एकादशी-ईद एकाच दिवशी; पंढरपुरात दिली नाही कुर्बानी
देशभरात बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी जात असताना पंढरपुरात मात्र मुस्लिम बांधवांनी वेगळाच आदर्श निर्माण केला.
-
पंढरपूर - देशभरात बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी जात असताना पंढरपुरात मात्र मुस्लिम बांधवांनी वेगळाच आदर्श निर्माण केला. बुधवारी योगायोगाने बकरी ईद आणि श्रावणी एकादशीही होती. हे दोन्ही सण एकत्र आल्याने पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेऊन सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश दिला. शहर पेशइमाम यांनी कुर्बानी देणार नसल्याचा निर्णय जाहीर केला.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून बुधवारी श्रावण एकदशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी सुमारे १ लाखाहून अधिक भाविक पंढरीत आले आहेत. मुस्लिम समाज व हिंदू समाज वर्षानुवर्षे पंढरीत एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहत आहेत. श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला नित्यनेमाने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बकरी ईद साजरी करताना त्याच दिवशी श्रावण एकादशीही आहे याचे भान ठेवून मुस्लिम समाजाने बकरी कुर्बानी न देण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. दरम्यान, केरळमध्ये महापूर आल्याने तेथील जनतेची दैनावस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर पीडितांना मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही शाही इमामांनी केले आहे.