आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड - जिल्ह्यात शनिवारी वेगवेगळ्या घटनांत ८ जणांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक ठार, तर एक जण जखमी झाला.पाय घसरून खड्ड्यात पडल्याने दोन बालकांचा मृत्यू झाला. नदीत बुडाल्याने एकाने जीव गमावला. विहिरीत पाय घसरून पडल्याने पिता-पुत्राचा बुडून मृत्यू झाला. शहरात अनोळखी व्यक्तीने गोदावरीत उडी मारून आत्महत्या केली.
दोन अपघात दोन युवक ठार, एक गंभीर जखमी
रात्री उशिरा नांदेड-गाडेगाव रस्त्यावर एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. आसना बायपासजवळ हा अपघात झाला. ट्रकच्या धडकेत शिवराज उबाळे हा युवक जागीच ठार झाला. तसेच सकाळी नायगाव तालुक्यात इकळीमाळ ते कुंटूर गावादरम्यान रेतीच्या टिप्परच्या धडकेत सूरज बोधके या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदाराने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलक शांत झाले. सूरज आजोबासोबत गाडीवर शेताकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातात त्याचे आजोबादेखील गंभीर जखमी झाले.
खड्ड्यामध्ये पाय घसरून पडल्याने दोन बालकांचा मृत्यू
मुखेड | तालुक्यातील जांब (बु.) पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्याच्या पाण्यात बुडून दोन अल्पवयीन बालकांचा मृत्यू झाला. जांब (बु.) - दिग्रस रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेलाच पुलासाठी मोठा खड्डा खोदला. दोन्ही बालके शेताकडे जात असताना त्यांचा पाय घसरून ते खड्ड्यात पडले. त्यात बारावर्षीय माधव सगर आणि ज्ञानेश्वर हुलगुलवाडचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दोन्ही मुले आपल्या आजोळी जांब या गावात आली होती. मात्र त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे जांब गावावर शोककळा पसरली. ठेकेदाराने योग्य ती काळजी घेतली नसल्याने ही घटना घडली. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
नदीत बुडाला पोहताना एकाने जीव गमावला
कंधार - तालुक्यातील घोडज गावाजवळ मन्याड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. ओम मठपती, गजानन श्रीमंगले आणि आदित्य डुंडे हे तिघे जण नदीत उतरले. मात्र या तिघांना नीट पोहता येत नव्हते. ते बुडत असताना कामेश्वर वाघमारे या मुलाने पाहिले. कामेश्वरने गजानन आणि आदित्यला वाचवले. मात्र या वेळी ओम मठपती या मुलाचा बुडून मृत्यू झाला. मृत ओम हा कंधार शहरातील रहिवासी असून दहावीत
शिकत होता.
विहिरीत पाय घसरून पडल्याने पिता-पुत्राचा बुडून मृत्यू
लोहा | तालुक्यातील देवणेवाडी येथे पिता-पुत्राचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. लोहा शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावरील देवणेवाडी येथील शेतकरी हनुमंत चौकले यांची देवणेवाडी शिवारात गावालगत शेती आहे. रब्बी पिकाची पक्षी व वन्य प्राण्यापासून राखण करण्यासाठी सकाळीच चौकले पिता-पुत्र शेताकडे गेले. हनुमंत चौकले यांचा १५ वर्षीय मुलगा शिवानंद चौकले हा जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेला. विहिरीला कठडे नसल्याने पाय घसरून शिवानंद विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी हनुमंत माधवराव चौकले यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र त्यांनाही पोहता येत नव्हते. हनुमंतने वडिलांच्या गळ्याभोवती घट्ट मिठी मारली. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, शहरातील गोदावरी नदीत अनोळखी व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.