आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांनी घेरल्यावर गांगरले शिक्षणमंत्री; प्राचार्यांना म्हटले 'गेट आऊट'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- दुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफीचे, मोफत पास, वसतिगृह प्रवेशाचे सरकारने पत्र काढून देखील विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही. सरकारचे आदेश असताना अंमलबजावणी का होत नाही, असे ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याने महाराष्ट्राचे उच्च, तंत्र, शालेय शिक्षण, क्रीडा तथा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे चांगलेच गांगरले. शैक्षणिक क्षेत्रात असंख्य ज्वलंत समस्या असून राज्यातील भाजप सरकारच्या गतिमानतेचे विद्यार्थ्यांनी चांगलेच वाभाडे काढले. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम अडचणींच्या प्रश्नांचा भडीमार होत असल्याचे निदर्शनास येताच शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी (४ जानेवारी) आटोपता घेतला. खुद्द शिक्षणमंत्रीच समस्यांची दखल घेणार असल्याने शहरातील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी केली होती. 

 

जिल्ह्यासह पश्चिम विदर्भाच्या सर्वच भागात दुष्काळाची स्थिती आहे. मात्र, सरकारने काही तालुके, काही गावांमध्येच उपाययोजना लागू केल्या. शिवाय या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना बसचा मोफत प्रवासाचा लाभ देण्याचा निर्णय घेेतला. शिक्षण घेता यावे म्हणून विद्यार्थिनींना राज्य परिवहन विभागाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अमरावतीत शिक्षणासाठी येणाऱ्या चैताली देशमुख या शेतकरी कन्येने या सरकारच्या निर्णयावर अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आधीच दुष्काळ त्यात मुलींच्या शिक्षणाचा भार शेतकऱ्यांनी उचलायचा कसा, असा प्रश्न तिने शिक्षणमंत्र्यांना केला. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे पत्र सरकारने काढले. पण, परीक्षा शुल्क माफ झाले का? असा प्रश्न कैलाश चव्हाण या विद्यार्थ्याने उपस्थित केला. संपूर्ण पश्चिम विदर्भात दुष्काळ असून येथील विद्यार्थ्यांच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या प्रश्नाचे उत्तर मात्र, शिक्षणमंत्र्यांनी गोलमटोल उत्तर दिले. कुलगुरूसोबत बैठक असून. कोणत्या भागात परीक्षा शुल्क माफ झाले नाही. याची शहानिशा करू तुम्ही विद्यापीठात या, असे शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा परशुराम आखरे या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे शुल्क कमी करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला.

 

शेतकऱ्यांच्या तसेच गावखेड्यातील मुलांना इंजीनिअर होता यावे म्हणून खासगी सोडा, किमान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रवेश शुल्क कमी करा, अशी विनंती केली. विद्यार्थ्यांचे समाधान होणारे तर सोडाच राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्पच शिक्षणमंत्र्यांनी उत्तरादाखल सांगून टाकला. महाविद्यालयांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम न शिकविला जात नाही, ५० टक्के अभ्यासक्रम शिकविल्यानंतर प्राध्यापक उर्वरित तुम्हीच करुन घ्या असा प्रश्न आदित्य बोडखे यांनी उपस्थित केला. शिक्षण-नोकरीतील सामाजिक आरक्षण, शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, प्राध्यापकांची भरती, अभ्यासक्रम, सेमिस्टर पद्धत बंद करणे, आदिवासी भागातील आश्रमशाळांची दुरावस्था, प्राथमिक-माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची परीक्षा न घेणे, विद्यापीठ विद्यार्थी संघाची निवडणूक आदी विविध प्रश्नांचा भडीमार विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री तावडे यांच्यावर केला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण मंत्री तावडे यांनी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सरकारी प्राथमिक शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले. या वेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार डाॅ. सुनील देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी, माजी महापौर मिलींद चिमोटे, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्यासह प्राध्यापकगण व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
 
सरसकट दुष्काळी शुल्क माफीबाबत एआयएसएफच्या नेत्यांशी चर्चा :

केवळ दुष्काळी तालुका, गावे नाही तर संपूर्ण पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (एआयएसएफ) ने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनातून केली. सरसकट संपूर्ण विद्यार्थ्यांचे शुल्क माफीचा निर्णय न घेण्यात आल्याने शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचे नियोजन एआयएसएफने केले होते. मात्र, बियाणी चौकातून एआयएसएफचे राज्य सचिव सागर दुर्याेधन यांच्यासह विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात निवेदन दिले. यावेळी सरसकट विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. यावेळी एआयएसएफचे हिमांशु अतकरे, प्रफुल्ल ढगे, मनिषा कांबळे, धीरज बनकर, संदीप ढोले, योगेश चव्हाण उपस्थित होते. 

 

६०५ अभ्यासक्रम रचना 
विविध प्रकारचे ६०५ अभ्यासक्रमांच्या रचनेतून विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय खुले होणार आहे. ओपन एसएससी बोर्डाची निर्मिती करण्यात येईल. शालेय अभ्यासक्रमात पाचवी व आठवीला परीक्षा घेतली जाणार आहे. 

 

शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी खुला संवाद 
महाराष्ट्रात सरकारी शाळांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राथ. शिक्षण तर ओपन बोर्ड प्रणाली लागू करणार अमरावती येथे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. 

 

शिक्षणमंत्र्यांनी म्हटले 'गेट आऊट' 
शैक्षणिक संस्था चालकांच्या बैठकीत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा उर्मटपणाच्या वागणुकीचा अनुभव उपस्थितांना आला. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का मिळाली नाही, प्राध्यापकांची भरती का नाही, असे विद्यार्थी हिताचे प्रश्न प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी उपस्थित केले होते. अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केल्याने शिक्षणमंत्र्यांनी डॉ. ठाकरे यांना गेट आॅऊट म्हटल्याने सर्वंच अचंबित झाले.