Home | Editorial | Agralekh | Editorial article about ram kadam

कदमांच्या माकडचेष्टा (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Sep 07, 2018, 09:54 AM IST

भाजप दावा करतो त्याप्रमाणे 'राम' नावाला तो पक्ष काही नैतिक अर्थ देत असता तर आमदार कदमांनी दहीहंडीच्या मुहूर्तावर तमाशा क

  • Editorial article about ram kadam

    भाजप दावा करतो त्याप्रमाणे 'राम' नावाला तो पक्ष काही नैतिक अर्थ देत असता तर आमदार कदमांनी दहीहंडीच्या मुहूर्तावर तमाशा केला नसता. कधी चक्क विधिमंडळात पोलिसालाच मारहाण, पार्ट्यांमधून नत्य यासारख्या कित्येक घटनांतून खरे म्हणजे या 'रामा'ने पूर्वीच मर्यादा ओलांडलेल्या आहेत. फरक इतकाच की, सत्तेचे छत्र नसल्याने कोणी दखल घेत नसे. आता हे राम महाशय केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या वळचणीला आहेत. या पक्षाच्या शिलेदारांवर माध्यमांच्या नजरा रोखलेल्या असणे स्वाभाविक आहे. रामायणातल्या प्रभू रामचंद्रांनी वानरांना सोबत घेऊन लंकादहनाचा पराक्रम गाजवला होता. आताच्या भाजपतले 'राम' स्वतःच्या माकडचेष्टांनी समाजाला मान खाली घालायला लावतात. कदमांच्या विधानाने भाजपला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. कदमांच्या माकडचेष्टा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने मराठी समाजमनही पुरते लज्जित झाले आहे. कोणत्या तरी धुंदीत माणसाकडून चूक घडू शकते. पण भानावर आल्यावर तरी चुकल्याची लाज वाटायला हवी. माफी मागितली पाहिजे असे मनातून वाटायला हवे. यावरून माणसाचा दर्जा कळतो. कदमांनी तीही संधी दवडली. शब्दच्छल न करता सपशेल क्षमायाचना त्यांनी करायला हवी होती. कदमांचा निर्ढावलेपणा इतका की सर्व थरातून यथेच्छ झोडपल्यानंतर माफी मागण्याची उपरती त्यांना झाली. तीदेखील ट्विटरवर. कदमांची मुजोरी कमी की काय म्हणून भाजपही दहीहंडी फुटल्यापासून तोंडात मिठाची गुळणी धरून बसला आहे. एरवी ज्यांची रसवंती मुक्तपणे वाहते त्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या तोंडातून एकही शब्द उमटलेला नाही. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष, महिला आमदार वाचा गेल्याप्रमाणे गप्प आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम कदमांना बोलावून त्यांची कठोर शब्दांत झाडाझडती घ्यायला हवी होती. एरवी अतिउत्साह दाखवून अनेकदा तोंडघशी पडणाऱ्या त्यांच्या 'सोशल मीडिया'वीरांनी या झाडाझडतीची प्रसिद्धी त्वरेने करायला हवी होती. पण जणू 'राम'बाण वर्मी लागल्याप्रमाणे वर्षावरही सामसूम आहे. भाजपचा हा बोटचेपेपणा संतापजनक आहे. राज्य महिला आयोगाने कदमांना तातडीने नोटीस बजावली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.


    कदमांचे 'रामायण' या नोटिशीने आटोपणार नाही. विरोधी पक्ष याचे राजकारण करणार. त्यांनी ते केलेही पाहिजे. म्हणूनच भाजपने यापूर्वीच कदमांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. बेताल कदमांवर पांघरूण घालायला ते जनसंघासाठी आयुष्य वेचलेले रामभाऊ म्हाळगी नव्हेत की नेते घडवणारे वसंतराव भागवत नव्हेत. अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांतच सांगायचे तर कदम म्हणजे एक संधिसाधू 'आयाराम'च. कदमांसाठी प्रतिष्ठा पणाला लावून भाजपने हसे करून घेऊ नये. सार्वजनिक जीवनात वावरताना शब्द-शब्द तोलूनमापून वापरला पाहिजे. जात, धर्म, वर्ण, लिंग, भाषा, शारीरिक व्यंग, आर्थिक स्थिती अशा कोणत्याच मुद्द्यावरून मतप्रदर्शन करणे हे हलक्या बुद्धीचे लक्षण असते. हे भान जपण्यामध्ये राज्यकर्त्यांनी इतरांपेक्षा शंभर अंगुळे पुढे असायला हवे. 'बाईचे नाव दिल्यावर दारू खपेल,' असे म्हणणारे मंत्री गिरीश महाजन, जाहीर भाषणात गुप्तांगाचा उल्लेख करून हशा वसूल करू पाहणारे खासदार शरद बनसोडे, सैनिकांच्या पत्नींबाबत टिप्पणी करणारे भाजप सहयोगी आमदार प्रशांत परिचारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवीगाळ करणारे भाजप उपनगराध्यक्ष श्रीपाद छिंदम आणि आता राम कदम ही राज्यकर्त्यांची पातळी लाजिरवाणी आहे. सुसंस्कृत, विद्वान राजकारण्यांसाठी महाराष्ट्र देशात नावाजलेला असल्याची स्थिती पालटूनही आता दशके लोटली. तळ गाठला तरी पाताळात घुसण्याची घाई तरी होऊ नये. बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळले तर राजकारणाची एकूणच बौद्धिक-वैचारिक पातळी चिंताजनक आहे. राजकारण्यांकडे बोट दाखवताना चार बोटे समाजाकडेच रोखलेली आहेत हेही विसरता येणार नाही. अविभाज्य भाग बनलेल्या 'सोशल मीडिया'चे बारीक लक्ष असताना, दैनंदिन व्यवहारातल्या बोलचालीत आपण सुसंस्कृत राहू द्या, पुरेसे बरे वागतो आहोत का, याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. 'तुमची पत्नी तरी आम्ही मागितली नाही,' असे विधान या महाराष्ट्रातल्या एका महिलेनेच मुख्यमंत्र्यांना उद्देशून केले त्याला फार दिवस झालेले नाहीत. तसे असेल तर मग 'समाजाची जी लायकी त्याच पात्रतेचे त्यांचे लोकप्रतिनिधी' असे म्हणावे लागेल. हे निश्चितच भूषणावह नाही. थोरामोठ्यांचा जयजयकार करायला, संत-महंतांचे गुणगान गायला अक्कल लागत नाही. त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी नैतिकता, प्रामाणिकता लागते. त्याला लागलेली ओहोटी चिंताजनक आहे. त्या विधानाचा गवगवा झाला नाही तरी राजकारणच नव्हे तर एकूण समाजाची घसरलेली सांस्कृतिक पातळी त्यावरून दिसते.

Trending