत्र करून घेण्याची किमया त्यांनी साध्य केली. 


आरक्षण व विविध कल्याणकारी योजना राबवून आपली विविध सामाजिक घटकांशी नाळ जोडून घेणे, शासनव्यवहार व भावनिक आवाहने यावर भर देणे आणि सिनेमा, साहित्य अशा कलाप्रकारांतून राजकारणाची मोहिनी समाजावर कायम ठेवणे, असा अण्णादुराई यांच्या राजकारणाचा आकृतिबंध होता. त्यांनीच तयार केलेल्या पायवाटेवरूनच त्यांचे पट्टशिष्य असलेले करुणानिधी अखेरपर्यंत प्रवास करत राहिले. या प्रवासात त्यांनी भारतीय राजकारणात एक मध्यवर्ती भूमिका बजावली. भारत स्वतंत्र झाल्यापासून काही मोजकेच पण प्रादेशिक नेते दिल्लीच्या राजकारणात आपले पत्ते टाकून शह-काटशहाचे राजकारण करण्यात यशस्वी झाले त्यात करुणानिधी यांचे अग्रक्रमाने नाव घेतले जाईल. ९० च्या दशकात बोफोर्सवरून काँग्रेस खिळखिळी झाली त्या वेळी राष्ट्रीय राजकारणात जनता दलाने आघाडीचे सरकार देशाला दिले होते, त्या आघाडीत करुणानिधींचा द्रमुक होता. पुढे हिंदुत्वाच्या लाटेवर आलेल्या वाजपेयींसोबत एनडीएमध्ये ते सामील झाले व नंतर सोनिया गांधी यांनी तयार केलेल्या यूपीए-१-२ सरकारमध्ये ते सामील झाले होते. राष्ट्रीय राजकारणात वारे कोणत्या दिशेला फिरणार आहेत, याचा अदमास घेणारे प्रादेशिक राजकारणातील ते चाणाक्ष नेते होते. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता तयार करणे व त्यातून आपले नेतृत्व अधिक बळकट करत राहणे हे त्यांच्या राजकारणाचे एक अंग होते. या कलेमुळे व तामिळ जनतेमधील प्रचंड लोकप्रियतेमुळे करुणानिधी पाच वेळा मुख्यमंत्री झाले. १३ वेळा ते आमदार म्हणून निवडून आले व द्रमुक पक्षाचे सुमारे पाच दशके ते अध्यक्षही राहिले. या एवढ्या प्रदीर्घ काळात तामिळनाडूच्या राजकारणात जेवढी उलथापालथ झाली त्याचे धक्के, चटके त्यांनी स्वत: सोसले. 


करुणानिधी हे रस्त्यावर जन्माला आलेले कडवे, चिवट नेतृत्व होते. या नेतृत्वाकडे ओजस्वी भाषणकला होती. साहित्यिकाचा पिंड होता. िसनेमा माध्यमातला अनुभव होता आणि महत्त्वाचे म्हणजे राजकारण पोथीबद्ध विचारांवर न चालता ते लवचिक विचारधारेवर केल्यास टिकते हा व्यावहारिकपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे एमजीआर असो वा जयललिता, या दोन दिग्गज नेत्यांच्या करिष्म्यातही करुणानिधींची लोकप्रियता कमी झाली नाही. समाजातील लोकप्रियता, त्यातून निर्माण झालेले व्यक्तिमाहात्म्य राजकारणात टिकण्यासाठी पक्षाला आर्थिक, सामाजिक कार्यक्रम द्यावा लागतो. नेत्याला प्रागतिकतेचे भान असावे लागते. करुणानिधी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्याच कारकीर्दीत तामिळनाडूला औद्योगिक राज्य करण्याच्या दिशेने वाटचाल केली. राज्याच्या औद्योगिक विकासात खासगी उद्योगांना वाव देताना त्यात भागीदार म्हणून त्यांनी सरकारलाही मोकळीक दिली. राज्यात औद्योगिक वसाहती स्थापन केल्या त्याचबरोबर उद्योगांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी संस्था जन्मास घातल्या. त्यामुळे तामिळनाडूत औद्योगिकीकरणाचा पाया बळकट झाला. त्यांच्या बड्या प्रकल्पांबाबतच्या काही भूमिका वादग्रस्त होत्या. 


राजीव गांधी पंतप्रधान असताना रशियाच्या सहकार्याने उभ्या राहणाऱ्या कुडानकुलम अणुप्रकल्पाला त्यांनी विरोध केला होता. पण स्वत: सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हा विरोध बाजूला ठेवला. उलट हा प्रकल्प तामिळनाडूला प्रगतीकडे नेईल, अशा प्रतिक्रिया ते देत असत. ७० च्या दशकात तमिळनाडूतून काँग्रेस नामशेष होण्यास द्रमुक कारणीभूत होती. पण याच काँग्रेससोबत ते दोन वेळा यूपीए सरकारमध्ये सामील होते. आपली बदललेली भूमिका बुद्धिचातुर्याने मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. आज तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता व करुणानिधी हे दोन दिग्गज नेते नाहीत. सत्तेत असूनही गलितगात्र असलेल्या अण्णाद्रमुकच्या मदतीने भाजप राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे, तर द्रमुकचे नेते स्टॅलिन घराणेशाहीतल्या सुंदोपसुंदीमुळे बेजार आहेत. अशा स्थितीत करिष्मा असलेले एकच नेते रजनीकांत शिल्लक आहेत. त्यांच्याभोवती राज्याचे राजकारण केंद्रित होण्याची शक्यता अधिक आहे. 

बातम्या आणखी आहेत...