आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिजाशीची किंमत (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रफाल विमान खरेदीवरून मोदी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे आणि अन्य काही समस्यांप्रमाणेच मोदी सरकारच्या मिजाशीची ही किंमत आहे. रफालवरून काँग्रेस निशाणा साधण्याचा प्रयत्न करणार हे राहुल गांधींच्या वक्तव्यावरून लक्षात येत होते. त्याच वेळी सावध होऊन मोदी सरकारने संवादाचा मार्ग घेतला असता वा आक्रमक पद्धतीने योग्य माहिती जनतेसमोर ठेवली असती तर आजच्या टीकेला किंमत राहिली नसती व संशयाचे धुकेही वाढले नसते. पण अहंमन्य पंतप्रधानांनी त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. 

 

मोदी यांच्या परवानगीशिवाय कोणालाही बोलायला बंदी आणि सर्व व्यवहार पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असल्याने अन्य मंत्र्यांना वा पक्षातील सहकाऱ्यांनी व्यवहाराची काहीही माहिती नाही. अन्य पक्ष सोडा, स्वपक्षीयांशीही मोदींनी याबाबत कधी संवाद साधल्याचे ऐकिवात नाही. जेटली व निर्मला सीतारमण हे दोनच नेते या कराराबद्दल बोलतात, पण त्यात काँग्रेसची टीका उद््ध्वस्त करणारी कोणतीही मौलिक माहिती नसते. हा विषय संरक्षणाशी संबंधित असला तरी मूळ मुद्दा पैशाच्या व्यवहाराचा आहे. पूर्वीच्या व आत्ताच्या करारात काय बदल झाला व तो का केला गेला, त्यामुळे किंमत वाढली असल्यास का वाढली, अन्य खासगी कंपन्यांना दिलेली कंत्राटे कोणत्या निकषानुसार दिली गेली आणि हिंदुस्थान एरोनॉटिकसारख्या सरकारी कंपनीला का डावलले याची आवश्यक तेवढी माहिती जनतेसमोर व्यवस्थित रीतीने मांडण्यास काही हरकत नव्हती. काही संवेदनशील माहिती प्रमुख विरोधी पक्षांसमोर ठेवता आली असती. काँग्रेसबद्दल विश्वास नसेल तर अन्य काही प्रमुख पक्षांशी बोलता आले असते. गुप्तता किती व कुठे पाळायची याचा विवेक ठेवून असा संवाद साधता आला असता. पण मोदींचा तो स्वभाव नाही आणि मोदींना तसे स्पष्टपणे सांगण्याचे धाडस अन्य कोणामध्ये नाही. 


खरे तर रफाल विमानांची खरेदी ही भारत व फ्रान्स या दोन सरकारमधील व्यवहार आहे. म्हणजेच त्यामध्ये दोन्हीकडील अनेक सरकारी यंत्रणा सहभागी आहेत. बोफोर्सप्रमाणे हा एका कंपनीशी झालेला करार नाही व त्यामध्ये, काँग्रेसने पैशासह पळून जाण्यास मदत केलेले क्वात्रोकीसारखे मध्यस्थ नाहीत. ही या करारातील फार मोठी जमेची बाजू आहे. पण त्यावर सरकारने कधीच जोर दिला नाही. फ्रान्स सरकारला विश्वासात घेऊन गुप्ततेची सीमा कमी करता आली असती. तोही प्रयत्न झाला नाही. किंबहुना ओलांद यांच्या वक्तव्याने मोदी सरकार गडबडले. ओलांदशी झालेली गळाभेट गळेकापू ठरते काय, असे वाटू लागले. भाजप, विशेषत: मोदी हे एकमेव राष्ट्रभक्त असल्याने त्यांनी केलेल्या करारावर संशय घेताच कसे, हाच एकमेव पवित्रा घेऊन सरकार प्रतिवाद करू लागले आणि अडचणीत सापडले. 


रफाल खरेदीबद्दल कोणतीही वस्तुनिष्ठ माहिती (फॅक्ट्स) फक्त फ्रान्स व भारत सरकार या दोघांकडेच आहे. राहुल गांधी यांचे सर्व आरोप हे ऐकीव माहितीवर आधारित आहेत. काँग्रेसकडे ना कागदपत्रे आहेत, ना पक्की माहिती देणाऱ्या व्यक्ती. निर्मला सीतारमण म्हणाल्या त्याप्रमाणे काँग्रेसने 'पर्सेप्शन बॅटल' सुरू केली आहे. भ्रष्टाचाराचा शिंतोडाही न उडालेले स्वच्छ सरकार अशी प्रतिमा घेऊन मोदींनी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊ नये म्हणून काँग्रेस अटीतटीचे प्रयत्न करत आहे. आम्ही जितके भ्रष्ट तितकेच हेही भ्रष्ट, दुर्दैवाने आमचा भ्रष्टाचार उघड झाला, यांचा पडद्यामागे सुरू आहे, हा छुपा युक्तिवाद राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपामागे आहे. बोफोर्सच्या काळात राजीव गांधींवर भाजपकडून झालेल्या आरोपाचे उट्टे काढण्याचीही ऊर्मी राहुल गांधींमध्ये दिसते. कारण राहुल गांधींच्या काही घोषणा या भाजपच्या पूर्वीच्या राजीवविरोधी घोषणांची आठवण करून देणाऱ्या आहेत. मात्र, ही सर्व व्यूहरचना लक्षात घेऊन मोदी सरकारकडून योग्य प्रतिवाद होणे आवश्यक होते. प्रश्न आर्थिक व्यवहाराचा आहे, त्याला आर्थिक माहितीनेच उत्तर दिले गेले पाहिजे. त्यामध्ये देशप्रेम, पाकिस्तानप्रेम, घराणेशाही असे भावनात्मक मुद्दे आणण्याची गरज नव्हती. ती चूक भाजप करत आहे. हिंदुस्थान एरोनॉटिकला बाजूला ठेवून अनिल अंबानींच्या कंपनीला का निवडले, यावर पटणारे उत्तर सरकारला देता आलेले नाही. यावर यापूर्वीच संसदेत चर्चाही होऊ शकली असती. काँग्रेसच्या काळात अंबानी बंधूंना मिळालेले कंत्राट मोदींच्या काळात फक्त अनिल अंबानींना मिळाले आणि त्यानंतर काँग्रेसने एकदम अनिल अंबानींवर का रोख धरला? काँग्रेसच्या काळात अंबानी बंधूंना कंत्राट देताना हिंदुस्थान एरोनॉटिक या राष्ट्रीय कंपनीचा राहुल गांधींना विसर पडला होता का, असेही प्रश्न उपस्थित होतात. त्याची सर्वांगीण चर्चा ही संसदेत होऊ शकते. मात्र, त्यासाठी सरकारची तयारी हवी. ती दाखवली नाही तर मोदींवरील संशय गडद होत जाणार आणि स्वच्छ कारभाराचे कवच गळून पडण्यास वेळ लागणार नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...