आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांची चौकशी करणार का...?' एकनाथ खडसे विधानसभेत भावूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सत्ता मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आणि सत्ताही मिळवली. पण सत्ता मिळूनही त्यापासून दूर राहण्याचं दुःख एकनाथ खडसे यांच्याशिवाय कोणी समजू शकत नाही. त्यांनी शेवटच्या अधिवेशनात आपल्या भावना बोलून दाखवल्या. "माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली, त्यात काहीही तथ्य नव्हते, आता आरोप करणारावर कारवाई करणार का", असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. मला या सभागृहातून आरोपांचा डाग घेऊन जाण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी फडणवीसांकडे केली.


भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना खडसे अत्यंत भावूक झाले. "सभागृहाला आणि मुख्यमंत्र्याना विनंती आहे की आरोपांचा डाग घेऊन सभागृहातून जायची संधी देऊ नका. माझे जावई, नातू आणि कुटुंबीयांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय राहिल? त्यामुळे ज्यांनी पुरावे दिले त्यांचीही चौकशी करण्यात यावी ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. खोटे आरोप केले असतील तर त्यांना शिक्षेचा कायदा करा", असे भावनिक मागणी त्यांनी केली.


या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. "मी जे भोगले त्याबद्दल आजही मनात वेदना आहेत. कुणाच्या जीवनात हा प्रसंग येऊ नये. माझ्या आयुष्यात यापेक्षा वाईट होण्याची शक्यता नाही. माझ्यावर सभागृहातील एकही सदस्याने आरोप केले नाहीत. आरोप करणारे बाहेरचे होते", असेही ते म्हणाले.


काय म्हणाले खडसे ?
"माझे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या बायकोशी बोलल्याचे संबंध जोडले गेले. नाथा भाऊमध्ये तिला एवढं काय आवडलं? आमचे सरकार पारदर्शी असल्यामुळे चौकशी झाली. चौकशीत समोर आले की माझे दाऊदच्या बायकोशी कुठलेही संभाषण झाले नाही. आता माझ्यावर आरोप करणारा मनीष भंगाळे कुठे आहे? रावणाचा वध करण्यासाठी रामाने जन्म घेतला होता का? नंतर आरोप झाला नाथा भाऊंच्या जावयाने लिमोझिन कार घेतली. त्यावर मीडियाने बदडले. नंतर पीएने पैसे घेतल्याचा आरोप झाला. पुन्हा एमआयडीसीची जमीन घेतल्याचा आरोप झाला. मी एक इंचही जमीन घेतली नाही. व्यवहार बायकोच्या नावावर होता आणि सात बारामध्ये जमीन मालकाचे नाव होते. माझ्यावर अंजली दमानिया यांच्याकडून आरोपांवर आरोप करण्यात आले. दमानियाबाईंचे वजन एवढे दांडगे होते की माझ्यावर आयकर विभागाच्या रेड पडल्या. माझ्या आयुष्यात वडिलोपार्जित इस्टेटशिवाय काही नाही. वडील श्रीमंत होते, माझ्या शेतीच्या व्यतिरिक्त एकही उद्योग नाही. आयुष्यात पथ्य पाळले. इतर उद्योग करायचे टाळले. मी काय चोर, बदमाश आहे का? एवढ्या चौकशा कशा झाल्या? एवढे आरोप झाले की एका सन्माननीय सदस्याला या सभागृहातून जाताना वेदना होत आहेत", असे म्हणत खडसे भावूक झाले.