Home | Editorial | Agralekh | Editorial article about politics of white house

व्हाइट हाऊसमधील घमासान (अग्रलेख)

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 08:06 AM IST

अमेरिकेचा अध्यक्ष हा अमेरिकेच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळे शक्तिशाली असतो. तो जगातील सर्वाधिक सामर्थ्यवान समजल्या

  • Editorial article about politics of white house

    अमेरिकेचा अध्यक्ष हा अमेरिकेच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळे शक्तिशाली असतो. तो जगातील सर्वाधिक सामर्थ्यवान समजल्या जाणाऱ्या लष्कराचा प्रमुखही असतो. पण अमेरिका व जगाचे अर्थकारण-राजकारण हाकले जाते ते व्हाइट हाऊस या एका समांतर शक्तिशाली व्यवस्थेद्वारे. अमेरिकेच्या अध्यक्षालाही कधी ती अडचणीत आणू शकते (निक्सन यांचे वॉटरगेट प्रकरण). व्हाइट हाऊसचे स्वत:चे एक राजकारण असते, ती अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध राखण्याच्या हिशेबाने आपली धोरणे ताकद लावून रेटत असते. त्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षाला मनमानी करता येत नाही. दोन दिवसांपूर्वी 'न्यूयॉर्क टाइम्स' या जगातल्या अग्रगण्य वर्तमानपत्रात ट्रम्प प्रशासनात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याचा निनावी लेख प्रसिद्ध झाला आहे.


    या लेखात ट्रम्प यांच्या विचित्र वागण्याने, त्यांच्या धरसोड-विसराळू वृत्तीने, विषयाचे गांभीर्य समजत नसल्याने अमेरिकेतल्या लोकशाही संस्थांचे किती मोठे नुकसान होत चालले आहे याची खंत व्यक्त करण्यात आली. लेखाच्या सुरुवातीच्या काही वाक्यांतच ट्रम्प हे कमालीचे नीतिभ्रष्ट असल्याचे सांगत लेखकाने ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते असले तरी या पक्षाच्या 'फ्री माइंड्स, फ्री मार्केट, फ्री पीपल' मूल्यांशी ते एकनिष्ठ नाहीत, त्यांना कशाचेही सोयरसुतक नसल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांची अनेक विधाने देशातील पत्रकारिता व लोकशाहीविरोधातील आहेत. ट्रम्प यांचे दैनंदिन कामकाज त्यांच्या लहरीवर चालते. मागील बैठकीत काय निर्णय घेतला हे ट्रम्प विसरून जातात. आयत्या वेळी कोणताही निर्णय घेतात, घेतलेला निर्णय एका क्षणात बदलतात, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, त्यांना उद्देशून अपशब्द बोलणे, जाहीरपणे बेताल बोलणे, प्रशासनावर अविश्वास ठेवणे, स्वत:ची महती पुढच्यांवर सतत बिंबवत राहणे यामुळे व्हाइट हाऊस प्रशासन चालवणे अशक्य झाल्याचे म्हटले आहे. लेखकाने या परिस्थितीला 'टू ट्रॅक प्रेसिडेन्सी' असे खेदाने म्हटले आहे. यात व्हाइट हाऊसमध्ये कसे घमासान माजले आहे, याची कल्पना येते.


    योगायोगाने न्यूयॉर्क टाइम्समध्ये हा लेख प्रसिद्ध होण्याच्या अगोदर दोनच दिवसांपूर्वी वॉटरगेट प्रकरण उकरून काढणारे प्रख्यात पत्रकार बॉब वूडवर्ड यांचे 'फिअर' हे ट्रम्प यांच्या व्हाइट हाऊसचे अंतरंग उलगडून दाखवणारे किस्सेवजा पुस्तक प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाने अमेरिकेच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प प्रशासनातील अधिकारी ट्रम्प यांचे आदेश ड्रॉवरमध्ये कसे लपवून ठेवतात, त्यांच्या सूचनांकडे कसे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, ट्रम्प यांचे मन वळवण्याची जबाबदारी काही अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यांवर कसे सोपवतात याचे मनोरंजकपर किस्से या पुस्तकात आहेत. या पुस्तकातील एक किस्सा गमतीशीर आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या मित्रराष्ट्रांच्या विरोधात व्यापारयुद्ध सुरू केले. त्यांनी द. कोरियासोबतचा अनेक दशकांचा सुरू असलेला व्यापार करार रद्द करण्याबाबत आपल्या स्टाफला पत्र तयार करण्यास सांगितले. हे पत्र तयार झाले, पण या निर्णयाने देशाला आर्थिक नुकसान सोसावे लागेल याची कल्पना आल्याने या पत्रावर ट्रम्प यांची सही होऊ नये म्हणून त्यांच्याच मुख्य आर्थिक सल्लागाराने हे पत्र परस्पर आपल्याकडे ठेवले व वेळ मारून नेली.


    आणखी एक किस्सा ट्रम्प यांचा आततायीपणा दर्शवतो. गेल्या वर्षी अचानक ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करून त्या देशाच्या अध्यक्षांना पदच्युत करावे याबाबत हालचाली सुरू केल्या. पण ट्रम्प यांच्या अशा निर्णयाचे गंभीर परिणाम होतील व हे निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील, अशी त्यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांनी कल्पना दिल्याने ते या निर्णयापासून परावृत्त झाले. संपूर्ण जगात दहशतवादी संघटनांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक मदत बंद करण्याची लहर ट्रम्प यांना एकाएकी आली. त्यांनी तशी एकतर्फी घोषणा केली. पण व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांना पाकिस्तान-अमेरिकेच्या हितसंबंधांचा इतिहास माहीत असल्याने व अशी मदत बंद केल्याने अमेरिकेला भोगावे लागणारे परिणाम माहीत असल्याने त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी रेंगाळत ठेवली. अखेर पाकिस्तानला मिळणारी काही लक्षावधी डॉलरची मदत कमी करून हा विषय व्हाइट हाऊसने संपवून टाकला. ट्रम्प यांचे अतर्क्य व बेजबाबदार वागणे हा आता जगाच्या दृष्टीने चिंतेचा विषय झालेला आहे. आणि त्याची झळ व्हाइट हाऊसलाही बसत आहे. अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत एकाकी अध्यक्षाने लोकशाहीविरोधात, मतस्वातंत्र्याच्या विरोधात, महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्ये केलेली नाहीत. ट्रम्प याला अपवाद आहेत. गेल्या दोन वर्षांत ट्रम्प यांनी अनेकांना दुखावले आहे. आता दुखावलेले त्यांच्याविरोधात मोट बांधत आहेत.

Trending