Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | eknath khadse news in marathi

सेनेने कटुता दूर करावी, बदला घेण्याची ही वेळ नाही : खडसे

प्रतिनिधी | Update - Mar 14, 2019, 11:26 AM IST

गेल्या वेळी युती तुटली. मात्र, त्यासाठी मी एकटा कारणीभूत नाही. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अंमलबजावणी केली.

 • eknath khadse news in marathi

  मुक्ताईनगर / रावेर - गेल्या वेळी युती तुटली. मात्र, त्यासाठी मी एकटा कारणीभूत नाही. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अंमलबजावणी केली. तेव्हा युती तुटली नसती तर भाजपचा मुख्यमंत्री झाला नसता. आता युती झाली आहे. सरकार आले तर मुख्यमंत्री भाजप-सेनेचा आहे, असे म्हणावे लागले. मित्रपक्षाने मनातील कटुता दूर करावी. बदला घेण्याची ही वेळ नाही, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.


  खडसे यांच्या खडसे फार्म हाऊसवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कार्यकर्ता सुस्त होता कामा नये. सरकारमध्ये नसताना आंदोलन, मोर्चा, रास्ता रोकोतून तर आता बूथप्रमुखाच्या माध्यमातून कार्यकर्ते सक्रिय आहेत. अमित शहा म्हणजे सूक्ष्म पद्धतीने नियोजन करणारे राष्ट्रीय अध्यक्ष होत. बूथ मजबूत करा. प्रत्येकाने जबाबदारीची अंमलबजावणी करा. जामनेर बहुमताचा भाग आहे . पण शिस्त नव्हती.


  आता बैठकीची शिस्त लागली. आता एक लाखाचे वर मतदान देण्याचे आश्वासन जामनेर तालुकाध्यक्षांनी दिले आहे. यश कार्यकर्त्यांच्या बळावर मिळाले. कार्यकर्त्यांच्या जोरावर जळगावच काय, महाराष्ट्र जिंकू, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. या वेळी कार्यकर्ते उपस्थित होते.


  मतदारसंघात ३९८ शक्तिकेंद्रप्रमुख
  आमदारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन, भाजप, शिवसेना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष या युतीसोबत संवाद साधून बैठकांचे नियोजन, पेज प्रमुख संमेलनाचे आयोजन करणे असे कार्यक्रम निवडणूक कालावधीत राबवले जातील. रावेर लोकसभा मतदारसंघात ३९८ शक्ती केंद्रप्रमुख आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

Trending