आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबक्या पावलाने येणारा ‘कोरोना’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वुहान शहरात न्यूमोनियासदृश आजाराने लोक आजारी पडत आहेत

चीनच्या वुहान प्रांतात दबक्या पावलाने आलेल्या कोरोना विषाणूंच्या साथरोगाने सध्या जगभरात घबराट उडवली आहे. आतापर्यंत या रोगाने ८० बळी एकट्या चीनमध्ये घेतले असून देशभरात सुमारे २७०० पेक्षा अधिक नागरिकांना त्याची लागण झाली अाहे. या साथरोगाचे वैशिष्ट्य म्हणजे हा श्वसनाशी संबंंधित असून सर्दी-पडशासारख्या किरकोळ आजाराद्वारे कोराेना विषाणू शरीरात घर करतात. त्यामुळे त्याची समोरच्या व्यक्तीला लागण झाल्यास लवकर कळत नाही.  वुहान शहरात न्यूमोनियासदृश आजाराने लोक आजारी पडत आहेत, असे  जागतिक आरोग्य संघटनेला (हू) डिसेंबर महिन्यात प्रथम कळले. त्यानंतर ७ जानेवारी रोजी हा एक नवाच  ‘कोरोना’ विषाणुजन्य रोग असल्याचे चिनी सरकारने सांगितले. त्यानंतर या साथरोगाची एवढ्या झपाट्याने लागण झाली की अख्खे वुहान शहर आता ठप्प पडले अाहे. हुबेई प्रांतातील हे एक महत्त्वाचे शहर असून त्यापाठोपाठ राजधानी बीजिंग, शांघाय, शेनझेन, ग्वांगझू या चीनमधील मोठ्या शहरांमध्ये वेगाने त्याची लागण झाली. ही सर्व औद्योगिक शहरे असून जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कारखाने, कॉर्पोरेट कार्यालये या ठिकाणी आहेत. त्यामुळे परदेशी नागरिकांनाही त्याची लागण झाली.  तैवान, हाँगकाँग, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, नेपाळसह १३ देशांतील नागरिकांनाही या साथरोगांची लागण झाली. सध्या चिनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे.  या काळात बाहेरगावी विशेषत: औद्योगिक शहरांमध्ये नोकरीस असलेले अक्षरश: लाखो चाकरमाने आपापल्या गावी परत जात असतात.  या नागरिकांमुळे कोरोनाची लागण इतरत्र होऊ शकते, अशी भीती चिनी सरकारला वाटतेय म्हणून सध्या १५ शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध लादले आहेत. चीन सरकारने २ फेब्रुवारीपर्यंत सुट्या वाढवल्या आहेत. या रोगाची उत्पत्ती कुठून झाली याचा चीनच्या रोग प्रसार प्रतिबंधक केंद्राने (सीडीसी) अभ्यास केला असता वुहानच्या सागरी प्राणी (सी फूड)  आणि जंगली जनावरांच्या बाजारात त्याचे मूळ सापडले. ‌‌‌वुहानच्या घाऊक बाजारातील ५८५ सी फूड नमुन्यांमध्ये कोरोनाशी संबंधित न्यूक्लिक अॅसिड यामध्ये आढळले. त्यापैकी ३१ नमुने जंगली जनावरांशी संबंधित होते. यामुळे आता संपूर्ण चीनमध्येच जंगली जनावरांच्या व्यापारावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी कायम ठेवावी, अशी मागणी आता होत आहे. सन २००२-०३ मध्ये चीनमधूनच पसरलेल्या ‘सार्स’ या रोगामुळे चीन आणि हाँगकाँगमध्ये ८०० जणांचे बळी गेले होते. त्याचप्रमाणे आता कोरोना विषाणूचीही झपाट्याने लागण होत असल्यामुळे भारतासह सर्वच देश सतर्क झाले आहेत. भारतात विशेषत: महाराष्ट्र अाणि केरळमध्ये १०० संशयित रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.  देशभरातील सर्व विमानतळांवर रविवारपर्यंत २९,७०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र देशात अद्याप लागण झालेला ‘पॉझिटिव्ह’रुग्ण आढळला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. आपल्यासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...