आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समजलेले गणित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 1984. दहावीला होतो. गावापासून शाळा 4 कि.मी. अंतरावर. पायीच जावे लागायचे. शाळेत जायच्या अगोदर अन् शाळेतून घरी आल्यानंतर घरची कामे करावी लागायची. थकायचो. लाइट वगैरे नव्हतीच. चिमणीच्या उजेडातच थोडा अभ्यास केल्यानंतर झोप लागायची. त्यामुळे अभ्यास असातसाच व्हायचा. एके दिवशी गणिताचे सर वर्गावर आले. खूप कडक होते. त्यांनी एक गणित फळ्यावर सोडून दाखवले. हे गणित ब-याच विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून गेले. ‘समजले ना सर्वांना गणित?’ असे सरांनी म्हणताच सर्वांनी एकमेकांकडे नजर टाकत होकार दिला. त्यांनी बाकीची गणितं घरून करून आणायला सांगितली. दुस-या दिवशी गणिताचे सर वर्गात आले अन् म्हणाले, ‘कोणी कोणी गणितं सोडवून आणली? ज्यांनी आणली असतील ते खाली बसा अन् ज्यांनी आणली नसतील ते उभे राहा....’ प्रत्येक जण एकमेकांकडे पाहत जागेवर उभा राहत होता. माझ्या जवळच सरांचा लाडका विद्यार्थी बसलेला होता. मी उभा राहणार तोच त्याने खाली बसण्याचा इशारा केला. त्याने मला उठू दिले नाही. मीही गणितं करून आणलेली नव्हती. 60 पैकी 58 विद्यार्थी उठून उभे होते. आम्ही दोघेच खाली बसलेलो असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा आमच्याकडे लागल्या होत्या. सरांनी 58 विद्यार्थ्यांना दोन्ही हात पुढे करून उभे राहण्यास सांगितले. ‘त्या दोघांना गणितं जमली, तुम्हाला का जमली नाहीत?’ असे म्हणत छड्या मारायला सुरुवात केली. छड्यांच्या आवाजाने सरांचा लाडका विद्यार्थी आनंदला होता. मी मात्र खिन्न मनाने त्यांच्याकडे पाहत होतो. लाडक्या विद्यार्थ्यानेही गणितं करून आणली नव्हती; पण सर आपल्याला मारणार नाहीत याचा त्याला पक्का विश्वास होता. आमच्या दोघांमुळेच इतर विद्यार्थ्यांना मार खावा लागला. आम्ही दोघेही उभे राहिलो असतो तर सरांनी सगळ्यांनाच परत गणित समजून सांगितलं असतं. पण वेळ निघून गेली होती. मला फार वाईट वाटलं. त्या दिवसापासून आपल्याला त्रास झाला तरी चालेल; पण आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतो आहे.