Home | Editorial | Agralekh | Editorial article about somnath chatterjee

लोकसभेतले हेडमास्तर (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Aug 14, 2018, 09:05 AM IST

सोमनाथ चटर्जी यांचा २००४-२००९ हा लोकसभेच्या अध्यक्षपदाचा पाच वर्षांचा काळ असाच वादळी होता.

  • Editorial article about somnath chatterjee

    आपल्या संसदीय लोकशाहीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्यपाल ही पदे घटनात्मक आहेत. त्यांची नियुक्ती निर्वाचित सदस्यांतून केली जाते. एकदा घटनात्मक पदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाच्या विचारधारेला कायमची तिलांजली द्यावी लागते, कारण ज्या पदावर नियुक्ती झाली आहे तेथील काम निरपेक्षपणे, तटस्थपणे, घटनेच्या चौकटीत, संसदेची प्रतिष्ठा सांभाळून करावे लागते. सत्ताधारी व विरोधक यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा लागतो. लोकसभा व राज्यसभा या दोन संसद सदनांचा कारभार समोर रणकंदन सुरू असताना तटस्थपणे चालवणे ही अग्निपरीक्षा असते. सत्ताधारी आपले काम मांडत असतात, तर विरोधक जाब विचारत असतात. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे आपण नसल्याचे दाखवावे लागते, त्याच वेळी विरोधकांना संसदीय नियमांच्या मर्यादेत ठेवावे लागते. विरोधकांवर नियंत्रण ठेवताना आपण सत्ताधाऱ्यांची तळी उचलतोय अशी शंका-समज-संशय विरोधकांच्या मनात येऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते.


    सोमनाथ चटर्जी यांचा २००४-२००९ हा लोकसभेच्या अध्यक्षपदाचा पाच वर्षांचा काळ असाच वादळी होता. केंद्रात डाव्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसप्रणीत यूपीए-१चे सरकार होते. २००८मध्ये भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्द्यावरून डाव्यांनी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आणि लोकसभेचे अध्यक्ष असलेल्या सोमनाथ चटर्जी यांना सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश माकप पॉलिट ब्युरोने काढला. संपूर्ण राजकीय आयुष्य डाव्या चळवळीत काढलेल्या सोमनाथ चटर्जी यांच्यापुढची ही सत्त्वपरीक्षा होती. ही परीक्षा त्यांच्या राजकीय निष्ठेची होती. ज्या राजकीय विचारधारेत आपण वाढलो, ज्या राजकीय पक्षाने अनेक दशके लोकप्रतिनिधी बनण्याची संधी दिली, त्या विचारधारेला, पक्षाला तिलांजली द्यायची की लोकसभा अध्यक्षाने घेतलेल्या शपथेला जागायचे, असा तो पेचप्रसंग होता. हा पेच डाव्यांच्या परंपरागत दुराग्रहीपणा, हट्टीपणा आणि दबावाच्या राजकारणातून आला होता. त्यामागे काँग्रेसविरोधातले वर्षानुवर्षे चाललेले राजकारण होते. लोकसभा अध्यक्षांवर दबाव आणून काँग्रेसला खिंडीत पकडण्याची संधी डाव्यांना हवी होती. पण लोकसभा अध्यक्षाला राजीनामा द्यायचा आदेश काढून पक्षादेशाप्रमाणे सरकारविरोधात मतदान करायला लावणे हे संसदीय संकेतांना धाब्यावर बसवण्यासारखे होते, शिवाय अशा राजकीय चाली खेळताना आपण संसदीय लोकशाही परंपरांमध्ये घातक पायंडे पाडत आहोत याचे भान डाव्यांमधील ढुढ्ढाचार्यांना नव्हते. जेव्हा लोकसभा अध्यक्षाची सर्वसंमतीने निवड होते तेव्हाच त्याला आपली पक्षीय विचारधारा मागे ठेवावी लागते, हा संकेत असतो. याचे पालन करणे हीच या पदाकडून अपेक्षा असते. सोमनाथ चटर्जी यांनी या पेचप्रसंगाला राजकीय जीवनात जपलेल्या नैतिकवादाने खणखणीत उत्तर दिले. त्यांनी पक्षादेश झुगारला. आपण लोकसभा अध्यक्ष असल्याने कोणत्याही पक्षाचे सदस्य नाही, त्यामुळे राजीनामा द्यायचा प्रश्नच येत नाही, अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. या भूमिकेमुळे डावे खवळले व त्यांनी सोमनाथ चटर्जी यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली. डाव्यांच्या या निर्णयामुळे दुखावलेल्या सोमनाथ चटर्जी यांनी पॉलिट ब्युरोने केलेली हकालपट्टी माझ्या राजकीय जीवनातील सर्वात दुर्दैवी क्षण, अशी प्रतिक्रिया दिली. या हकालपट्टीनंतर त्यांनी थेट राजकीय संन्यासच घेतला, पक्षाशी कोणत्याही प्रकारचे तडजोडीचेही प्रयत्न केले नाहीत.


    सोमनाथ चटर्जी हे लढाऊ नेते होते. विद्यार्थिदशेपासून कम्युनिस्ट विचारांशी नाते जोडल्याने त्यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य शोषित, वंचिताच्या राजकीय-आर्थिक-सामाजिक हक्कासाठी व्यतीत झाले होते. माकपच्या तिकिटावर १९८४ची निवडणूक वगळता दहा वेळा ते लोकसभेवर निवडून आले होते. एका निवडणुकीत त्यांचा पराभव ममता बॅनर्जी यांनी केला होता. नंतर काही वर्षांनी प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस वेगाने पसरत असून ती डाव्यांचे पानिपत करू शकते, असे भाकीत त्यांनी आपल्या पक्षातील ढुढ्ढाचार्यांपर्यंत पोहोचवले होते. पण डाव्यांना ममतांचे वादळ लक्षात आले नाही. पुढे डाव्यांचे प. बंगालच नव्हे, तर देशात काय झाले हा घटनाक्रम सर्वश्रुत आहे. देशातील राजकीय बदल कोणत्या दिशेने जात आहेत, याचा अचूकपणाने वेध घेणारा हा नेता होता. संसदेतील त्यांच्या भाषणात विद्वत्ता होती. संदर्भ होते. त्यांचे लोकसभा अध्यक्षपद बरेच गाजले. संसद सदस्यांना शिस्त लावण्याचे त्यांचे प्रयत्न असत. यावरून त्यांना 'हेडमास्तर' म्हणून संबोधले जात असे. लोकसभेतल्या शून्य प्रहराचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण त्यांनीच सुरू केले. संसद लायब्ररीत मुलांसाठी एक कट्टा त्यांच्या कारकीर्दीत सुरू झाला. अत्यंत साधे जगणे व जगण्यात सदैव माणुसकीचे दर्शन हे त्यांच्या व्यक्तित्वाचे गुण होते. त्यांच्या निधनानंतर राजकारणात एक आदर्शवत परंपरा शिल्लक राहिली आहे.

Trending