आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले दांपत्य, सावरकरांना 'भारतरत्न'साठी पाठपुरावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुले दांपत्य, सावरकरांना 'भारतरत्न'साठी पाठपुरावा

मुंबई : भारतीय जनता पक्षाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपले संकल्पपत्र जनतेला समर्पित करताना विविध आश्वासनांसोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. भाजप आणि शिवसेना सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत आलेले आहेत. स्वातंत्र्यवीरांबाबत काँग्रेसचे मत वेगळे असल्याने भाजपच्या या आश्वासनामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

या १६ कलमी संकल्पपत्रात दुष्काळमुक्ती, पाणी, रोजगार, शिक्षण आणि आर्थिक विकास या मुद्यांवर भाजपने भर दिला असून संपन्न, समृद्ध आणि समर्थ महाराष्ट्राचे संकल्पपत्र अशी टॅगलाइन वापरली आहे. तसेच दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे फोटो टाकून त्यांच्या वक्तव्यांचाही समावेश भाजपने संकल्पपत्रात केला आहे. संकल्पपत्राच्या सुरुवातीलाच कलम ३७० आणि ३५ अ चा उल्लेख करून यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन केले आहे. माधव भंडारी, पंकजा मुंडे, विकास महात्मे आणि डॉ. सुनील गायकवाड या समितीचे सदस्यांनी तयार केलेल्या या संकल्पपत्राचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

संकल्पपत्रात सावरकरांसह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करू, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ६२० कोटी रुपयांची तरतूद करू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पूर्ण करण्याचे आश्वासनही या संकल्पपत्रातून देण्यात आले आहे.

मतदानाला ५ दिवस असताना आणला जाहीरनामा
- शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा, १००० मेगावॅटचे - पवन ऊर्जा आणि १५०० मेगा वॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प, कचऱ्यापासून वीजनिर्मिती 
- पाचवीपासून शेतीवर आधारित अभ्यासक्रम, यात ७० टक्के - शेतीआधारित आणि ३० टक्के औपचारिक प्रशिक्षण दिले जाईल 
- महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पाच आयटी पार्क - उभारणार राज्याच्या प्रत्येक विभागात टेक्नॉलॉजी पार्क 
- कंत्राटी कामगारांसाठी लवाद 
- धनगर समाजाला एक हजार कोटींचे विशेष पॅकेज 
- अनुसूचित जातीतील प्रत्येक कुटुंबाला घर अनुसूचित - जमातींसाठी एकलव्य निवासी शाळा 
- प्रमुख शहरात सीसीटीव्हीचे जाळे पूर्ण करणार 
- दोन वर्षांत महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करणार 
- १५ हजार अद्ययावत आरोग्य केंद्रे उपलब्ध करणार 
- प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार व्यवस्था 
- एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन देणार 
- स्त्री-पुरुष समानता विषयाचा अभ्यासक्रमात समावेश 
- गर्भवती शेतमजूर महिलांना सानुग्रह अनुदान 
- बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही पीक विमा संरक्षण 
- शेती कर्ज सवलतीच्या दराने कायमस्वरूपी मिळणार 
- धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न 
- प्रत्येकाला घर आणि प्रत्येक घरात नळ 
- वीज महामंडळाप्रमाणे जल महामंडळ तयार करणार - मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन 
- 'एक देश, एक निवडणूक'चा पाठपुरावा

संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे
- औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारणार 
- औरंगाबाद, नाशिक येथे विशेष आयटी पार्क 
 -मुंबई औरंगाबाद, मुंबई-नाशिक वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करणार 
- मराठवाडा, विदर्भात ड्रायपोर्ट विकसित करणार 
- शेतीमाल निर्यातीसाठी औरंगाबाद, नाशिक विमानतळावरील सुविधा विकसित करणार 
- औरंगाबाद, नाशिक विमान फेऱ्या वाढवणार 
- पाचवीपासून शेतीवर आधारित अभ्यासक्रम 
- नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाचे आश्वासन संकल्पपत्रात - आहे.

जाहीरनामे वेगळे, पण...
भाजप - शिवसेनेचे जाहीरनामे वेगवेगळे का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, दोघांचेही मुद्दे वेगळे आहेत, परंतु सत्ता आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांतील मुद्दे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

२०१४ ची ही आश्वासने अपूर्ण
- तुकाराम ओंबळे बालवीर पुरस्कार 
- राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर धर्मशाळा आणि रात्री निवारा केंद्र 
- ६० वर्षे पूर्ण केलेल्या नोकरी व्यवसाय न केलेल्या - महिलांना माहेरचा आधार मासिक पेन्शन योजना 
- सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह 
- एकाकी महिलांसाठी जिल्हास्तरावर आधार केंद्र 
- प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय 
- आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी धोरण 
- छत्रपती शिवाजी पर्यटन योजना

संकल्पपत्रावरून हे नेते गायब
२०१४ च्या दृष्टिपत्रावर होते विनोद तावडे, एकनाथ खडसे (दोघांना उमेदवारी नाही) नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार

बातम्या आणखी आहेत...