आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजितदादांचे मन वळवण्याचे प्रयत्न तिसऱ्या दिवशीही फोल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत परत यावे. आपली राजकीय चूक मान्य करून पक्षासोबत राहावे. सत्ता येईल-जाईल, पण कुटुंब तुटता कामा नये,' अशी मनधरणी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी साेमवारीही अजितदादांकडे केली. सुमारे चार तास या नेत्यांनी दादांशी चर्चा केली, मात्र ते बंडखाेरीच्या निर्णयावर ठाम राहिले. शनिवारी अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिल्यापासून त्यांना परत अाणण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत, मात्र त्याला दादांनी दाद दिलेली नाही.

पुण्यतिथीनिमित्त माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी अकरा वाजता विधानभवनात आले होते. राष्ट्रवादीचे काही नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित हाेते. यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यात प्रदीर्घ बैठक झाली. 'अजित पवार यांनी केलेली बंडखोरी महाराष्ट्राच्या हिताची नाही. यात सकारात्मक मार्ग निघावा म्हणून आमचा प्रयत्न आहे, अजून उद्देश साध्य झाला नाही. प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. कुणाच्या मनातील मी कसे सांगू', असे भुजबळ यांनी बैठकीनंतर सांगितले. अजित पवार यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. अजून यश आले नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनीही मान्य केले. तत्पूर्वी सकाळी छगन भुजबळ यांनी चर्चगेट परिसरातील अजित पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली हाेती. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मागील तीन दिवसांत काहीही बोलणे झालेले नाही, असेही भुजबळ म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवारांत बोलणे झाले नाही : भुजबळ

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी विधिमंडळात अायाेजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते वळसे पाटील, छगन भुजबळ अादी उपस्थित हाेते.

'काकांनाच तयार करा'

मी बंड काेणत्याही परिस्थितीत अाता मागे घेणार नाही. भाजपला पाठिंबा देण्याबाबत उलट साहेबांचे तुम्हीच मन वळवा, असा निराेप अजित पवारांनी भेटायला अालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमार्फत शरद पवारांकडे पाठवल्याची माहिती अाहे.

विधानभवनात मज्जाव

राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक चालू असताना विधिमंडळात जाण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. अगदी विधिमंडळाच्या प्रांगणतही प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे दोन्ही गेटवर पत्रकार आणि सुरक्षा अधिकारी यांच्यात वाद झाले.

दादा मंत्रालयात गेले नाही

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर साेमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरच्या त्यांच्या दालनात गेले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात न जाता थेट घरी गेले.

अजितदादांकडे आमदार नाहीत तर मग त्यांची मनधरणी कशासाठी?

राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, 'पक्ष अजितदादांच्या निष्ठावंत आमदारांमुळे साशंक अाहे. फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान हाेईल. यामुळे पक्षातील दादा समर्थक अामदार अापले मत भाजपच्या पारड्यात टाकू शकतात, अशी पक्षाला शंका आहे. या निष्ठावंतांच्याच बळावर अजितदादांनी रात्रीतून फूट पाडली हेही पक्षाला ठाऊक आहे.'