आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला भाजपची उमेदवारी, तरीही खडसेंबाबत सस्पेन्स कायम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

भाजपच्या पहिल्याच यादीत दिग्गज नेते एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, बावनकुळे यांचे नाव आले नाही तेव्हाच उभ्या महाराष्ट्राला कळून चुकले होते की, या तिघा नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले ते खडसे. कारण खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडल्यानंतर पुन्हा त्यांना संधी मिळाली नाही. याचाच अर्थ खडसेंना या वेळेस तिकीट मिळणारच नाही, अशी साध्या कार्यकर्त्यालाही खात्री होती. तरीही ते भाबडी आशा ठेवून हाेते.  राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी पायघड्याच घातल्या होत्या. पण तसे काही झाले नाही.

खडसे यांनी चाळीस वर्षे एकाच पक्षात राजकारण केले आहे. तो पक्ष काय निर्णय घेणार आहेत हे त्यांना सुरुवातीपासून माहीत हाेते.तरी त्यांनी पक्ष बदलाचा आणि बंडखोरीचा आततायीपणा का केला नाही?  कदाचित पक्षश्रेष्ठींनाही तेच अपेक्षित असेल, पण खडसेंनी आपल्या बाजूने एकही चूक होऊ दिली नाही. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा केली. आपली भूमिका जाहीर करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयाेजित केला हाेता. मात्र त्याआधीच पक्षाने शेेवटच्या दिवशी त्यांची कन्या रोहिणी यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षश्रेष्ठी आपल्या ताठर भूमिकेवर ठाम राहिले. अखेर पक्षाचा निर्णय खडसेंनी मान्य केला. भाजप श्रेष्ठी आणि खडसे यांच्यातला हा सामना शेवटपर्यंत रंगत राहिला. भाजपच्या या निर्णायामुळे खडसे पुन्हा विधानसभेत दिसणार नाही हे आता निश्चित. 

खडसेंचे राष्ट्रवादीत न जाण्यामागेही अनेक कारणे असू शकतात. एकतर सून रक्षा या खासदार आहेत. मुलगी रोहिणी या जिल्हा बँक आणि कापूस उत्पादक पणन महासंघावर, पत्नी मंदा खडसे या महानंदा डेअरीच्या चेअरमन अशी अनेक पदे घरात आहेत. याशिवाय भाजपत एवढी वर्षे राजकारण केलेे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा संघर्ष करण्यापेक्षा पक्षात राहूनच संघर्ष केलेला बरा, अशी त्यांची भावना असावी. खडसेंवर असणाऱ्या आरोपांचे पक्षाला आणि सरकारला किती गांभीर्य आहे हे सांगता येणार नाही. पण त्यांना पुन्हा उमेदवारी दिली तर ते निवडून येतील आणि पुन्हा मुख्यमंत्री कोण? किंवा खडसेंचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होईल का? या विषयाला धरून चर्चा सुरू होतील.  

फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींना नेमके तेच नको असेल म्हणूनच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षश्रेष्ठी भूमिकेवर ठाम असताना खडसेही मुक्ताईनगरात बसून होते. राजकारणातला खमक्या नेता, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, माजी विरोधी पक्षनेता यांचे तिकीट कापणे ही मोठी बातमी होती. त्यामुळे मीडिया मुक्ताईनगरातच दाखल होती. एकीकडे पक्षश्रेष्ठी दुसरीकडे खडसे आणि त्यांचे समर्थक यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागून होते. अखेर पक्षश्रेष्ठी आणि खडसे यांनी एक- एक पाऊल मागे घेत राजकीय समझाेता केला आणि खडसेंएेवजी मुलीला उमेदवारी दिली. पण ‘माझा काय गुन्हा’ अशी वारंवार विचारणा करणाऱ्या खडसेंना अजून तरी त्याचे उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे खडसे का नकोच, या राजकीय नाट्याचा सस्पेन्स कायम ठेवण्यात भाजप यशस्वी झाला, असे म्हणावे लागेल.