आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळा साहिब (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसाहतींचा इतिहास हा आर्थिक शोषणाबरोबर स्थलांतरितांचा आहे. त्यांच्या दु:खदैन्याचा, हालअपेष्टांचा आहे. तसाच तो त्यांच्या इच्छाआकांक्षांचा, अस्मितांचा आहे. व्ही. एस. नायपॉल यांनी 'अ हाऊस ऑफ फॉर मि. बिस्वास (१९६१) ही पहिली कादंबरी लिहिली तेव्हा दुसरे महायुद्ध संपून पंधराएक वर्षे झाली होती. हा काळ धामधुमीचा, वसाहतींच्या स्वातंत्र्यलढ्याचा होता. युरोपीय देशांच्या तावडीतून मुक्त झालेल्या वसाहती स्वत:च्या पायावर अडखळत उभ्या होत होत्या. अशा वसाहतींमध्ये शतकानुशतके परकीयांचे जोखड घेऊन पिचत पडलेल्या समाजाच्या शेकडो कहाण्या होत्या. अशी एक कहाणी नायपॉल यांनी जगापुढे आणली. ही कहाणी एका पत्रकाराची होती. त्रिनिदादमधील एका माणसाचे आयुष्य वासाहतिक पारतंत्र्यात चोहोबाजूंनी कसे जायबंदी झालेले असते त्याचा तो वेध होता. 


नायपॉल यांचे वडील भारतीय होते पण रोजगाराच्या निमित्ताने ते त्रिनिदाद येथे स्थलांतरित झाले व या देशात नायपॉल यांचा जन्म झाला. तरुणपणी ते इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकले. इंग्लिश समाजाच्या चालीरीती, त्यांच्या परंपरा, शिष्टपणा, स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेण्याचा या समाजाचा आग्रह याचा सांस्कृतिक परिणाम नायपॉल यांच्यावर खोलवर झाला. आपली मुळं, आपला रंग पण आपले पाश्चिमात्य समाजात जगणे, या समाजातील एलिटांमध्ये असलेला अहंभावीपणा, वंशवाद, आढ्यता यांच्यातील द्वंद त्यांच्या लेखनात डोकावू लागले. अशा द्वंदात त्यांनी ज्याला 'थर्ड वर्ल्ड कंट्रीज' (तिसरे जग) म्हणतात तेथे भेट देण्यास सुरुवात केली. भारतात ते तीन वेळा आले. या दौऱ्यावर त्यांनी 'अ एरिया ऑफ डार्कनेस', 'इंडिया : अ वुंडेड सिव्हिलायझेशन', अर्जेंटिनाला दिलेल्या भेटीवर 'द रिटर्न ऑफ इव्हा पेरॉन', इंडोनेशिया, इराण, पाकिस्तान व मलेशियाच्या दौऱ्यावर 'अमंग द बिलीव्हर्स', अमेरिकेच्या दक्षिण दौऱ्यावर ' अ टर्न इन द साऊथ' अशा कादंबऱ्या लिहिल्या. प्रवासवर्णनं, लेख लिहिले. अशा साहित्यातून त्यांनी अशिक्षित, गरीब, धर्माचा प्रभाव असलेल्या देशांमधील संस्कृतीवर, लोकांच्या जगण्याच्या रीतीभातींवर असंवेदनशील स्वरूपाचे भाष्य केले. 


या भाष्यावरून, या भाष्यातील खोलीवरून ते पुढे नेहमीच वादग्रस्त होत राहिले. गरीब देशांमधल्या समाजजीवनाला आधुनिकतेचा स्पर्श नसणे, त्यांचे अगदीच प्राथमिक, रानटी अवस्थेत जगणे यावर नायपॉल टीका करत असत. त्यांच्या आंग्लाळलेल्या, साम्राज्यवादी दृष्टिकोनामुळे, हिंदू समाज, इस्लामवरच्या टीकेमुळे पाश्चात्त्य वाचकांमध्ये ते लोकप्रिय होत होते. मात्र जगातल्या बड्या साहित्य समीक्षकांकडून त्यांच्यावर आसूड ओढले जात असत. भारतातले सर्व साहित्य समीक्षक, त्यात मराठी साहित्यिक नामदेव ढसाळांनीसुद्धा नायपॉल हे सकस जीवनानुभव न मांडणारे सामान्य साहित्यिक आहेत, त्यांना शोषण, दारिद्र्य, पिळवणूक, फसवणूक, लबाडी, लोकशाही शासन सत्तेचे विकृतीकरण एवढ्याच गोष्टी दिसल्या, अशी टीका केली. पण नायपॉल अखेरपर्यंत पाश्चात्त्य संस्कृतीचे, वंशवादाचेही खुले समर्थन करत असत. मात्र त्यांच्या लेखनात वैश्विकता असल्याने साहित्याचा प्रतिष्ठेचा 'नोबेल' पुरस्कार त्यांना मिळाला. 


नायपॉल यांना नेहमीच ते वासाहतिक असल्याची खंत होती. माझा जन्म कृषिप्रधान वसाहतीत झाला नसता तर माझ्या बुद्धिमत्तेला मोठा अवकाश मिळाला असता व जगणे अधिक समृद्ध झाले असते, असे ते दु:खाने म्हणत. ब्रिटनने आपल्याला सर्व काही दिले असे ते अभिमानाने सांगत. पण मूळचे भारतीय वंशाचे असूनही त्यांना भारताबद्दल घृणा होती. भारत गुलामांचा देश आहे. भारतातील दारिद्र्य, भ्रष्टाचार, लोकांचे सार्वजनिक शौचास बसणे यावर ते टीका करत. त्यांच्या साहित्यात भारतीय लोकजीवनाचे वरवरचे दृश्यात्मक चित्रण आढळते. ही माणसे अशी का जगतात याचा खोलवर वेध दिसत नव्हता. इस्लामवरच्या अविचारी टीकेमुळे तर ते अधिक चर्चेत आले. 


इस्लामने अनेक संस्कृतींना नष्ट केले. लोकांना गुलाम केले. धर्मांतराने माणसाचा भूतकाळ, इतिहास नष्ट झाला, अशी ते टीका करत. भारतात आलेल्या मुस्लिमांनी येथील संस्कृती, मंदिरे नष्ट केली. हिंदू, बौद्ध संस्कृतीला हादरे दिले, असे ते म्हणत. बाबरी मशीद पाडल्यावर तर त्यांनी हे कृत्य ऐतिहासिक संतुलन साधणारी घटना आहे. हा वेडाचार आहे, पण अशा वेडाचारातून रचनात्मकता येते व त्याचे मी समर्थन करतो, अशी विखारी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. अशा वादग्रस्त भूमिका मांडणाऱ्या नायपॉलांवर मध्यंतरी गिरीश कर्नाड यांनी बहुधर्मीय भारतीय समाजाचे अंतरंग, त्याचा इतिहास न ओळखणारा, भारतीय कला, संगीत यांचा कोणताच सखोल अभ्यास नसणारा लेखक अशी टीका केली होती. या टीकेत तथ्य आहे कारण नायपॉल यांंच्यामधील अहंभावीपणा हा गोऱ्या साहिबासारखा होता. त्यांच्या निधनाने एक वादग्रस्त लेखन संपले. 

बातम्या आणखी आहेत...