अब की बारी, सिर्फ हमारी...!

दिव्य मराठी

Apr 22,2019 11:22:00 AM IST

गुरचरण दास यांचं ‘India Grows at Night’ हे पुस्तक आलं २०१२ मध्ये. त्यात ते म्हणतात, ‘जागतिकीकरणाचा स्वीकार तर जगातील ६० देशांनी केला. मग भारतच कसा काय असा झेपावला, हा प्रश्न जगभरातील विचारवंतांना पडला आहे.’ मग तेच याचं उत्तर शोधताना पुढं म्हणतात, ‘राजकीयदृष्ट्या भारत स्वतंत्र आहे. गतिमान आहे. लोकशाही देश आहे. इथे कायद्याचे राज्य आहे. सामाजिकदृष्ट्या हा सर्वसमावेशक, शांतताप्रिय आणि सौहार्दपूर्ण असा देश आहे. या स्वरूपाचा देश अन्यत्र नाही. पाश्चात्त्य देश स्वतंत्र आणि गतिमान आहेत, पण त्यांचे विघटन सुरू आहे. पोर्वात्य देश एकसंध आहेत, पण ते असे स्वतंत्र, लोकशाही देश नाहीत.’

गुरचरण दास सहा-सात वर्षांपूर्वी कैरोमध्ये गेले तेव्हा इजिप्तमध्ये ती प्रसिद्ध क्रांती होत होती. तिथे लोकांनी त्यांना तीन प्रश्न विचारले.

एक : भारताने लष्कराला राजकारणाच्या बाहेर कसे ठेवले?
दोन ः अल्पसंख्याकांना भारतात एवढे सुरक्षित कसे वाटते?
तीन ः जगाला भारताबद्दल एवढा विश्वास का वाटतो?


दास म्हणतात, ‘ऐतिहासिक तहरीर चौकात लोकांची निदर्शने सुरू होती. महात्मा गांधींच्या देशातून आलेलो, म्हणूनच मी त्या सभेत बोलावे, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानुसार मी बोललो. म्हणालो, ‘लोकशाही अनेक गोष्टी देते. निवडणुका देते. मुक्तता, स्वातंत्र्य, समता देते आणि जबाबदारीही देते. पण, मुख्य म्हणजे कायद्याचे राज्य देते. कोणीच कायद्यापेक्षा, राज्यघटनेपेक्षा मोठे नाही अशी खात्री देते. इजिप्तमध्ये लोकशाही असती, कायद्याचे राज्य असते, तर होस्नी मुबारक स्वतःला देशापेक्षा मोठे समजू शकलेच नसते. आणि, तसे समजले असते तर निवडणुकीनेच त्यांना उत्तर दिले गेले असते. भारतात जो कोणी स्वतःला देशापेक्षा मोठा समजतो त्याला निवडणुकीतून उत्तर दिले जाते.’

अर्थात, दास हे कैरोत बोलत होते त्याच वेळी ‘तहरीर चौका’चा आदर्श घेणारी म्युझिकल चळवळ आपल्या ‘जंतर-मंतर’वर सुरू झाली होती. ‘मैं भी अन्ना, तू भी अन्ना’ वगैरे प्रकार रस्त्यावर सुरू होते आणि २४ तास दळण दळणाऱ्या वाहिन्यांनी त्याचा इव्हेंट करून टाकला होता! अशी चळवळ उभी करण्याचे खरे म्हणजे काहीच कारण नव्हते. भारतासारख्या देशात निवडणूक हे त्यासाठीचे सर्वोत्तम उत्तर आहे. निवडणुकीवरचा विश्वास संपेल तेव्हा रस्त्यावर उतरता येईल. आपण कारण नसताना नको ते आदर्श घेतो आणि आपले व्यवच्छेदक वेगळेपण विसरतो म्हणून स्वतःचाच पराभव करून घेतो.

इस्रायल असो वा इजिप्त, ‘गांधींचा देश’ म्हणून त्यांना भारताकडंच आशेनं पाहावंसं वाटतं. जगाला शिकवावं असं भारताकडं काही आहे हे त्यांना समजलेलं असावं. जगभर आता या भाषेत लोक बोलताहेत. ‘राष्ट्र’ म्हणून जो देश उभाच राहू शकत नाही, अशी खात्री जगाला एकेकाळी होती, त्याच भारताची खरी जादू आता सर्वांना समजू लागली आहे. विकास, आर्थिक प्रगती या वाटेवर भारताला आणखी खूप अंतर कापायचं आहे हे खरं, पण सर्वसमावेशकता, लोकशाही आणि राजकारण याच त्रिसूत्रीवर भारत उभा आहे हे जगाला समजू लागलं आहे. अवघ्या मानवी समुदायाला आज ना उद्या त्याच रस्त्यावर यावं लागणार आहे.


निदा फाजली म्हणतात,
घर से मस्जिद है बहुत दूर
चलो यूं कर ले
किसी रोते हुए बच्चे को
हंसा दिया जाये!

ही जादू भारतच करू शकतो.

भारत एक स्वप्न आहे आणि काव्यसुद्धा. शंभरहून अधिक वर्षं लागली हे काव्य लिहिण्यास.हे काव्य संपेल तेव्हा भारत संपेल. हे स्वप्न विरेल तेव्हा भारत नसेल. भारताचा जीव आहे तो या कवितेत. आणि, ही कविता जिवंत आहे ती भारतामुळे. आपल्याला समजतंय का हे? मूठभरांनी या कवितेची मोडतोड सुरू केलेली असताना आपण अब्जावधी लोक आणखी किती काळ हे शांतपणे पाहणार आहोत? ही कविता अमर आहे असं समजू नका. आपण आपल्या हातांनी जपलेली कविता आहे ही. ज्या क्षणी आपण आपले हात काढू त्या क्षणी मरून जाईल हे काव्य. आणि, मग उरेल काय? या कवितेवर हल्ला होत असताना ती प्राणपणानं जपण्यासाठी आता उभं राहावं लागणार आहे ते ‘बिलियन’ लोकांनाच.

तुम्ही तुमचं हे काव्य विसरलात तर विविधतेत एकता, हे जे भारताचं बलस्थान, तेच नव्या वातावरणात बूमरँग होऊ शकतं. ध्रुवीकरण ही राजकारणाची प्रकृती झाली तर ही विविधताच मग आपलं प्रचंड नुकसान करू शकते. कारण, भारतातलं ध्रुवीकरण धार्मिक असणार नाही फक्त. वांशिक, जातीय, भाषिक असं बहुआयामी असेल, बहुध्रुवीय असेल. असं झालं तर या देशाचं काय होईल? तुम्हाला मतदान करायचं आहे ते भारताचं हे काव्य जपण्यासाठी! भारताची ही सर्वसमावेशक गोष्ट तुमच्या आणि माझ्या हातात आहे. म्हणून मतदान करायचं. कोणत्या धर्मासाठी नाही, कोणत्याही जात वा धर्माच्या विरोधात नाही. मत द्यायचं ते देशासाठी. ‘आयडिया ऑफ इंडिया’ जपण्यासाठी.

X